किचन गार्डनसाठी कुंडीत किंवा परसबागेत पावसाळ्यात पालेभाज्या आणि फळभाज्यांचे बी पेरले तर साधारणपणे दोन ते तीन-चार महिन्यांत भाज्या तयार होतात. त्यासाठी खात्रीशीर दुकानातूनच चांगल्या वाणाचे बी घ्यायला पाहिजे. बी विकत घेताना त्याची ‘एक्सपायरी डेट’ किती आहे हे बघून घ्या. बी आणल्यानंतर ते लगेच पेरणे शक्य नसेल तर पाकिटावर कोणत्या झाडाचे बी आहे, केव्हा आणले याची नोंद करून ते कोरडय़ा जागेत, सावलीत ठेवा.
पावटा, वाल यांचे बी पावसाळ्यात आठ दिवसांतच रुजून वरती येते. यासाठी कुंडीमध्ये बोटाच्या दोन पेरांइतके खोल दोन गोल करा. परसबागेतल्या गादी वाफ्यावर दोन-तीन ओळी बोटाने किंवा खुरप्याने आखून घ्या. दोन ओळींत दोन ते तीन इंच अंतर ठेवा. त्यावर एक इंच अंतरावर कुंडीतल्यासारखेच गोल करून घ्या. प्रत्येक गोलात दोन बिया पेरा. वरून बारीक चाललेल्या खत-मातीचा किंवा पालेखताचा पातळ थर द्या. हल्ली बियाण्यांच्या दुकानात ‘डीओआरएस’ हे खत मिळते, त्याचा थर दिल्यास बिया लवकर रुजतात. पावटा, वाल यांच्या बिया रात्री पाण्यात भिजत टाकल्या तर त्या चांगल्या रुजतात. बिया पाण्यात टाकल्यामुळे फुगतात.
हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: लहान मुलांचा चष्मा
बियांवर कडेला एक पांढरी रेघ असते. रेघेच्या एका बाजूला थोडा फुगीर झालेला भाग असतो, त्याला ‘डोळा’ म्हणतात. त्यातून मूळ बाहेर येत असल्यामुळे हा ‘डोळा’ मातीत खालच्या बाजूला येईल अशा रीतीने बी पेरा, त्यामुळे बी रुजायला आणि मातीतून वर यायला फारशी आडकाठी येणार नाही. आठ दिवसांत बी रुजून वर येईल. बियांचे आवरण जरी तपकिरी, काळे असले तरी हिरव्या रंगाची पाने फुगीर, मांसल दले रुजून वर येतील. त्यांच्या मध्यभागातून पानांचे कोंब बाहेर येतील. अजून नवीन फूट यायला लागली की ही हिरवी दले वाळून जातील. त्यानंतर गादी वाफ्यावरची रोपे दुसरीकडे लावायची असल्यास लावता येतील. कुंडीत आलेली रोपे काढण्याची जरूर नाही. एकाच ठिकाणी दोन रोपे आली असतील तर त्यातले जोमाने वाढणारे आणि तरारलेले रोप तसेच ठेवा आणि दुसरे काढून एखाद्या मातीच्या पिशवीत किंवा कुंडीत लावा.
हेही वाचा… ग्राहकराणी: ऑनलाइन फसवणूक झालीय?
रोपाला पानाच्या दोन ते चार जोड्या येण्यासाठी निदान दोन आठवडे तरी लागतात. बी पेरल्यानंतर चार ते पाच आठवड्यांनंतर मातीत हळूहळू एकजीव होणारे थोडे खत घालावे किंवा खत पाण्यात घालून त्याची निवळी कुंडीत घाला. जास्त खत घालू नका, रोपांना इजा होऊ शकते. रोपांना आता आधाराची गरज लागते. त्यासाठी कुंडीत बांबूची काठी किंवा झाडाची बारीक फांदी रोवून ठेवा. काडी रोवताना रोपांच्या मुळांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्या किंवा बिया पेरल्यानंतर थोडय़ा अंतरावर तेव्हाच काठी रोवा. बी पेरल्यानंतर तीन-साडेतीन आठवड्यांत पानांच्या बेचक्यातून फुले येतात. पावटा, वाल यांची पाने त्रिदळी असतात. म्हणजे एका देठावर तीन पाने येतात. यांच्या बऱ्याच जाती असल्यामुळे त्यांना पांढऱ्या, जांभळ्या किंवा गुलाबी रंगाची फुले येतात. फुले आल्यानंतर महिना-दीड महिन्यांनी शेंगा येतात.
हेही वाचा… शिल्पाच्या ‘ऋषीच्या भाजी’च्या ‘वरातीमागून घोड्या’ची गोष्ट!
शेंगा कोवळ्या असताना त्याला ‘पावटा’ म्हणतात. त्याची भाजी करता येते. शेंगा तशाच झाडांवर वाळू दिल्या तर त्याचे ‘वाल’ हे कडधान्य होते. पावटा व वाल यांच्या अनेकविध प्रकारांचे वाण बाजारात मिळते. शेंगा सपाट, चपट्या, फुगीर, लुसलुशीत किंवा मांसल आणि विविधरंगी म्हणजे फिकट पांढरा, पोपटी, हिरवा, मातकट हिरवा, जांभळा, काळा अशा रंगांच्या असतात. आपल्याकडे अनेक स्थानिक जाती आहेत. पावटा आणि वाल यामधल्या बहुतेक सर्व जाती वेलीसारख्या वाढतात, पण काही झुडपांसारखेही प्रकार आहेत. भाजीचे वाल किंवा गार्डन बीन आणि डाळ किंवा कडधान्यांचे प्रकार, कोकणातल्या कडव्या वालाचे प्रकार किंवा जाती थोड्याफार वैशिष्ट्यांनुसार वेगवेगळ्या आहेत.