गर्भाशयाच्या आपल्या नैसर्गिक जागेवरून खाली सरकण्याचा समस्येला ‘अंग’ बाहेर येणं असं म्हटलं जातं. यालाच वैद्यकीय भाषेत uterovaginal prolapse असं म्हटलं जातं. गोळ्या, औषधं, इंजेक्शनमुळे हा त्रास कमी होत नाही. शस्त्रक्रिया करणं हाच त्यावरचा उपाय आहे, हे जरी खरं असलं तरी प्रत्येक ‘अंग’ बाहेर येण्याचा त्रास असलेल्या स्त्रीला गर्भाशय काढून टाकावं लागतंच असं नाही.

अनेक स्त्रियांना आजही या समस्येविषयी कुणाला सांगताना संकोच वाटतो. अगदी डॉक्टरलाही सांगताना त्यांना अडचण वाटते त्यामुळे अनेक स्त्रिया हा त्रास जास्तीत जास्त काळ सहन करतात. आणि अगदी नाईलाज झाला तरच डॉक्टरांकडे जातात.

‘अंग’ बाहेर येणं या समस्येत गर्भाशय आपल्या नैसर्गिक स्थानावरून खाली सरकतं. योनीमार्गातून ते ‘अंग’ बाहेर पडताना दिसायला लागतं. स्त्रियांच्या शरीरात गर्भाशयाच्या स्थानाचा विचार केला तर असं लक्षात येईल की, गर्भाशय हे ओटीपोटाच्या भागात किंबहुना, ओटीपोटाच्याही जरा खालच्या भागात असतं. योनीमार्गाची ‘आतून’ तपासणी केली तरी डॉक्टरांना फक्त गर्भाशयाचं मूख दिसतं संपूर्ण गर्भाशय दिसत नाही. संपूर्ण गर्भाशय हे शरीराच्या आत असतं. एखादा खांब किंवा शामियाना आपण काही दोरखंडाच्या आधारावर स्थिर करून उभा करतो, तशी काहीशी गर्भाशयाची नैसर्गिक स्थिती असते. ओटीपोटात गर्भाशयाची स्थिती टिकवून ठेवण्यासाठी काही नैसर्गिक दोरखंड असतात. हे दोरखंड काही कारणाने जर ढिले पडले तर गर्भाशय हळूहळू आपल्या नैसर्गिक जागेवरून खाली सरकतं.

आणखी वाचा-तुम्हालाही आहे जवळीकतेचं वावडं ?

सुरुवातीला काही दिवस, गर्भाशयाचं मुख फक्त लघवी करताना किंवा शौचास बसलेल्या अवस्थेतच बाहेर दिसतं, झोपलेल्या अवस्थेत दिसत नाही. गर्भाशय खाली सरकत असताना, सहसा एकटं गर्भाशय खाली सरकत नाही, तर योनीमार्गाचा काहीभाग देखील सोबत खाली येत असतो. त्यासोबत मुत्राशय किंवा लघवीची पिशवीदेखील बाहेर येऊ शकते.

