आयुष्य जगत असताना अनेक ऐतिहासिक क्षणांचे अनुभव आपण घेत असतो. मग हे ऐतिहासिक क्षण कधी एखादा खेळाचा सामना असतो वा कधी चित्रपट तर कधी गाणे. तर कधी मंगळयान सोडतानाचा क्षण. मग रोजचे आयुष्य जगताना अशा क्षणांची नुसती आठवण जरी काढली तरी आपल्या तना-मनांवर रोमांच उभे राहतात. त्यामुळेच मंगळयान मोहिमेच्या वेळी परिधान केलेली साडी ही अमेरिकेच्या प्रख्यात म्युझियममध्ये दिमाखदारपणे विराजमान झालीआहे. ही गोष्ट फक्त भारतीय स्त्रियांसाठी नाही तर प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.
काही वर्षांपूर्वी बॉलीवूड तारका सोनाक्षी सिन्हाचे लग्न एका विशेष कारणांमुळे चर्चेत होते, कारण लग्नाच्या विधीसाठी तिने तिच्या आईने स्वत:च्या लग्नात नेसलेली साडी परिधान केली होती. इतर तारका लग्नासाठी खास साडी डिझाईन करवून घेत असताना, सोनाक्षीने मात्र आईच्या साडीची निवड केली. तिच्या या निर्णयाचे कौतुक समाजाच्या विविध थरांतून झाले.
गेल्या काही दिवसांपासून अशीच एक साडी चर्चेत आहे, ती म्हणजे नंदिनी हरीनाथ यांची. आणि हो विशेष म्हणजे तिची चर्चा भारतात नाही तर अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर होत आहे. कोण आहेत या नंदिनी? काय आहे त्यांच्या साडीचे वैशिष्ट्य?
तर नंदिनी हरीनाथ यांनी मंगळयानसाठी मोहिम रचनाकार तसेच प्रमुख संचालक म्हणून काम केले होते. ज्या दिवशी यान सोडण्यात येणार होते, त्या दिवशी त्यांनी लाल आणि निळ्या रंगाची एक विशिष्ट साडी परिधान केली होती. त्यादिवशी या मोहिमेचा भाग असलेल्या सर्व महिला शास्त्रज्ञांनी साडी परिधान केली होती. भारताच्या या ऐतिहासिक मोहिमेचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि ही मोहिम यशस्वीपणे राबविणारा आशिया खंडातील भारत हा पहिलाच देश आहे. त्यामुळे भारतीय महिला शास्त्रज्ञांनाच्या सन्मानार्थ अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील स्मिथसोनियन नॅशनल एअर ॲण्ड स्पेस म्युझियममध्ये नंदिनी यांनी परिधान केलेली ही लाल-निळ्या रंगाची साडी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे.
ही साडी म्हणजे केवळ एक पोशाख नसून, ती राष्ट्रीय अस्मिता, आधुनिक महिला शास्त्रज्ञांची भूमिका आणि देशाची संस्कृती यांचा उत्तम मिलाफ आहे. डॉक्टर, एअर होस्टेस, परिचारिका अशी नुसती नावे जरी उच्चारली की, आपल्या डोळ्यांसमोर एक ठराविक प्रतिमा उभी राहते. त्यामुळेच जेव्हा शास्त्रज्ञ म्हटले की, सुटाबुटातील पांढरा कोट परिधान केलेली व्यक्ती डोळ्यांसमोर उभी राहते. पण भारतीय महिला शास्त्रज्ञांनी हा समज खोटा ठरविला. साडी परिधान केलेली बाई ही फक्त चार भिंतीच्या आतच नाही तर बाहेरच्या जगातदेखील अंतराळ संशोधनामध्येही असू शकते हे सिद्ध केले.
आता प्रश्न येतो, मग नंदिनी हरीनाथच का? तर नंदिनी यांनी आपल्या वीस वर्षाच्या कारकिर्दीत इस्त्रोसाठी विविध प्रकारच्या चौदा महत्त्वपूर्ण मोहिमा आपल्या नेतुत्वाखाली यशस्वीपणे पार पाडल्या. त्यांचे वडील इंजिनिअर तर आई गणिताची प्राध्यापिका होती. त्यामुळे उपजतच गणित आणि अभियांत्रिकी विषयाची आवड निर्माण झाली. नंदिनी यांनी त्यांचे शिक्षण अभियांत्रिकी क्षेत्रातून पूर्ण केले आहे.
एका दिलेल्या मुलाखतीत व्यक्त होताना त्या म्हणाल्या की, लहानपणापासून आमच्या घरामध्ये अंतराळ या विषयावर खूप चर्चा घडायच्या. त्याकाळी प्रसिद्ध असलेली ‘स्टार ट्रेक’ नावाची मालिका घरात अगदी आवडीने पाहायली जायची. आणि पुढे जेव्हा ‘अपोलो १३’ हा चित्रपट आला ,तेव्हा मी या चित्रपटाची जबरदस्त फॅन झाले. मला वाटतं या दोन गोष्टींमुळे अंतराळविषयी प्रेम निर्माण होण्यास अधिक कारणीभूत ठरल्या.
नंदिनी यांनी भारतीय अंतराळ क्षेत्रासाठी जे योगदान दिले आहे, ते निश्चितच गौरवास्पद आहे. शिवाय त्या ‘रॉकेट वुमन’ म्हणूनदेखील ओळखल्या जातात. त्याचबरोबर मंगळयान साठी त्यांनी ज्या प्रकारे मेहनत घेतली, ती सर्वांनाच प्रेरणादायी आहे. अशा या थोर महिला शास्त्रज्ञाचा सन्मान म्हणून त्यांच्या साडीची निवड करण्यात आली. यावरून आणखी एक गोष्ट सिद्ध होते की, एकदा का तुम्ही यशस्वी झालात की तुमच्या प्रत्येक गोष्ट यशास पात्र ठरते.
