स्वप्निलच्या लग्नासाठी अजितराव, अनिता ताई आणि अवनी तिघेही आले होते. आत्याच्या घरी अवनी नेहमीच यायची. लहानपणापासून आत्याचं आणि तिचं नातं म्हणजे एक वेगळंच समीकरण होतं.

अवनी प्रत्येक गोष्ट आत्याला सांगायची. तिचं लहानपण आत्याजवळ गेलं. ती पाच वर्षांची झाली तेव्हा आत्याचं लग्न झालं. तोपर्यंत ती आत्याजवळच असायची. मोठी झाल्यावरही ती प्रत्येक गोष्ट आत्याला सांगायची; पण एवढ्या सहा महिन्यांत ती आत्याकडे आलीच नव्हती. आज आत्येभाऊ स्वप्निल याच्या लग्नाला आल्यानंतर अवनी नेहमीसारखी आत्याला मिठी मारून तिच्या गळ्यात पडली नाही. लग्नघर म्हटल्यावर सगळेच आपल्या कामात बिझी होते, आत्या तर कामात बुडून गेली होती. अवनीने तिचं आणि आईबाबांचं सामान आतल्या रूममध्ये नेऊन ठेवलं आणि ती त्या रूममध्ये जाऊन एकटीच बसून राहिली.

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…

हेही वाचा – आहारवेद: आरोग्यदायी लोणी

“दादा, वहिनी, तुम्ही अवनीला घेऊन लवकर आलात ते बरंच झालं. मला आता तिची मदत होईल. आपल्या घरातील प्रमुख उत्साही प्राणी आल्यामुळे आता सगळं कार्य अगदी उत्साहात होणार. अरे पण, आहे कुठे ती? ती ‘आत्या’ म्हणून आज माझ्याजवळ कशी आली नाही?” आत्यालाही आज तिचं वागणं जरा विचित्रच वाटलं.

“सुधा, अगं आपली अवनी आता खूप बदलली आहे. तिचा आणि राकेशचा घटस्फोट झाल्यानंतर, ती सर्वांपासून दूरच राहते. तिनं स्वतःला इतकं बिझी करून घेतलंय, की कोणाशी बोलायलाही तिला वेळ नसतो. ती तिच्या कामातच मग्न असते. सुट्टीच्या दिवशीदेखील काही तरी काम काढून बाहेर जाते. कोणत्याही कार्यक्रमाला आमच्या सोबत येत नाही. नातेवाईकांना भेटायला टाळाटाळ करते. जुन्या मैत्रिणींनाही जाऊन भेटत नाही. शेजाऱ्यांनी काही बोलू नये, काही विचारू नये म्हणून त्यांना चुकवून घरी येते. तिच्यातील सर्व चैतन्य हरवून गेलंय गं. आजसुद्धा ती आमच्यासोबत येण्यास तयार नव्हतीच. कसं तरी तिला तयार करून आणलं आहे. तुझ्याशी तरी काही बोलते का बघ.” अजितराव बहिणीकडे आपलं मन मोकळं करीत होते.

सहा महिन्यांपूर्वी अवनी आणि राकेश यांचा घटस्फोट झाला. मागील दोन वर्षांपासून ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. राकेशचे व्यसन आणि बेताल वागणं यामुळं त्याच्यासोबत राहणं अवनीला अशक्य झालं होतं, पण तो घटस्फोट देण्यासही तयार नव्हता, म्हणूनच न्यायालयात प्रकरण दाखल करून घटस्फोट करवून घ्यावा लागला. या सर्व प्रक्रियेतून जात असताना अवनीला खूपच त्रास झाला. तिची मानसिकताच बदलून गेली होती. आजही ती कोणाशीच बोलत नव्हती.

सुधाआत्या रूममध्ये आली तेव्हा अवनी एकटीच खिडकीत उभी होती आपली अवखळ, हसरी, खेळकर, उत्साही, सर्वांना हवीहवीशी वाटणारी अवनी कुठं तरी हरवून गेली आहे हे आत्याला जाणवलं. तिला बोलतं करण्याचा ती प्रयत्न करू लागली.

“अवनी, बरं झालं तू आलीस. स्वप्निलच्या लग्नाची अजून केवढी तयारी बाकी आहे. आज संध्याकाळी मेहंदी आणि संगीत आहे. कोणती सजावट करायची? थीम कोणती ठेवू, हे सगळं तू आल्याशिवाय ठरतंच नव्हतं. सांग ना काय करू या?”

“आत्या, माझी तब्येत बरी नाहीये, तुम्ही ठरवून घ्या. मेहंदी आणि संगीतसाठी मी येऊ शकणार नाही. मला एकटीला ठेवून आईबाबा यायला तयार नाहीत, म्हणून मला यावं लागलं.”

