Investment in Women : महिलांमधील बुद्धीचातुर्य, नेतृत्त्वगुण, शिकण्याची उर्मी या अशा अनेकविध गुणांमुळे महिलांनी विविध क्षेत्रात प्रगती साधली आहे. प्रगतीच्या वाटेवर त्यांना अनेक अडथळे पार करावे लागता. समाजातील सामाजिक रुढी, पंरपरांना छेद देऊन त्यांना यशाला गवसणी घालावी लागते. असं असतानाही महिला आपल्या मार्गावरून मागे हटत नाहीत. आपल्या परिस्थितीविरोधात झुंजतात आणि यशस्वी होतात. त्यामुळे महिलांना योग्य मार्ग दिला, सहाय्य केलं तर त्या देशातील सर्वांत उत्तम गुंतवणूक ठरू शकतील. त्यांच्या बौद्धिक शक्तीचा चांगल्याप्रकारे वापर करता येईल. महिलांमधील गुंतवणूक ही सर्वांत श्रेष्ठ गुंतवणूक ठरेल, असं खुद्द भारतात गुंतवणूक करणाऱ्या एका बड्या व्यक्तीने म्हटलंय.
बॉब पॅटिलो हे ग्रे मॅटर्स कॅपिटलचे संस्थापक असून त्यांनी भारतात अनेक सामाजिक उपक्रमही राबवले आहेत. मायक्रोफानान्स आणि शिक्षणामध्ये भरीव कामगिरी केली आहे. भारताचा विकास होण्याकरता महिलांमध्ये गुंतवणूक करणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय. इकॉनॉमिक टाईम्सने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. (Investment in Women)
भारतात उत्पादनाचे घटक सर्वाधिक
गुतंवणुकीचं तत्त्वज्ञान काय? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “भारत झपाट्याने पृथ्वीवरील महान देश बनत आहे. भारतातील लोकांमध्ये गुंतवणूकदार म्हणून बराच वेळ घालवला आहे. मी वयाच्या ६३ व्या वर्षीही कार्यरत आहेत. मी शाळेत असताना अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता. तेव्हा माझ्या उत्पादनाचे घटक हा शब्द वाचनात आला होता. भारतात उत्पादनाचे अनेक घटक आहेत. जमीन, बौद्धिक संपदा, नेतृत्त्व, पैसा, मजबूत आर्थिक बाजारपेठ आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मानवी भांडवल भारतात आहे.
तर जग विलक्षण संसाधनाला गमावेल
“भारतातील लोक दृढनिश्चयी आहेत. चीन, ब्राझील, दक्षिण आणि आग्नेय आशिया या जागतिक नेतृत्त्वासाठी इच्छूक असलेल्या इतर देशांच्या तुलनेत भारतात अनेकजण इंग्रजीसह पाच भाषा बोलतात. भारतात अर्थव्यवस्थेला आणि संस्कृतीला गवसणी घालणारा एक घटक आहे. त्यामुळे येथील महिलांना योग्य मार्ग उपलब्ध करून दिला पाहिजे. जर भारताने महिलांमध्ये गुतंवणूक (Investment in Women) केली नाही, महिलांना समृद्ध केले नाही तर, हे जग विलक्षण संसाधनाला गमावेल”, असं ते म्हणाले.
महिलांच्या वेगळेपणाचा आदर व्हायला हवा
“पैशांनी आपण बऱ्याच गोष्टी विकत घेऊ शकतो. अगदी आनंद, अश्रू, परीश्रम विकत घेतले जाऊ शकतात. पण पैशांनी कल्पना विकत घेतली जाऊ शकत नाही. जिथं काळजी असते तिथंच लोक स्वतःचे स्वप्न जाहीर करतात. खासकरून काळजी घेणं हा महिलांचा गुणधर्म आहे. त्यामुळे त्या अधिक सृजनात्मक बनतात. त्यामुळे आपण महिलांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे”, असं ते पुढे म्हणाले. “महिलांना संधी मिळाली पाहिजे. त्यांना नोकरीची आवश्यकता आहे. चांगल्या आरोग्याची आणि राहण्यायोग्य असलेल्या जागेची आवश्यकता आहे. त्यांच्या वेगळेपणाचा आदर करणाऱ्या नोकरीचीही आवश्यकता महिलांना आहे”, असं ते म्हणाले. (Investment in Women)
शैक्षणिक आणि व्यवसायिक अभ्यासक्रमातील निकालांमध्ये महिला अव्वल आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये पास होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही महिलांची संख्या पुरुषांपेक्षा अधिकच आहेत. त्यामुळे भारतात महिलांची बुद्धिमता आणखी चांगल्याप्रकारे वापरल्यास चांगली प्रगती साधता येईल. महिलांमध्ये निसर्गतःचं नेतृत्त्वगुण असतात. त्यामुळे त्यांच्यातील नेतृत्त्वगुणाचा वापर करून व्यावसायिक वृद्धी साधता येईल, असंच त्यांना यातून सांगणं अभिप्रेत असेल. (Investment in Women)
© IE Online Media Services (P) Ltd