‘अंग’ बाहेर येण्याचा त्रास हा एखाद्या स्त्रीलाच का होतो अन्य स्त्रीला का नाही असा प्रश्न पडू शकतो. काही स्त्रियांमध्ये गर्भाशयाला आधार देणारे जे नैसर्गिक दोरखंड असतात ते अशक्त असतात. एक-दोन बाळंतपणाचा ताण ते सहन करू शकतात, त्यानंतर तो आधार सैल पडल्यामुळे नंतरच्या बाळंतपणाचा ताण सहन करू शकत नाही. ‘कुटुंब लहान, सुख महान’ या तत्वाचं महत्व पटल्यामुळे गेल्या चार-पाच दशकात, दोन किंवा तीनपेक्षा जास्त बाळंतपणं होत नाहीत. ‘सिझेरियन’ करण्याचं प्रमाण देखील पूर्वीच्या तुलनेत वाढल्यामुळे देखील ‘अंग’ बाहेर येण्याचे रुग्ण कमी झाले आहेत. बाळंतपणाच्या वेळी होणाऱ्या अनावश्यक ओढाताणीमुळेदेखील हा त्रास होऊ शकतो. तसंच मेनोपॉजनंतर वाढत्या वयासोबत काही अवयवात शिथिलता येते त्यामुळे देखील हा त्रास होऊ शकतो. एखाद्या स्त्रीला सतत खोकल्याचा त्रास किंवा बद्धकोष्ठतेचा (कॉन्स्टिपेशन) त्रास असेल तर थोड्या प्रमाणात ‘अंग’ बाहेर येण्याचा त्रास वाढू शकतो. काही स्त्रिया, विशेषतः ग्रामीण भागातील स्त्रिया संकोचामुळे या त्रासाबद्दल कुणालाच सांगत नाहीत, सहन करीत रहातात. त्यामुळे ‘अंग’ बाहेर येण्याची पायरी वाढत जाते. संपूर्ण गर्भाशयच, मुत्राशयासोबत योनिमार्गाबाहेर येऊन जातं, आतमध्ये जात नाही. अर्थातच अशा स्त्रियांना लघवी तुंबून राहाण्याचा त्रास सुरु होतो. ‘अंग’ सारखं बाहेर राहात असल्यामुळे, त्या मागचा रक्तपुरवठा बिघडतो, इन्फेक्शन होऊन दुर्गंधी सुरु होऊ शकते.

‘अंग’ बाहेर आलेल्या काही रुग्णांमध्ये लगेच शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला जात नाही, विशेषतः सुरुवातीची अवस्था असेल तर योनिमार्गाच्या भोवतालच्या स्नायूंचा ठराविक पद्धतीने व्यायाम केल्याने हा त्रास आटोक्यात राहू शकतो. पण पुढच्या पायरीवर गर्भपिशवी बऱ्याच प्रमाणात खाली सरकलेलं असताना शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नसतो. ज्या स्त्रीचं वय चाळीस वर्षापेक्षा जास्त आहे, मुलंबाळं मोठी आहेत त्यांनी शस्त्रक्रिया करून घ्यायला हरकत नाही. या शस्त्रक्रियेमध्ये गर्भाशय काढून, खाली सरकलेलं मूत्राशय वर सरकवून दुरुस्ती केली जाते. ही शस्त्रक्रिया ‘खालून’ केल्यामुळे पोट उघडण्याचा प्रश्न नसतो.

आणखी वाचा-पतीनं बाहेर संबंध ठेवू नये म्हणून पत्नींसाठी चीनमध्ये खास शिबिराचं आयोजन, सोशल मीडियावर लोक म्हणाले…

ज्या स्त्रियांना एखादं मूलबाळ व्हावं अशी अपेक्षा आहे किंवा ज्यांचं वय चाळीस वर्षापेक्षा कमी आहे त्यांची गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया न करता देखील, पोट उघडून, खाली सरकलेलं गर्भाशय वर ओढून नैसर्गिक स्थानावर, स्पेशल धाग्यांचा उपयोग करून ‘फिक्स’ करण्याची शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. क्वचित प्रसंगी, एकही मूल झालेलं नसताना काही स्त्रियांना ‘अंग’ बाहेर येण्याचा त्रास होऊ शकतो. त्या स्त्रियांमध्ये तर गर्भाशय काढून टाकण्याचा प्रश्नच नसतो. या स्त्रियांवर तशीच शस्त्रक्रिया केली जाते. पोट उघडून केली जाणारी शस्त्रक्रिया काही वेळेस अयशस्वी होऊ शकतं, त्यामुळे खाली सरकेलेलं गर्भाशय पुन्हा वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या धाग्यांचा उपयोग करून, अनुभवी डॉक्टरांकडून केल्यास यशस्वी होऊ शकतं. असं म्हणतात. ज्यांना हा त्रास होतो त्यांनी अनावश्यक संकोच न बाळगता वेळीच डॉक्टरकडे जाऊन तपासून घ्यावं. डॉक्टर त्या रुग्णासाठी योग्य शस्त्रक्रिया पद्धतीची निवड करतात.

( लेखक एम. डी. (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र) तसेच पीएच.डी. (समाजशास्त्र) आणि एमएस (काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी) आहेत.)

atnurkarkishore@gmail.com