एक काळ असा होता की शाळेसाठी तिला चार-चार किलोमीटर पायी चालत जावं लागायचं. रोज मिळणाऱ्या तुटपुंज्या मजुरीतून घरच्या गरजा भागवायच्या की मुलांचं शिक्षण करायचं हा तिच्या आईवडिलांचा संघर्ष तिनं पाहिला होता… म्हणूनच ही परिस्थिती बदलायची ही खूणगाठ तिनं लहानपणीच मनाशी बांधली होती. त्यासाठी शिक्षणाची साथ कधीच सोडायची नाही हेही तिनं पक्क ठरवलं होतं. त्याप्रमाणे तिनं ध्येयाची साथ सोडली नाही. त्यामुळेच आज आर्थिक स्थिरतेबरोबरच मान-सन्मानही तिच्या वाट्याला आले आहेत. ती आहे श्रीधन्या सुरेश… केरळमधील कासारगोड जिल्ह्याची कलेक्टर म्हणून काम पाहत आहेत. ही कहाणी फक्त एका मुलीच्या युपीएससी पास होण्यासाठीच्या संघर्षाची कहाणी नाही, तर एका आदिवासी मुलीच्या अथक मेहनतीची आणि यशाची गाथा आहे. प्रचंड प्रतिकूल परिस्थिती असताना, मर्यादित साधने उपलब्ध असतानाही मनाशी ठरवलं तर काय करता येऊ शकतं याचं हे उदाहरण आहे.

श्रीधन्या सुरेश या केरळमधील वायनाड येथील कुरिचिया आदिवासी समाजातील पहिला महिला कलेक्टर आहेत. प्रचंड आर्थिक, सामाजिक संघर्ष करत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. खरं तर शाळेत जाणं हेच त्यांच्यासाठी एक स्वप्नं होतं. रोजचा दिवस कसा भागवायचा असा प्रश्न तिच्या पालकांपुढे असला तरीही त्यांनी त्यांना शाळेत पाठण्याचा निर्णय घेतला. आजूबाजूला शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा मिळेल अशी कोणतीही गोष्ट त्यांच्या लहानपणी नव्हती. मुलांना शाळेत पाठवण्याऐवजी मजुरीसाठी पाठवलं तर त्यांना मिळणाऱ्या दोन पैशांतून घर तरी चालेल अशी परिस्थिती असतानाही श्रीधन्याच्या आईवडिलांनी त्यांचं शिक्षण थांबवलं नाही. त्यांच्याबरोबर ते उभे राहिले त्यामुळेच त्यांचं स्वप्न ती पूर्ण करू शकली.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळाने श्रीधन्या अनुसूचित जाती विकास विभागात रुजू झाल्या. तेथील उपजिल्हाधिकारी श्रीराम सांबशिवा राव यांना मिळणारा मान, आदर पाहून तिला जाणवलं की आपल्याला हेच हवं आहे. त्यासाठी युपीएससी हाच एकमेव मार्ग होता आणि त्या मार्गावरून चालण्यासाठी कितीही प्रयत्न करण्याची तिची तयारी होती. युपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी अनेक विद्यार्थ्यांना कितीतरी गोष्टी अगदी सहज मिळतात. पैशांपासून ते आरामदायी खोल्या, हवी ती पुस्तकं, क्लासेस, मार्गदर्शन. श्रीधन्याकडे हे काहीच नव्हतं. अर्थातच तिचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. तिच्या समुदायात, आजूबाजूला फारसे शिकलेले लोकच नव्हते. स्पर्धा परिक्षांची तयारी म्हणजे काय इथपासून त्यांना सगळी माहिती करून घ्यावी लागली. पण त्यांच्या स्वप्नांच्या दिशेनं त्यांनी सातत्यपूर्ण आणि अजिबात विचलित न होता वाटचाल सुरू ठेवली. जीव तोडून २०१९ मध्ये युपीएससीची परीक्षा दिली. मेहनतीचं फळ मिळालं. त्या फक्त उत्तीर्णच झाल्या नाहीत, तर ऑल इंडिया ४१० वा रँक मिळवून श्रीधन्यानं केरळमधील पहिल्या आदिवासी महिला आयएएस अधिकारी होण्याचा इतिहासही रचला. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या अधिकाऱ्यांमुळे त्यांना सिव्हील सर्व्हिसेसमध्ये जायची प्रेरणा मिळाली होती. त्याच अधिकाऱ्यांबरोबर त्यांना काम करण्याची संधी मिळाली. युपीएससी पास झाल्यावर त्या कोझिकोडेमध्ये त्याच अधिकाऱ्यांबरोबर असिस्टंट कलेक्टर म्हणून रुजू झाली.

हे ऐकायला स्वप्नवत वाटत असलं तरी तो प्रवास श्रीधन्यासाठी परीक्षेचाच होता. खरं तर युपीएससीची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर दिल्लीला मुलाखतीसाठी जाण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. अशावेळेस त्यांचा मित्रपरिवार त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला. त्यांच्या मदतीने त्यांनी दिल्ली गाठली आणि आयुष्यातील सगळ्यांत महत्त्वाचा टप्पाही यशस्वीरित्या पार पाडला. आता त्या मानाच्या खुर्चीवर बसून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतात. पण या खुर्चीपर्यंत येण्यासाठी त्यांना एकेकाळी ४ किलोमीटर पायी चालावं लागायचं हे त्या विसरलेल्या नाहीत. काहीजण परिस्थितीपुढे हार मानतात आणि लढाई सुरू होण्याआधीच शरण जातात. तर काहीजण मात्र परिस्थितीलाच आपली ताकद बनवतात. श्रीधन्या सुरेशची यशोगाथा ही त्यातलीच एक आहे.