अँटी एजिंग सौंदर्यप्रसाधनं कशी निवडाल | how to choose anti aging beauty products utility vp-70 | Loksatta

‘अँटी एजिंग’ सौंदर्यप्रसाधनं कशी निवडाल?

‘अँटी एजिंग’ सौंदर्यप्रसाधनांच्या प्रचंड मोठ्या बाजारातून योग्य उत्पादन निवडणं सोपं जावं यासाठी ‘अमेरिकन अकॅडमी ऑफ डरमॅटोलॉजी असोसिएशन’नं काही टिप्स दिल्या आहेत.

‘अँटी एजिंग’ सौंदर्यप्रसाधनं कशी निवडाल?
शरीरानं निरोगी राहाण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असाल, तर शरीरमनाच्या आरोग्याचं तेज तुमच्या चेहऱ्यावर नक्की दिसेल आणि तेच तुम्हाला चिरतरूण भासवेल.

सौंदर्यप्रसाधनांच्या बाजारात ‘अँटी एजिंग’ उत्पादनांचं ‘मार्केट’ नेहमीच खूप मोठं राहिलेलं आहे. साधारणत पस्तिशी जवळ येऊ लागली की पुष्कळ स्त्रियांना आपण अँटी एजिंग उत्पादनं वापरायला हवीत असं वाटू लागतं. वयानुसार चेहऱ्यावर- विशेषत: डोळ्यांच्या कडांना, नाकाच्या बाजूला, हनुवटीपाशी, कपाळावर अशा दिसणाऱ्या थोड्याफार सुरकुत्या, पिगमेंटेशन जाऊन त्वचा घट्ट, तुकतुकीत आणि पूर्वीसारखी नितळ दिसावी या इच्छेतून मध्यमवयीन आणि प्रौढ स्त्रिया अँटी एजिंग उत्पादनं धुंडाळायला लागतात. पण बाजारात या नावाखाली इतकी मोठ्या प्रमाणात उत्पादनं आहेत, की निवडताना गोंधळ उडणं साहजिकच आहे. शिवाय ‘अँटी एजिंग’ हे लेबल लागल्यामुळे त्यांची किंमतही भरपूर असते. अशा वेळी उत्पादन खरेदी करताना कोणते मुद्दे विचारात घ्यावेत, हे ठरवण्यासाठी ‘एएडी’ अर्थात ‘अमेरिकन अकॅडमी ऑफ डरमॅटोलॉजी असोसिएशन’नं काही टिप्स देऊन ठेवल्या आहेत. त्या आज पाहू या.

आणखी वाचा : श्रद्धा वालकरसारख्या निर्घृण हत्या का होतात? उत्तर तसे नेहमीचेच… जाणून घ्या!

मॉईश्चरायझर आणि सनस्क्रीन ‘मस्ट’!
तुमच्या ‘अँटी एजिंग ब्यूटी रेजिम’मध्ये मॉईश्चरायझर आणि सनस्क्रीन नियमितपणे, दररोज वापरायला हवं. यात चांगल्या दर्जाचं अँटी एजिंग मॉईश्चरायझर वापरावं. या प्रकारचं मॉईश्चरायझर त्वचेवर चांगलं परिणामकारक ठरतं आणि म्हणूनच अनेक अँटी एजिंग उत्पादनांमध्येसुद्धा त्याचा वापर केलेला असतो. सनस्क्रीनसुद्धा ‘ब्रॉड स्पेक्ट्रम कव्हरेज’ असलेलं, ‘एसपीएफ ३०’ किंवा त्याहून जास्त ‘सन प्रोटेक्शन’ देणारं आणि शक्यतो पाण्याला अवरोध करणारं (वॉटर रेझिस्टंट) असावं. काही आठवडे अँटी एजिंग मॉईश्चरायझर आणि सनस्क्रीन नियमितपणे वापरून पाहावं. त्यानं तुम्हाला तुमच्या त्वचेत फरक पडलेला जाणवतोय का, हे पडताळावं.

.आणखी वाचा : शिक्षिका ते पारिचारिका; ‘या’ क्षेत्रात स्त्रिया ठरतात सर्वोत्तम

तुमच्या त्वचेचा पोत कुठला?
कोणतंही अँटी एजिंग उत्पादन निवडताना तुमच्या त्वचेचा पोत कुठला आहे, हेही लक्षात घ्यावं लागेल. उदा. तेलकट त्वचा, संवेदनशील (सेन्सिटिव्ह) त्वचा, असा तुमच्या त्वचेचा प्रकार कोणता, त्यानुसारच त्याला चालेल असंच उत्पादन निवडावं.

‘स्टेप बाय स्टेप’ पुढे जा!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या वय वाढल्याच्या सर्व खुणा नाहीशा करणारं एकच कुठलं उत्पादन नसतं. शिवाय एकाच वेळी ‘एजिंग’च्या वेगवेगळ्या खुणांवर वा लक्षणांवर उपाय करणारी ढेरसारी उत्पादनं वापरणं योग्य नाही. त्यामुळे तुम्हाला त्यातल्या कशावर आधी उपाय करायचा आहे, हे ठरवा आणि ‘स्टेप बाय स्टेप’ पुढे वाटचाल करा. म्हणजे, उदा. तुम्हाला चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांवर आधी उपाय करावासा वाटत असेल, तर त्यावरच लक्ष केंद्रित करा आणि सुरकुत्यांवर प्रभावी ठरणारं चांगल्या प्रतीचं उत्पादन निवडून ते वापरून फरक पाहा.

आणखी वाचा : मसाल्याचा ‘हा’ पदार्थ पाळीच्या त्रासांवर आहे अत्यंत गुणकारी!

अचाट प्रॉमिसेसपासून दूर राहा!
‘अवघ्या काही दिवसांत तारुण्य परत मिळवा’, ‘आठवड्याभरात सुरकुत्या घालवा’, ‘एका रात्रीत दहा वर्षांनी तरूण दिसा’ वगैरे अनेक अचाट दावे सौंदर्यप्रसाधन कंपन्या करत असतात. मात्र प्रत्यक्षात ते शक्य नसतं, हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळे हळूहळू पण प्रभावी परिणाम दिसेल अशी चांगल्या प्रतीची सौंदर्यप्रसाधनं निवडणं योग्य. ‘प्रभावी परिणाम’ हा शब्दही फसवा आहे. अँटी एजिंग क्रीम लावून तुम्हाला ‘फेस लिफ्ट’ उपचार करून घेतल्यासारखा परिणाम निश्चितच मिळणार नाही, हेही लक्षात असू द्या. त्यामुळे अपेक्षा धरताना त्या वास्तवातल्या असू द्या.

उत्पादनांच्या वेष्टनावर खालील शब्द तपासा-
‘एएडी’च्या मतानुसार अँटी एजिंग उत्पादनांच्या वेष्टनावर हे शब्द आहेत का ते जरूर तपासून घ्या-
‘हायपोॲलर्जेनिक’- म्हणजे उत्पादनाची ॲलर्जिक रीॲक्शन येण्याचा धोका कमी असतो.
‘नॉन- ॲक्नेजेनिक’ किंवा ‘नॉन-कोमेडोजेनिक’- म्हणजे उत्पादनामुळे मुरूम-पुटकुळ्या (ॲक्ने) येण्याचा धोका कमी असतो.
शिवाय सौंदर्यप्रसाधनांची कंपनी प्रस्थापित अशी असावी- म्हणजे त्या उत्पादनांवर ‘कंझ्यूमर हॉटलाईन’चा नंबर दिलेला हवा. याचाच अर्थ संबंधित कंपनीचं उत्तरदायित्त्व प्रकट व्हावं- त्यांच्या हेल्पलाइन नंबरच्या माध्यमातून त्याची झलक दिसते.

आणखी वाचा : सॅनिटरी पॅड्समधल्या ‘या’ रसायनामुळे कॅन्सरचा धोका? जाणून घ्या नेमकं प्रकरण काय

महाग म्हणजेच उत्तम नव्हे!
केवळ महागडी अँटी एजिंग उत्पादनं चांगली असतील असा समज असतो, पण तो खरा नव्हे. खूप महाग नसलेली काही उत्पादनंही चांगला परिणाम देऊ शकतात.

आपल्या त्वचेला चालेल असं, आपल्याला सोईचं ठरणारं उत्पादन वापरून त्यानं त्वचेत कसा फरक पडतोय हे तपासून पाहाणंच इष्ट. ‘अँटी एजिंग’ सौंदर्यप्रसाधनं आजमावून पाहाणं चुकीचं नसलं, तरी शेवटी तुम्ही कितीही उपाय केलेत तरी वय वाढत जाणं कुणालाही चुकलेलं नाही. शिवाय वय वाढण्याबरोबर आपण प्रौढ दिसू लागलो तर त्यात चुकीचं ते काय! एक मात्र खरं, की तुम्ही जर मनानं तरूण, आनंदी असाल, शरीरानं निरोगी राहाण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असाल, तर शरीरमनाच्या आरोग्याचं तेज तुमच्या चेहऱ्यावर नक्की दिसेल आणि तेच तुम्हाला चिरतरूण भासवेल.

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-11-2022 at 19:50 IST
Next Story
श्रद्धा वालकरसारख्या निर्घृण हत्या का होतात? उत्तर तसे नेहमीचेच… जाणून घ्या!