डॉ. दीपाली निरवणे
आजकाल मोठ्या प्रमाणावर तरुणींना मासिकपाळीशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः किशोरवयीन मुली आणि तरुण महिला अनियमित मासिकपाळीमुळे चिंतेत असतात. अधूनमधून मासिकपाळीच्या तारखेत बदल होणे सामान्य असले तरी दीर्घकाळ पाळी अनियमित राहणे हे एखाद्या अंतर्निहित आरोग्य समस्येचे लक्षण असू शकते. त्यामुळे मासिकपाळीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
अनेक तरुणींची मासिकपाळी वेळेवर न आल्यास त्यांना तणाव आणि चिंता सतावू लागतात. पाळी उशिरा का येत आहे याबाबत सतत विचार सुरू होतो. काही वेळा कुटुंबीय, मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकांकडून विविध प्रकारचे सल्ले मिळतात, ज्यामुळे गोंधळ आणखी वाढू शकतो. काही महिलांना पाळी उशिरा येते, काहींना महिन्यातून दोनदा पाळी येते, तर काही जणींची सलग काही महिने पाळी येत नाही. मासिकपाळी सुरू झाल्यानंतरच्या सुरुवातीच्या काही वर्षांत अशी अनियमितता सामान्य मानली जाते, कारण त्या काळात शरीरातील हार्मोन्सचे संतुलन स्थिर होण्याची प्रक्रिया सुरू असते. मात्र, ही समस्या दीर्घकाळ कायम राहिल्यास तिच्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
सामान्यतः मासिक पाळीचे चक्र २१ ते ३५ दिवसांचे असते. अर्थात, प्रत्येक महिलेचे चक्र थोडेफार वेगळे असू शकते. तणाव, प्रवास, आजारपण, दैनंदिन दिनचर्येतील बदल किंवा अचानक वजन वाढणे अथवा कमी होणे यांसारख्या कारणांमुळे कधी कधी पाळी लवकर किंवा उशिरा येऊ शकते. हे बहुतांश वेळा सामान्य असते.
मात्र, वारंवार होणाऱ्या अनियमित पाळीमागे हार्मोन्सचे असंतुलन, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (पीसीओएस/पीएमओएस), थायरॉईड विकार, अतिव्यायाम, लठ्ठपणा, कमी वजन, अपुरा आहार, मानसिक ताणतणाव आणि झोपेची कमतरता यांसारखी कारणे असू शकतात. त्यामुळे सलग तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ पाळी अनियमित राहिल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.
याशिवाय पाळीदरम्यान तीव्र वेदना होणे, चक्कर येणे, मोठ्या प्रमाणात रक्ताच्या गुठळ्या होणे, दोन पाळ्यांच्या दरम्यान रक्तस्राव होणे किंवा अनेक महिन्यांपर्यंत पाळीचे चक्र अनियमित राहणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. योग्य वेळी उपचार घेतल्यास मासिक पाळीचे चक्र नियमित ठेवणे शक्य होते.
अशा परिस्थितीत डॉक्टर रक्त तपासण्या, हार्मोन्समधील चढउतार किंवा सोनोग्राफी यांसारख्या चाचण्या सुचवू शकतात. या तपासण्यांद्वारे अनियमित पाळीमागील नेमके कारण शोधून योग्य उपचार केले जातात.
मासिकपाळी नियमित राहण्यासाठी काय करावे?
तरुणींनी संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्यावर भर द्यावा. आठवड्यातून किमान चार ते पाच दिवस नियमित व्यायाम करावा. योगा, प्राणायाम, ध्यानधारणा आणि श्वसनाचे व्यायाम यांच्या मदतीने तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा. दररोज किमान आठ तासांची पुरेशी झोप घेणे, वजन नियंत्रित राखणे आणि मासिकपाळीच्या तारखांची नोंद कॅलेंडर किंवा मोबाईल ॲच्या मदतीने ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
मासिकपाळीतील बदलांकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेणे आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करणे हे प्रत्येक तरुणीसाठी आवश्यक आहे. नियमित आणि निरोगी मासिक पाळी ही उत्तम आरोग्याचे लक्षण आहे.
डॉ. दीपाली निरवणे
प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ
