शुगर क्रेव्हिंगवर असा ठेवा कंट्रोल | how to control sugar craving diabetic women diabetes health healthy habits vp-70 | Loksatta

‘शुगर क्रेव्हिंग’ वर ‘असा’ ठेवा कंट्रोल!

मधुमेह असल्याने साखर टाळावी लागतेच. पण ती हवीहवीशीही वाटते… तर, मग काय कराल?

diabetes sugar
मधुमेहात रक्तातील साखरं वाढणं धोकादायक असतं.

‘साखरेचं खाणार त्याला देव देणार…’ असं म्हटलं जातं. आपल्यापैकी अनेकींना गोड खायला आवडतं. आईस्क्रीम, चॉकलेट्स, मिठाई असे पदार्थ कितीजणींचे वीक पॉईंट असतात. अनेकींना ‘शुगर क्रेव्हिंग’ होतं. म्हणजे काहीतरी गोड खावंसं वाटतं. साखरेमुळे इन्स्टंट एनर्जी मिळते हे खरं. पण अतिगोड खाणं, शरीरात जास्त साखर होणं हेही घातक ठरतं. पूर्वी फक्त सणावारालाच गोडधोड खायची पध्दत होती. पण आता कायमच सगळे पदार्थ सहज उपलब्ध असतात. त्यामुळे ते खाण्यासाठी असा काही विशेष प्रसंग लागत नाही. पण म्हणूनच यावर नियंत्रण ठेवायला हवं. त्यात बैठं काम असेल किंवा तुमची धावपळ जास्त नसेल असेल किंवा काही नियमित असं वेळापत्रक नसेल तर या अति गोड खाण्यानं जास्त त्रास होऊ शकतो. काहीजणींना काम करताना, पिरीयड्सच्या वेळेस किंवा जेवण झाल्यावर, कधीतरी रात्री अचानक गोड खावंसं वाटतं; हे क्रेव्हिंगचं लक्षण आहे. आणि खरंतर ते शरीराचं नाही तर मनाचं असतं, असं म्हटलं जातं. म्हणजे असं गोड खावसं वाटलं आणि एखादा तुकडा जरी खाल्ला तरी बरं वाटतं.

आणखी वाचा : घटस्फोट म्हणजे रोग नव्हे!

तुम्हाला गोड आवडत असेल आणि शुगर कंट्रोल करायची असेल तर आम्ही तुम्हाला काही अगदी सोप्या टिप्स सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला गोड खाण्याचा आनंदही मिळेल आणि साखर खाणंही नियंत्रणात राहील.

बेकरीचे पदार्थ टाळा
बऱ्याचजणींना चहाबरोबर बिस्किटं, खारी, टोस्ट असं काहीतरी खायची सवय असते. पण जास्त प्रमाणात हे पदार्थ खाल्ले गेले तर त्याचा शरीरावर नक्कीच परिणाम होतो. बाजारात मिळणारी विविध प्रकारची बिस्किटं, कुरीज, केक, पुडींग्ज कोणाला आवडत नाहीत? अनेकदा भूक लागल्यावर कामात असल्याने पटकन एखादं बिस्किट तोंडात टाकलं जातं. यामध्ये कार्ब्स आणि साखर खूप जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे हे मैद्याचे पदार्थ खूप खाणं टाळा. हल्ली कणकेची, नाचणीची तसंच शुगर फ्री बिस्कीटं मिळतात. त्यापैकी एखादा पर्याय निवडू शकता.पण तेही मर्यादेतच खा.

आणखी वाचा : मनाचा ब्रेक – उत्तम ब्रेक

खजूर खा
आपल्यापैकी खूपजणींना जेवणानंतर थोडंसं तरी गोड खायची सवय असते. मग एखादा पेढा, लाडू, बर्फीचा तुकडा किंवा चॉकलेट खाल्लं जातं. यामुळे साखर पोटात जातेच. तुम्हाला गोड खायचं क्रेव्हिंग झालं तर खजूर किंवा सुकं अंजिर खा. यामुळे साखर शरीरात जाणार नाही आणि तुमची गोड खायची हौसही भागेल. ताकद आणि एनर्जी मिळावी यासाठी स्त्रियांना रोज खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे उलट तुम्हाला पोषणही मिळेल.

मिठाईऐवजी फळे खा
लाडू, पेढे, हलवा किंवा एखादी खीर..आपल्यापैकी अनेकींची फेव्हरिट असेल. पण डाएटची काळजी करत असाल तर, ही आवड थोडीशी बाजूला ठेवा. अगदी कधीच हे पदार्थ खायचे नाहीत असं नाही. पण या पदार्थांमध्ये वापरण्यात येणारी रिफाईंड शुगर ही आरोग्यासाठी चांगली नसते. त्यामुळे गोड खावसं वाटलं तर एखादं फळ खायला सुरुवात करा. केळ्याने तुम्हाला पटकन एनर्जी मिळते. सफरचंद, कलिंगड किंवा अन्य तुम्हाला आवडतील ती फळं खा. म्हणजे आपोआपच क्रेव्हिंग कमी होईल.

आणखी वाचा : भारतीय लष्करात नारी शक्ती! १०८ महिला अधिकाऱ्यांना मिळणार कर्नलपद

केचअप खाऊ नका
खरंतर आपल्याकडे चिंचगुळाची घरी केलेली चटणी ही कोणत्याही स्नॅक्सबरोबर चांगली लागते. पण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच हल्ली टोमॅटो सॉस किंवा केचअप अगदी फेव्हरिट आहे. टोमॅटो केचअपमध्ये खूप जास्त प्रमाणात सा खर असते हे तुम्हाला माहिती आहे का? केचअपमुळे एखाद्या पदार्थाची लज्जत वाढते पण त्यामुळे साखरही पोटात जाते. कित्येकदा करायचा कंटाळा येतो म्हणून आपण चटणीऐवजी सॉस घेतो. पण त्याऐवजी चिंचगुळाची चटणी करून फ्रिजमध्ये ठेवल्यास ती चांगली टिकतेही आणि तयार असल्याने वेळही जाणार नाही.

साखरेऐवजी पर्याय शोधा
सकाळी घाईगडबडीत वेळ नसतो म्हणून आपल्यापैकी अनेकजणी कॉर्नफ्लेक्ससारखा ब्रेकफास्ट करत असतील. यामध्ये थोडीशी गोड चव म्हणून साखर अनेकांना आवडते. पण दलिया, ओट्स किंवा कॉर्नफ्लेक्समध्ये साखरेऐवजी ड्रायफ्रूटस् घाला. खजूर, मनुका, बेदाणे, सुकं अंजीर याच्याबरोबर नाश्ता करा. तुम्हाला एक एक पौष्टिक पर्यायही मिळेल. दूध पित असाल तर साखरेऐवजी त्यात खजूर घालून किंवा खारकेची पूड घालून दूध प्या.

आणखी वाचा : ‘ती’ने मासिक पाळीलाच पत्र लिहिले! ( भाग २ )

शीतपेयाऐवजी नारळपाणी
जाहिरातीत दाखवली जाणारी अनेक शीतपेये आपल्याला आवडत असतील. पण त्यामध्ये कार्बोनेटेड शुगर वापरली जाते. त्यामुळे एकाच वेळेस खूप जास्त प्रमाणात साखर पोटात जाते. तुम्हाला पेय आवडत असतील तर शीतपेयाऐवजी नारळपाणी , लिंबू सरबत प्या.

सहसा स्त्रिया आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाहीत. बहुतांश वेळा एकटीसाठी करायचा कंटाळा म्हणून जे उपलब्ध आहे ते खाल्लं जातं. पण याचमुळे साखरेचं प्रमाणही वाढतं. रोजच्या धावपळीत थोडासा वेळ काढा आणि हेल्दी खाणं खा. भाकरी, हिरव्या पालेभाज्या, दही, वेगवेगळ्या प्रकारच्या बिया, सुकामेवा हे नियमित खाणं स्त्रियांसाठी खूप गरजेचं आहे. वजनावर नियंत्रणं ठेवणे महत्त्वाचं आहे. नियमित व्यायाम, योगाभ्यास केल्यानेही शुगर क्रेव्हिंग कमी होतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अनेक स्त्रिया पुरेसं पाणी पित नाहीत. त्यामुळे काहीवेळेस डिहायड्रेशनमुळेही गोड खावंसं वाटतं. अशावेळेस काही खाण्याआधी एक ग्लास पाणी प्या. पुरेशी झोप घेणं हेही गोड खाण्यातं क्रेव्हिंग कमी करण्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्हाला तुमच्या आवडीचं गोड खाणं बंद करायचं नसेल तर वेळीच त्यावर नियंत्रण ठेवा. हेल्दी पर्याय शोधा म्हणजे सणावाराला गोडाधोडाचं खाताना अपराधी वाटणार नाही.

(शब्दांकन : केतकी जोशी)

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-01-2023 at 13:30 IST
Next Story
घटस्फोट म्हणजे रोग नव्हे!