“अवनी, तुला कोणताही आजार झालेला नाही, तुझी मानसिकता बिघडली आहे. किती दिवस त्यात राहणार आहेस? बाहेर पड त्यातून. जे सत्य आहे ते तुला स्वीकारावंच लागणार आहे.” हे ऐकल्यावर अवनी चांगलीच भडकली, “हो, माझं लग्न मोडलंय, हे सत्य मी स्वीकारलं आहे आणि ते लग्न मीच मोडलं आहे. पुन:पुन्हा तुम्ही सगळं हेच सांगू नका; पण माझ्याच आयुष्यात हे का? माझं दुःख तुम्हाला कोणालाच कळणार नाही, कारण ज्याचं जळतं त्यालाच हे कळतं. तुमच्या सगळ्यांचे संसार चांगले चालू आहेत.”

अवनी बरंच काही बोलत होती. मोकळं होणं, तिच्यासाठी गरजेचं होतं. सुधा आत्याने तिला जवळ घेतलं, तिला मोकळेपणाने रडू दिलं.

“आत्या, अगं म्हणूनच मी इथं येत नव्हते. घरात लग्नाचा मंगल प्रसंग आणि मी येऊन रडारड करणार. माझ्यासारख्या अभागी व्यक्तीचं सावटसुद्धा स्वप्निलच्या वैवाहिक आयुष्यावर नको, असं मला वाटतं, म्हणूनच लग्नाच्या कोणत्याही कामात मला घेऊ नकोस.”

“अवनी, अगं तू चांगली शिकलेली, स्वतःच्या पायावर उभी असलेली कर्तबगार तरुणी आहेस आणि हे असले विचार करतेस? जगात घटस्फोट झालेली तू एकच व्यक्ती आहेस का? तुझ्यापेक्षा अनेक कटू प्रसंगांतून गेलेल्या मुली आहेत, त्यांनी स्वतःला सावरून आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केलेली आहे आणि केवळ ‘लग्न’ हेच आपलं आयुष्य नाही. लग्नाच्या यशस्वितेवर आपल्या आयुष्याची यशस्विता ठरत नाही. ज्या गोष्टींमुळे तुझ्या जगण्यात, आयुष्यात अडथळे येत होते, तो मार्ग फक्त तू बदलला आहेस. रस्ता चुकला म्हणून आपण इच्छित स्थळी जाण्याचं थांबतो का? एक रस्ता चुकला, तरी आपण नवीन रस्ता शोधून काढतो आणि ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे, तिथं आपण पोहोचतोच ना? घटस्फोट झाला, याचं अवडंबर तू करू नकोस आणि लोक काय म्हणतील, याचा विचार तर अजिबात करू नकोस. आपल्याला जे योग्य वाटलं, आपल्यासाठी जे चांगलं आहे, ते आपण केलं. आपल्या आयुष्यात दुसऱ्याला घुसखोरी का करून द्यायची? आपलं आनंदी होणं आणि आपलं दुःखी होणं हे आपल्याच हातात असतं. आयुष्यात खूप गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. जे होऊन गेले त्याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला पुढं काय करायचं आहे, याचा विचार करणं महत्त्वाचं. तुझ्या आयुष्यात त्या एका नात्यापेक्षा किती तरी वेगळी नाती आहेत. ज्या व्यक्ती तुझ्यावर प्रेम करतात, ज्यांना तुझ्या आयुष्यात तू पुढं जावंसं असं वाटतं, त्या सर्व नात्यांपासून लांब का राहतेस? जे नातं आता अस्तित्वातच नाही, त्या नात्याला एवढं महत्त्व का देतेस? तुझा आनंद तू मिळवायचा आहेस, तो कोणावरही अवलंबून नाही. मला तर वाटतं, त्या अवघड परिस्थितीतून तुझी सुटका झाली म्हणून आपण सेलिब्रेशन करू.”

आत्या बोलत होती आणि अवनी सगळं ऐकत होती. तिच्याही मनातलं तिनं बोलून टाकलं होतं, त्यामुळं ती मोकळी झाली होती. म्हणूनच काही तरी ऐकून घेण्याची तिची क्षमता वाढली होती. आत्याचं बोलणं चालू असतानाच तिनं डोळ्यांतील आसवं मागे सारली आणि आत्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, “माझी आत्यु, खरंच, तुझ्याएवढं मला कोणीच ओळखत नाही. तू माझी मितवा आहेस. चल, काय काय करायचंय ते मला सांग. तुझी भाची असताना, ‘टेन्शन कायकु लेनेका?’ आज तर मी माझ्या स्वातंत्र्याचं जाहीर निवेदन करणार आहे आणि नव्यानं आयुष्याची सुरुवात करणार आहे.”

हेही वाचा – बाई गं, तू इतका ताण घेऊ नकोस!

आणि खरंचच, जळमटे झटकून टाकावीत तशी नैराश्याच्या विचारातून ती बाहेर आली. तिची आणि स्वप्निलची चेष्टामस्करी सुरू झाली. मेहंदीच्या कार्यक्रमात कोणता ड्रेस घालायचा आणि कोणत्या गाण्यावर डान्स करायचा, याचं प्लॅनिंग सुरू झालं.

तिची लगबग बघून अजितराव, अनिता ताई आणि सुधा आत्याने डोळ्यांत आलेले आनंदाश्रू सावरले. आपली अवनी आपल्याला परत मिळाली, याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

(लेखिका कुटुंब न्यायालयात समुपदेशक आहेत.)

(Smitajoshi606@gmail.com)