कपड्यांच्या खरेदीत- विशेषत: स्त्रियांच्या कुर्त्यांमध्ये आपला नेमका साईज ओळखणं तुम्हाला कितीही सोपं वाटलं तरी ते चांगलंच ट्रिकी आहे बरं! हा प्रश्न ऑनलाइन शॉपिंग’च्या बाबतीत विशेष भेडसावतो. कितीतरी स्त्रिया विविध ब्रॅण्डमधला आपला साइज नेमका कळत नाही म्हणून कपड्यांच्या ऑनलाइन शॉपिंगपासून पूर्णत: दूर राहातात. तोच कुर्ता प्रसंगी त्या दुकानात जाऊन दुप्पट किंमतीला घेतील (दुकानांपर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेत एकाच ब्रॅण्डच्या कपड्यांची दुकानं वा मॉलमधली किंमत आणि ऑनलाइन किंमत यात कायम फरक असतो.), परंतु ‘साइज’ निवडीच्या भीतीमुळे ऑनलाइन शॉपिंग करणार नाहीत!

ऑनलाइन शॉपिंग सोडाच, कधीकधी दुकानात जाऊन कपडे ‘ट्राय’ करतानासुद्धा साइजचा गोंधळ उडतो आणि निष्कारण वेगवेगळ्या साइजच्या ट्रायल्स घेत बसावं लागतं. प्रत्येक वेळी ट्रायल रूमच्या रांगेत थांबण्यातही वेळ जातो. शिवाय पुन्हा घरी आणून एकदा कुर्ता धुवून झाला की तो साइज पूर्वीसारखा फिट बसत नाहीये असं काही वेळा लक्षात येतं आणि हिरमोड होतो. आज आपण अशा काहीटिप्स आणि ट्रिक्स’ पाहूया, ज्या लक्षात ठेवल्यात तर ऑनलाइन आणि प्रत्यक्ष शॉपिंगमध्येही तुम्ही कुर्त्याचा नेमका साइज ओळखण्यात पटाईत व्हाल.

Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
Loksatta chaturanga Fat phobia women mentality
स्त्री ‘वि’श्व: फॅट फोबियाच्या चक्रात स्त्रिया?
how to choose healthy breakfast health expert told
७० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांच्या नाश्त्यात पौष्टिकतेचा अभाव; पौष्टिक नाश्ता कसा निवडावा? आहारतज्ज्ञ सांगतात…
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

मटेरिअल पाहा
कुर्त्यांसाठीचा आपला साइज पाहताना आपण ‘बस्ट साइज’ मोजतो. उदा. बस्ट- ३६, बस्ट- ३८ अशा प्रकारे. जवळपास प्रत्येकीला आपला बस्ट साईज माहिती असतोच. कुर्त्यांचे स्टॅण्डर्ड साइज ‘एक्स्ट्रॉ स्मॉल म्हणजे बस्ट-३२’, ‘स्मॉल म्हणजे बस्ट-३४’ असे सुरू होतात. असं करत करत ‘डबल एक्सेल म्हणजे बस्ट-४२’ आणि ‘थ्री-एक्सेल म्हणजे बस्ट- ४४’ असे साइज असतात. आता आपल्या बस्ट साइजनुसार स्मॉल, मिडियम, लार्ज, एक्स्ट्रा लार्ज… कोणत्या साइजमध्ये बसू हे सहज समजेलच. खरी ट्रिक पुढेच आहे.

कुर्त्याचं मटेरिअल कॉटन असेल, तर पहिल्या काही धुण्यांमध्ये तो थोडा थोडा आकसतो. म्हणजेच तुम्ही जरी तुमचा साईज मिडियम- म्हणून मिडियम साइजचा कुर्ता घेतलात तर पुढे तो आकसून साइज थोडा कमी होतो आणि ज्या स्त्रियांचा बस्टचा किंवा हिप्सचा भाग थोडा ‘बल्की’ असतो त्यांना तिथे तो आधीपेक्षा घट्ट बसू लागतो. अर्थात काही कॉटन्समध्ये कपडा खूप आटतो, तर काही कॉटन कमी आटतात. कुठलं कॉटन जास्त आटू शकेल हे मात्र तुम्हाला हाताळून हळूहळू लक्षात येऊ लागतं. मात्र `ग्राऊंड रूल’ म्हणजे कॉटनमध्ये कधीही अगदी परफेक्ट बस्ट साईजचा कुर्ता घेऊ नये. नेहमी एक साइज वरचा कुर्ता घ्यावा, म्हणजे धुवून आकसल्यानंतर तो कपडा तुमच्या खऱ्या बस्ट साइजनुसार फिट होईल. रोजच्या वापरासाठी बहुतेक स्त्रिया अंगाला फिट्ट बसणारे कपडे न निवडता किंचित लूज फिट कपड्यांना प्राधान्य देतात. त्यांना ही ट्रिक निश्चित उपयुक्त ठरेल.

कॉटन ब्लेंड मटेरिअल म्हणजे जे प्युअर कॉटन नाही, त्यात इतर धागा मिक्स आहे असं मटेरिअल. असा कपडा धुतल्यावर कॉटनइतका आकसत नाही, हे लक्षात ठेवा.

कॉटनची ठेवावी लागणारी बडदास्त (इस्त्री-बिस्त्री) आणि कॉटन तुलनेनं महाग असणं यामुळे बहुसंख्य स्त्रिया रोजच्या वापरासाठी व्हिस्कॉस रेयॉन आणि पॉलिस्टर मटेरिअल्स निवडतात. ही मटेरिअल्स धुतल्यावर अजिबात आटत नाहीत. त्यामुळे घेतानाच आपल्या नेमक्या बस्ट साईजचा कुर्ता घ्यावा.

