-डॉ. स्मिता प्रकाश जोशी
“मेघा, रावसाहेबांच्या निरोप समारंभाला तुला स्पीच द्यायचं आहे. ते तुमच्या विभागाचे आहेत, त्यामुळं तुलाच बोलावं लागेल!”
“अजिबात नाही हं! त्या माणसाबद्दल मी चांगलं बोलूच शकणार नाही. दुसऱ्याच्या अडचणी जो कधीही समजून घेत नाही, त्याला कसा माणूस म्हणायचं? ते समोर दिसले तरी माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते. त्यांच्याबद्दल मी काय चांगलं बोलणार?”
“मेघा, अगं एवढा राग चांगला नाही.”

“शालू, तूच सांग. मी का नाही रागावणार? मला किती छळलंय त्यांनी! कितीही महत्त्वाचं वैयक्तिक काम असलं, तरी माझी रजा मंजूर करायचे नाहीत ते. सख्ख्या बहिणीच्या लग्नात मला केवळ दोन दिवसांची रजा मिळाली होती. आईला मी मदत करू शकले नाही. आता मला माझ्या माहेरच्या माणसांकडून सतत ऐकून घ्यावं लागतं. शिवाय अगोदर काढलेल्या माझ्या तिकिटाचे सगळे पैसे तेव्हा वाया गेले होते. मुलाच्या दहावीच्या परीक्षेच्या वेळेसही मला सुट्टी दिली नव्हती. बरं, एवढं काम करून कधी समाधानाचे, कौतुकाचे शब्द नाहीत. आपल्या बॉसनं आपल्या कामाबद्दल चांगलं बोललं, तर आपल्यालाही काम करायला हुरूप येतो, प्रोत्साहन मिळतं. पण हे त्यांच्याकडून कधीच मिळालं नाही. सतत त्यांची चिडचिड मात्र झेलावी लागली. त्यांच्याबरोबर काम करताना मानसिक ताण तर होताच, पण मला ‘लो बीपी’चा त्रास मागे लागला. त्यांची बदली होऊन या ऑफिसमधून ते जातायत याचा सगळ्यात मोठा आनंद मला होतोय. ते इथून गेल्यावर मी मोकळा श्वास घेईन. मी त्याच्याबद्दल काहीही बोलू शकणार नाही.”

आणखी वाचा-पंतप्रधान मोदींच्या शपथविधीसाठी आमंत्रण असलेल्या ऐश्वर्या एस मेनन, सुरेखा यादव कोण? पाहा…

“मेघा, ते आपले बॉस होते. त्यांना ऑफिसचा कार्यभार सांभाळायचा होता. बॉसनं कडक वागलं तरंच स्टाफ सीरियसली काम करतो! ते त्यांच्या जागेवर बरोबरच आहेत गं…”
“शालू, त्यांची स्टेनो म्हणून मी काम केलंय. त्यामुळे मी त्यांना जास्त ओळखते. तू काही त्यांच्या वागण्याचं समर्थन करू नकोस. माणसं दोन गोष्टींमुळे लक्षात राहतात. एक तर खूप चांगल्या वागण्यानं किंवा वाईट वागण्यानं. यांच्या सर्व वाईट स्मृतीच माझ्याकडे आहेत. त्यांचं बोलणं जिव्हारी लागायचं, रात्र रात्र झोप लागायची नाही, तेच तेच विचार मनात घोळत रहायचे…”

“मेघा, तुम्हा कित्येक बायकांचं हेच चुकतं! ऑफिसच्या टेन्शनमुळे घरातल्या कामात लक्ष लागत नाही आणि ऑफिसचं काम करताना घरातल्या गोष्टींचं टेन्शन असतं, त्यामुळं ऑफिसच्या कामावर परिणाम होतो. कोणतंच काम धड होत नाही. मनाचे दोन कप्पे ठेवायला हवेत. ऑफिसमध्ये आलात की पूर्ण ऑफिसच्या कामाचे विचार करायचे आणि घरी गेल्यानंतर ऑफिसमध्ये काय झालंय, हे विचार पूर्ण सोडून द्यायचे.”
“ शालू, हे सर्व बोलायला सोपं आहे, पण असं वागता येत नाही.”
“ मेघा, हे सगळं अवघड निश्चित आहे. पण अशक्य नाही. थोडा प्रयत्न केला तर हे नक्की जमू शकतं.
कोणत्या कामाला केव्हा प्राधान्य द्यायचं, हे ठरवून घ्यायचं, काही गोष्टींचा स्वीकार करायचा, काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं आणि काही गोष्टींचा सारासार विचार करून आपलं नक्की कुठं चुकतंय, याचं आत्मपरीक्षण करायचं”

आणखी वाचा-“प्रवाशांना केवळ ड्रिंक्स सर्व्ह करण्याचे काम…” एअर होस्टेसने नोकरी सोडताना सांगितला तिचा अनुभव…

शालू बोलतच राहिली. “आता आपण तुझ्या बाबतीत काय घडलंय याचा विचार करू. तुझ्या बहिणीचं लग्न होतं तेव्हा ऑफिसचं ऑडिट चालू होतं, आठवतंय का? तेव्हा कुणालाच सुट्टी मिळत नव्हती. सर्वांनी कामावर असणं गरजेचं होतं. रावसाहेबांना कामात कसूर आणि विलंब आजिबात चालायचा नाही. असं काही घडलं की ते रागवायचे, चिडायचे, कडक शब्दांत बोलायचे. पण त्यांची काही कुणाशी वैयक्तिक दुष्मनी नव्हती. त्यांचा तो स्वभाव होता. काम करताना कधीतरी चुका होतात, तेव्हा वरिष्ठांची नाराजी, कडवे शब्द ऐकून घ्यावे लागतात. पण त्यातून शिकायला मिळतं. आपण आपल्या कामात अधिक निपुण होत जातो. पण ते मलाच असे का बोलले? ते मलाच त्रास देतात… मुद्दाम असं वागतात… याचा विचार करून तू स्वतःच्या झोपेवर, मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम करून घेतलास. पटतंय का मी म्हणते ते?”

मेघा विचार करत राहिली. ऑफिसच्या गोष्टींचं ओझं आपण मनावर बाळगत होतो, हे तिलाही पटलं होतं. आता त्या गोष्टींत अडकून न राहता रावसाहेबांच्या निरोप समारंभाला त्यांच्या कामाच्या शैलीबद्दल बोलायचं… आपली नाराजी व्यक्त करतानाही भान ठेवून योग्य शब्द वापरायला हवेत, असं तिनं ठरवलं आणि ती पुढच्या कामाला लागली.

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)

smitajoshi606@gmail.com