ज्ञानदेव बाबाराव नजान
माधुरी रांची या शहरातून स्वतःची चित्रपट क्षेत्रात ओळख निर्माण करण्याच्या स्वप्नासह मुंबईत दाखल झाली होती. घरातील सर्व खर्चाची जबाबदारी तिच्या आईवर होती. वडील नसल्यामुळे कुटुंबाची आर्थिक जबाबदारी मोठ्या प्रमाणावर माधुरीवरच होती. त्यामुळे यश मिळवणं आणि जबाबदारी या दोघांचाही तिच्या मनावर ताण होताच.

मुंबईत आल्यानंतर तिला मित्रांचा चांगला आधार मिळाला. वेगवेगळ्या क्षेत्रांत स्त्रिया आज उत्कृष्ट काम करत आहेत, यात काहीही शंका नाही. मात्र, चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण करणे हे सहजसोपे नव्हते. काम मिळवण्यासाठी माधुरीला दिवसेंदिवस अनेक ऑडिशन्स द्यावी लागत होती. ज्युनिअर आर्टिस्ट असल्यामुळे तिला मिळणारे काम अनियमित होते आणि मोबदल देखील कमी होता. राहणं, खाणं आणि इतर दैनंदिन खर्च मुंबईसारख्या शहरात भागवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं होतं.

तिला मिळणारे मानधन वेळेवर मिळत नसे. अनेकदा मानधनासाठी आठवडे, कधी कधी महिनोन् महिने वाट पाहावी लागे. उशिरा येणारे पैसे आणि मुंबईची खर्चिक जीवनशैली यामुळे तिची मोठी मानसिक आणि आर्थिक ओढाताण होत होती. महिन्याच्या शेवटी तिच्याकडे काहीही शिल्लक राहत नसे. पुढच्या महिन्यात पैसे मिळतील, याची खात्री असायची; परंतु महिन्याच्या शेवटाचा आर्थिकदृष्ट्या कठीण काळ तिला सहन होत नव्हता.

माधुरी स्वभावाने खमकी, आत्मविश्वासू आणि स्वतःच्या पायावर उभी राहिलेली मुलगी होती. त्यामुळे कोणत्याही मित्राकडे पैसे मागण्याचे धाडस तिने केले नाही. स्वतःचा खर्च भागवतानाच तिला घरच्या आईलाही थोडीफार आर्थिक मदत पाठवावी लागत होती. अशा परिस्थितीत तिने बँकेतून वैयक्तिक कर्ज (Personal Loan) काढण्याचा निर्णय घेतला. मात्र सरकारी बँकांमधील क्लिष्ट प्रक्रिया, लागणारी अनेक कागदपत्रे आणि वेळखाऊ पद्धती यामुळे ते शक्य झाले नाही. खाजगी बँकांमध्येही परिस्थिती फार वेगळी नव्हती. शेवटी तिला सतत मोबाईलवर येणाऱ्या ‘झटपट लोन’च्या जाहिराती आठवल्या. कमीत कमी कागदपत्रांत आणि त्वरित कर्ज देण्याचे आमिष त्या जाहिराती देत होत्या. माधुरीने एका जाहिरातीतील वेबसाईटवर जाऊन एक मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड केले.

तिला एकच तोटा दिसत होता- ३६% व्याजदर. हा दर सरकारी किंवा खाजगी बँकांच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट होता. मात्र तिला वाटले की ही रक्कम फार कमी कालावधीसाठी लागणार आहे, म्हणून तिने सगळा हिशोब मनात ठरवून ॲप्लिकेशन इन्स्टॉल केले. ॲप्लिकेशन इन्स्टॉल करताना तिने अनेक परवानग्या (Permissions) दिल्या- जसे की Contacts, SMS, Storage, Photos इत्यादी. पाच ते दहा हजार रुपयांचे वैयक्तिक कर्ज आणि त्यावर ३६% व्याजदर असला तरी पैसे लगेच खात्यात जमा होणार होते.

