सुचित्रा प्रभुणे
सारा सनी ही वकील तरूणी बोलू शकत नाही. पण तिने सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून दुभाषाच्या सहाय्याने आपले मुद्दे मांडले आणि सर्वजण कौतुकाने भारावून गेले…




कोर्टात एखादी केस लढवणे हे काही वाटते तितके सोपे काम नाही. कारण तुमचा मुद्दा ठामपणे आणि तितक्याच जोरदार आवाजात मांडावा लागतो. आवाजातील चढउतारांची ही कसरत प्रत्येक वकिलाला करावी लागते. पण समजा लढणारा वकील ही जर एखादी मूक व्यक्ती असेल, तर केस लढण्याचे आवाहन ती पेलू शकेल का?… सारा सनी हिची कहाणी ऐकल्यानंतर या प्रश्नांनामागचा अर्थ तुम्हाला समजेल.
सारा सनी ही भारतातील पहिली अशी मूक (कर्णबधिर) वकील आहे, जिने सर्वोच्च न्यायालयात प्रतिनिधित्व केले आहे; तेदेखील ‘साईन लॅग्वेज इंटरप्रीटर’च्या मदतीने. बंगळूरू येथील एका सामान्य कुटुंबात साराचा जन्म झाला. ती आणि तिची जुळी बहिण जन्मत:च मूक आहेत. पण आपल्या मुलींच्या शारीरिक व्यंगाचा मोठा बाऊ कधीही त्यांच्या पालकांनी केला नाही. इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणेच त्यांना शिक्षण दिले. साराने बी.कॉम. करून पुढे कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. कायद्याचे शिक्षण घेत असताना तिला मानवाअधिकार, घटनात्मक कायदे आणि दिव्यांगासाठी असलेले कायदे, यात प्रचंड रस होता. त्यामुळे ती या प्रकारच्या कायदेविषयक काम करणाऱ्या चळवळीत सहभागी झाली.
हेही वाचा >>> हॉकीवाली सरपंच!
कायदेविषयक शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर कोर्टात केस लढवण्यासाठी इतर वकिलांप्रमाणेच तीही उत्सुक होती. पण मुख्य अडचण होती, ती बोलण्याची. त्यातच जिल्हा न्यायालयाने तिला इंटरप्रीटर घेण्यास नकार दिला. कारण त्यांच्या मते इंटरप्रीटरला कायद्याचे तितकेसे ज्ञान नसते. याचा केस लढताना परिणाम होऊ शकतो. पण अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात एक ऐतिहासिक निर्णय दिला, की एखादा मूक वकील केस लढवण्यासाठी इंटरप्रीटरची मदत घेऊ शकतो. हा निर्णय नुसताच ऐतिहासिक नाही, तर सारासाठी तो स्वप्न प्रत्यक्षात येण्याचा क्षण ठरला.
सारा सांगते, ‘त्या दिवशी मी खूपच उत्साहित झाले होते. सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर उभे राहून मुद्दे मांडताना खूप छान वाटत होते. आपणही हे सहज करू शकतो, असा आत्मविश्वास मनात निर्माण झाला होता. त्या वेळी मी आणि माझ्या पालकांनी घेतलेल्या मेहनतीचे चीज झाल्यासारखे वाटले. याआधी वेगवेगळ्या न्यायालयांत मी माझ्या केसमधील सारे मुद्दे लेखी स्वरुपात सादर करीत असे.’
साराचे शिक्षण ज्या शाळेत झाले, ती शाळा कर्णबधिर मुलांची नव्हती. त्यामुळे लिखाणाच्या माध्यमातूनच साराचा इतरांशी संवाद चालत असे. जिथे जिथे अडचण येई, तिथे ती पालकांची मदत घेत असे. मग लिखाणाचा सतत सराव करून तो विषय समजून घेत असे. अशा तऱ्हेने आपल्यामधील कमतरतेचा फारसा बाऊ न करता साराने आपले शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.
हेही वाचा >>> आत्या, मामा, काका, ही नाती गायब होतील का?
साराची जुळी बहिण मारिया आणि मोठा भाऊ प्रतीक हेही मूक आहेत. मारिया एका सीए कंपनीत प्रशिक्षण घेत आहे, तर मोठा भाऊ अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत होता. आता तो एका कर्णबधिरांच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज ही तीनही मुले आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत, कारण त्यांच्या आई -वडिलांनी त्यांना तसे घडवले आहे. आपल्या शारीरिक व्यंगावर मात करून आयुष्यात सकारात्मक विचारांच्या जोरावर कसे पुढे जायचे, याचे धडे त्यांनी लहान वयातच आपल्या मुलांच्या मनावर बिंबवले.
सुरुवातीपासूनच साराला वकिली क्षेत्राचे आकर्षण होते. त्यातच वेगवेगळ्या ठिकाणी इंटरर्नशिप करताना तिला अनेक कायद्यात्मक बाबींचे सखोल ज्ञान मिळाले. त्यामुळेच एखाद्या धोरणस्वरूप गोष्टीवर संशोधन करताना त्यात कायदा कशी महत्त्वाची भूमिका साकारतो, याचा खूप जवळून अभ्यास करता आला. यातून पुढे तिला दिव्यांगांसाठी योग्य कायदे असावेत यासाठी लढण्याची प्रेरणा मिळाली. या साऱ्या प्रवासात तिला प्रोत्साहन देणारे अनेक वकील मिळाले. त्यात प्रामुख्याने संचिता एन. यांचा उलेल्ख करायला ती विसरत नाही. कारण सर्वोच्च न्यायालयात त्यांनी तिचे मुद्दे न्यायधीशांसमोर सादरीकरण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात, तेव्हा देव तुमच्यासाठी एक खिडकी आवर्जून उघडतो, असं म्हणतात. अशा उघडलेल्या खिडकीकडे सकारात्मक दृष्टी ठेवून वाटचाल केली, तर ती व्यक्ती निश्चितपणे यशस्वी होते, हे सारा सनीच्या उदाहरणातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
lokwomen.online@gmail.com