“हॅलो आनंद, अरे केव्हा पोहोचतो आहेस?आम्ही सर्वजण वाट बघत आहोत.” “अरे मी निघालो आहे, पण ट्राफिकमध्ये अडकलो आहे. कोण कोण आलं आहे रे? अन्या, संज्या, चिक्या, आपला तो डोरेमॉन? आणि सुंदरी, सायली, पिंकी, माधुरी यापैकी कोण कोण आलंय?” “नुसती फोनवरून चौकशी करू नकोस,तू पोहोचलास की तुला सगळे भेटतीलच.” जवळ जवळ २० वर्षांनी सर्वजण भेटणार आणि कॉलेजचे दिवस पुन्हा आठवणार म्हणून आनंदला सर्वांना भेटण्याची खूपच उत्सुकता होती. मागील एक वर्षापूर्वी त्यानेच सर्वांचे नंबर शोधून काढले आणि व्हाट्स ॲप ग्रुप तयार केला होता. त्यावर सर्व ॲक्टिव्ह होतेच,पण प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. या ग्रुपचं नावही सर्वांनी ‘रिलॅक्सेशन ग्रुप’असं ठेवलं होतं. यावर सर्वांनी मोकळेपणाने गप्पा मारायच्या असं ठरवलं होतं. कॉलेज संपल्यावर सर्वांचे मार्ग वेगळे झाले होते. आपल्या नोकरी, व्यवसाय, करिअर आणि संसार, मुलं-बाळं यामध्ये सर्व व्यग्र होते. सर्वजण एकत्र भेटू असं अनेकदा ठरवलं जायचं पण तो योग जुळवून येत नव्हता. अखेर ‘फ्रेंडशिप डे’ च्या निमित्ताने सर्वांनी एकत्र भेटायचं असं ठरवलं होतं. हेही वाचा >>>Major Sita Shelke: मी केवळ महिला नाही, तर मी “सैनिक” अनेक युगं पार केल्यानंतरचं सीतेचं बदलेलं रुप इतक्या वर्षांनी एकत्र भेटल्यावर मात्र एकमेकांना ओळखणंही अवघड झालं होतं. कॉलेजमध्ये एकदम ‘चिकना हिरो’ म्हणून ओळखला जाणाऱ्या मिलिंदचे केस पांढरे झाले होते आणि पोट सुटलं होतं, हेमंतला तर टक्कल पडलं होतं. ‘सुंदरी’ म्हणून ओळखली जाणारी विद्या टिपिकल काकूबाई वाटत होती आणि चवळीची शेंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सायलीचा चांगलाच सिलेंडर झाला होता. पण तरीही मागच्या सर्व आठवणी जाग्या झाल्यावर सर्वांनीच कॉलेज कट्ट्यावर भेटल्याचा फिल आला. आनंद कधीही वेळेवर पोहोचायचा नाही आणि आजही तो उशीराच आला होता म्हणून सायलीनं त्याला विचारलं, “आनंद, तुझी सवय अजूनही गेली नाही. तू कधीही वेळेवर पोहोचतच नाहीस.” “अगं, घरी सगळं ॲडजस्ट करून यावं लागतं. एकतर बायकोला नक्की काय सांगायचं समजतं नव्हतं. शेवटी ऑफिसमध्ये महत्वाची मिटिंग असल्याने बॉसनं बोलावलं आहे, असं सांगून आलो.” “अरे मी तर चक्क मित्राचे वडील आजारी आहेत असं सांगून घरातून पळ काढला. नाहीतर शनिवार रविवार घरातून बाहेर पडणं अवघड असतं. मुलांचं होमवर्क,त्यांचे प्रोजेक्ट नाहीतर बायकोनं सांगितलेले सामान आणून द्या, आठवड्याचा भाजीपाला आणून द्या आणि अजून कितीतरी रविवारची कामं चालूच असतात,” संजय त्याची व्यथा मांडत होता. आता अनिलनंही सांगायला सुरुवात केली, “अरे, आमच्या घरी तर सुट्टीचा पूर्ण दिवस बायको आणि मुलांसाठीच द्यायचा असा दंडक आहे त्यामुळं रविवारी घरातून बाहेर पडणं खरंच अवघड असतं. ” हेही वाचा >>>Karnam