सिल्क आणि चंदेरी मटेरिअल्सही दर्जा आणि त्यातल्या इतर फॅब्रिकच्या मिक्सिंगनुसार धुतल्यावर कमी-जास्त आटू शकतात. मात्र ते कॉटनइतके निश्चितच आकसत नाहीत, हे लक्षात ठेवा. शिवाय बहुतेक जणी अशा मटेरिअल्सचे सणासुदीला घातले जाणारे कुडते ड्राय क्लीन करून घेतात. त्यामुळे यातही परफेक्ट बस्ट साइजचा कुर्ता घेतला तर उत्तम. मात्र यात एक टिप नेहमी लक्षात ठेवा- चंदेरी वा सिल्क कुर्त्याला लावलेलं अस्तर कोणत्या कापडाचं आहे ते पाहायला विसरू नका. अस्तर भरपूर आटणाऱ्या कॉटनच्या कापडाचं असेल, तर घरी पाण्यानं कुर्ता धुतल्यावर अस्तर खूप आकसलेलं आणि वरचा कुर्ता कमी आकसलेला असं होऊन कुर्त्याला झोळ आल्यासारखा दिसतो. यामुळे घातल्यावर कुर्त्याचा साईज आणि फिट बिघडतो. ब्लेंड कॉटनचं अस्तर कमी आटेल आणि सिंथेटिक अस्तर अजिबात आटणार नाही.

कुर्त्याच्या उंचीनुसार साइज आणि फिट वेगळा
साईड कट असलेले कुडते वेगवेगळ्या उंचीचे असतात, ते असे- साधा नी लेंग्थ, अबॉव्ह नी लेंग्थ (यालाच कुर्ती म्हणतात. ट्युनिक प्रकारचे कुर्तेही याच अबॉव्ह नी लेंग्थ उंचीचे.) आणि पोटरीपर्यंत वा आणखी खाली रुळणारा बिलो नी लेंग्थ कुर्ता.

आता एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, की कुर्ता घेतानाचा साइज चार्ट जरी बस्ट साइजनुसार देण्यात येत असला, तरी कुर्त्यांच्या उंचीप्रमाणे आपल्याला आपला हिप साईज लक्षात घेऊन कुर्ता निवडावा लागेल. बहुसंख्य भारतीय स्त्रिया शरीराच्या वरच्या भागात फारशा बल्की नसल्या, तरी हिप्सचा भाग अंमळ जाड- बल्की असतो. अशा वेळी कुर्ती, ट्युनिक, अबॉव्ह नी आणि नी लेंग्थ प्रकारच्या कुर्त्यात तुमच्या बस्ट साइजनुसार घेतलेला कुर्ता फिट होईल. मात्र कुर्ता बिलो नी असेल आणि तुम्ही हिप्सच्या भागात थोड्या जाड असाल, तर बस्ट साइज पाहून घेतलेला कुर्ता हिप्सवर खूप घट्ट होऊ शकेल. त्यामुळे आपले हे दोन्ही साइज काय आहेत, ते डोक्यात ठेवून खरेदी केलेला कुर्ता ‘कम्फर्टेबली’ बसेल.

लक्षात ठेवा
आपण मॉडेल्सइतक्या उंच नसतो!
विशेषत: ऑनलाईन शॉपिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी- ती अशी, की ऑनलाईन शॉपिंग ॲप्सवर दाखवलेले मॉडेल्सचे फोटो नेहमीच हाय हील्स घालून काढलेले असतात. शिवाय मॉडेल्स आपल्यापेक्षा उंच, ढंगाळ्या असतात. त्यामुळे जो कुडता तिथल्या चित्रात नी-लेंग्थ दिसतो तो आपण सामान्य उंचीच्या स्त्रियांनी घातल्यावर गुडघ्याच्या आणखी खाली पोहोचतो आणि यावर साइज आणि फिट निश्चितपणे अवलंबून असतो. ऑनलाइन शॉपिंग करताना ही टिप लक्षात ठेवलीत तर कुर्त्याची उंची आपण घातल्यावर नेमकी किती दिसेल हे तुमच्या लगेच लक्षात येईल आणि त्यानुसार घ्यायचा साइज ठरवणं सोपं जाईल.

अनारकलीची बातच वेगळी!
अनारकली कुर्त्यांमध्येही नुसता बस्ट साइज मोजून कुडता घ्यायचा नसतो हे तुम्हाला माहीत आहे का? अनारकली कुर्ता हा कमरेपर्यंत व्यवस्थित फिट बसणारा आणि खाली फ्रॉकसारखा घोळदार असतो. त्यामुळे जवळपास सर्व ब्रॅण्डस् मध्ये अनारकली कुर्त्यात तुम्हाला बस्ट साइजपेक्षा एक साइज आतला घ्यावा लागतो (म्हणजे साध्या कुर्त्यांत तुम्ही ‘साइज एल’ असाल, तर अनारकली पॅटर्नमध्ये ‘एम साइज’ बहुतेकींना चांगला बसेल.). नाहीतर तो ओव्हरसाइज्ड दिसतो.

मात्र यातही तुमचा बस्ट आणि हिप साइज दोन्हीचं तारतम्य ठेवावं लागेल. म्हणजे बल्की स्त्रियांना कदाचित ही टिप लागू पडणार नाही. शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे अनारकलीचं कापड धुतल्यावर आटणार आहे का, याचं भानही डोक्यात असू द्या.