तिने आपली वैयक्तिक माहिती आणि बँक खात्याचा तपशील ॲप्लिकेशनमध्ये भरला आणि दहा हजार रुपयांची गरज असल्याचे नमूद केले. काही मिनिटांतच तिच्या बँक खात्यात दहा हजार रुपयांऐवजी नऊ हजार रुपये जमा झाले. उरलेले एक हजार रुपये प्रोसेसिंग फी म्हणून कापल्याचे तिला सांगण्यात आले, आणि तिला ते योग्य वाटले. अवघ्या पंधरा-वीस दिवसांतच माधुरीने सगळी रक्कम ॲप्लिकेशनद्वारे भरून कर्ज बंद केले. मात्र पैसे पूर्ण भरल्यानंतरही तिला एक संदेश आला की मुद्दल आणि त्यावरील व्याज पूर्णपणे मिळालेले नाही. माधुरी पूर्णपणे गोंधळून गेली. तिच्यावर सतत संदेशांचा भडीमार सुरू झाला. पैसे उकळण्यासाठी धमक्या दिल्या जाऊ लागल्या. तेव्हाच तिला लक्षात आले की आपण सायबर गुन्ह्याच्या दलदलीत अडकलो आहोत. त्या लोकांनी तिला सांगितले की ॲप्लिकेशनने तिच्या मोबाईलमधील सर्व संपर्क क्रमांक घेतले आहेत आणि पैसे न दिल्यास तिच्या नातेवाईकांना फोन करून बदनामी केली जाईल. पुढे धमकी अधिक गंभीर झाली. तुझे काही वैयक्तिक फोटो आमच्याकडे आहेत, पैसे न भरल्यास ते सोशल मीडियावर अपलोड करू. तिला दोन-तीन सॅम्पल फोटो पाठवले गेले, जे पूर्णपणे मॉर्फ केलेले होते.

आईला काय वाटेल, नातेवाईक काय म्हणतील, आपले करिअर उद्ध्वस्त होईल का? या सगळ्या विचारांनी माधुरी प्रचंड घाबरून गेली. शेवटी तिने घडलेला सगळा प्रकार आपल्या मित्रांना सांगितला. त्यापैकी काही मित्रांचे ओळखीचे सायबर तज्ज्ञ होते. त्या सायबर तज्ज्ञांनी तिला योग्य सल्ले दिले आणि त्यानुसार माधुरीने पावले उचलली.

तिला सांगण्यात आले :

• घाबरायचे नाही, कॉल आले तर ठामपणे उत्तर द्यायचे
• धमकी देणारे नंबर ब्लॉक करायचे
• मोबाईल पूर्णपणे फॉरमॅट करून वापरायचा
• कोणत्याही वेबसाईटवरून ॲप्लिकेशन डाऊनलोड करू नये
• सायबर हेल्पलाइनवर तक्रार नोंदवावी किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात लेखी तक्रार द्यावी
• नातेवाईकांना आधीच कल्पना द्यावी की सायबर फसवणूक झाली आहे आणि कोणतेही संशयास्पद संदेश किंवा फोटो दुर्लक्ष करावेत

चूक नेमकी कुठे झाली?

जाहिरातीतील लिंकवरून, ब्राउझरद्वारे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून इन्स्टॉल करणे ही सर्वात मोठी चूक ठरली. आपण जेव्हा कोणतेही ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये इन्स्टॉल करतो, तेव्हा अनेक परवानग्या देतो- Contacts, SMS, Photos, Storage इत्यादी. “Permission देणे” म्हणजे आपल्या मोबाईलमधील फोटो, व्हिडिओ, संदेश, संपर्क क्रमांक यांचा पूर्ण प्रवेश त्या ॲप्लिकेशनला देणे. ही बाब अत्यंत धोकादायक आहे. कारण त्या ॲप्लिकेशनचे मालक आपण कुठे आहोत, कोणाशी संपर्कात आहोत, आपल्याकडे कोणती माहिती आहे यावर पूर्ण लक्ष ठेवू शकतात. आणि याच माहितीचा गैरवापर करून सायबर गुन्हेगार लोकांना ब्लॅकमेल करतात.

फोटो मॉर्फिंग म्हणजे काय?

फोटो मॉर्फिंग म्हणजे खऱ्या फोटोमध्ये डिजिटल पद्धतीने बदल करणे. एखाद्याच्या चेहऱ्यावर दुसऱ्याचा चेहरा बसवणे, साध्या फोटोला अश्लील किंवा बदनामीकारक स्वरूप देणे, आणि तो फोटो पाहणाऱ्याला खरा वाटेल असा बनवणे…हे सगळे फोटो मॉर्फिंगमध्ये येते. आजच्या तंत्रज्ञानात हे काम काही मिनिटांत केले जाते आणि याचाच वापर ब्लॅकमेलसाठी केला जातो.

सायबर फॉरेन्सिक विश्लेषक

dnyandev.najan@yahoo.in