Malleswari : भारताच्या पहिल्या महिला ऑलिम्पिक विजेत्या कोण? कोणत्या पदकावर कोरलं होतं देशाचं नाव? अमित मात्र म्हणाला, “अरे, मी माझ्या बायकोला सांगून आलोय. आमच्या कॉलेज कट्ट्यातील सर्व मित्र मैत्रिणी आम्ही एकत्र भेटून मज्जा करणार आहोत म्हणून.” सायली आणि पिंकीही या सुरात सूर मिसळत म्हणाल्या, “आम्हीसुद्धा आमच्या नवऱ्याला खरं काय ते सांगून आलोय, तुम्ही तुमच्या बायकोला घाबरता म्हणून खरं सांगितलं नाहीत.” आनंदने लगेच तिच्या प्रश्नाला उत्तर दिलं, “ए बाई, आम्ही बायकोला नाही घाबरत. पण भांडणाला घाबरतो. पुन्हा एकाचे दोन शब्द होतात. घरातील वातावरण बिघडतं. मुलांवर परिणाम होतो ते वेगळच. त्यापेक्षा एखादी थाप मारलेली चालते.अमितची बायको नोकरी करणारी उच्चपदस्थ अधिकारी आहे त्यामुळे ती अमितला समजून घेऊ शकते. तो खरं बोलून आला आहे. आमच्या बायका पूर्णवेळ गृहिणी आहेत त्यामुळे त्यांच्या डोक्यात वेगळे विचार येतात मग उगीचच खरं सांगून अडचणी निर्माण कशाला करायच्या?” मनालीला आता शांत बसवेना. ती बोलण्यासाठी पुढे आली तेव्हा आनंद म्हणाला, “अरे, डोरेमॉन काहीतरी सांगतोय ऐका आता.” “आनंद, फाजीलपणा पुरे. आपण कॉलेज कट्ट्यावरील मित्र मैत्रिणी असलो तरी आता प्रगल्भ झालेले आहोत. सर्वांचे संसार आहेत, जबाबदाऱ्या आहेत,पण असं घरी खोटं सांगून, थाप मारून भेटायला येणं योग्य नाही. तुम्ही या ग्रुपला भेटायला आला म्हणून कदाचित भांडण होणार नाही पण तुम्ही खोटं बोलून आला म्हणून नक्की भांडणं होतील. तुम्ही तुमच्या बायकोला विश्वासात घेऊन आपल्या ग्रुप बाबत सांगा. मोकळ्या मैत्रीची गरज प्रत्येकाला कोणत्याही वयात असतेच. तुम्ही व्यवस्थित सांगितलं तर तिलाही पटेल. तिच्याही मित्र-मैत्रिणी असतील तर त्यांनीही असं एकत्र यायला हवं याबाबत तिलाही प्रोत्साहन द्या. ती का भांडते? याचाही विचार करा. गृहिणी असणाऱ्या तुमच्या पत्नीला तिचं घर,नवरा आणि मुलं हेच विश्व असतं. तिचे विचार केवळ तुमच्या भोवतीच फिरतात,म्हणूनच ती कदाचित चिडचिड करत असेलही, पण तिच्या भावनाही समजावून घ्या आणि खोटं बोलणं टाळा. आपल्या जुन्या मित्र मैत्रिणींना भेटल्यानंतर आपल्याला किती आनंद मिळतो. आपले ताण तणाव कसे दूर होतात हे त्यांनाही समजावून सांगा. शुद्ध मनाने आणि निरपेक्ष भावनेने केलेली मैत्री किती गरजेची असते हे तिलाही समजेल.”सगळ्यांना तिचं बोलणं पटलं. त्यानंतर मैत्री या विषयावर सर्वचजण बोलले, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. त्या काही तासांत सर्वचजण आपली दुःख,तणाव, चिंता सर्व काही विसरले, दिलखुलास मैत्रीची गरज समजली. पुन्हा पुन्हा भेटत राहू असं सर्वांनीच ठरवलं आणि आनंद, संजय आणि अनिलनं बायकोला हे नक्की सांगायचं, हेही ठरवलं.(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.) smitajoshi606@gmail.com