Jabalpur mother infant death photo : आईच्या कुशीत निजलेलं बाळ सर्वात सुरक्षित असतं, असं म्हणतात. जबलपूरच्या क्रूझ बोट दुर्घटनेत आईने बाळाला कुशीत घेऊनच प्राण सोडल्याचा एक अत्यंत हृदयद्रावक फोटो समोर आला आहे. मातृत्व अनुभवलेल्या प्रत्येक स्त्रीला हा फोटो भावेल आणि तो पाहून प्रत्येक आईचे डोळे पाणावतील; कारण तिनंही असंच कधीतरी आपल्या बाळाला जोजवलं असेल. सरकार आणि प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे या निष्पाप बाळाचा आईच्या कुशीतच जीव जावा, यापेक्षा मोठी शोकांतिका दुसरी कोणती असू शकते? हा फोटो काळाच्या कसोटीवर ‘आईपण’ जोवर जिवंत आहे, तोवर प्रत्येक आईच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरेल. जबलपूरमध्ये घडलेली ही घटना केवळ एक बातमी नाही, तर आईच्या अथांग आणि निस्वार्थी प्रेमाचे जिवंत उदाहरण आहे.

मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात बार्गी धरणात क्रूझ बोट उलटून मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला. असे अपघात विविध राज्यांतील कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात घडतच असतात. सहसा मृतांच्या आकड्यावरून अपघाताची भीषणता तपासली जाते. प्रशासनाच्या दफ्तरी ‘नऊ’ हा आकडा कदाचित लहान असेल, पण मृतांच्या नातेवाईकांसाठी हा आघात आयुष्यभर न भरून येणारा आहे. त्यातही, समोर आलेला हा फोटो प्रत्येकाचे काळीज चिरणारा ठरला आहे. हा फोटो केवळ अपघाताचे दृश्य नसून आई-बाळाच्या नात्यातील अढळ विश्वासाचे प्रतिबिंब आहे. हे चित्र कदाचित एखाद्या महान चित्रकारालाही सुचले नसते, पण एका करुण घटनेने हे कारुण्य प्रत्यक्षात उतरवले आहे. हा फोटो इतका विदारक आहे की तो स्पष्टपणे तुम्हाला दाखवणंही आमच्यासाठी कठीण आहे.

बाळ जन्माला आल्यानंतर डॉक्टर आईची बाळाशी जोडलेली नाळ कापतात. मात्र, ही शारीरिक नाळ तोडली तरी एक अदृश्य भावनिक नाळ कायमची जोडलेली असते. जन्मानंतर बाळाला पहिल्यांदा हातात घेण्याचं सुख निराळंच असतं. बाळाला स्तनपान करताना आईला मिळणारं समाधान अवर्णनीय आहे. असे असंख्य क्षण बाळ आईच्या पदरात टाकते, ज्याचे सुख जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात विकत मिळू शकत नाही. कदाचित म्हणूनच आई-बाळाचे नातं अधिक घट्ट होत जातं.

आईची सावलीच बाळासाठी सर्वात मोठं संरक्षक कवच असतं. आईने बाळाच्या डोक्यावरून नुसता हात फिरवला तरी धाय मोकलून रडणारं बाळ शांत होतं. कारण, बाळाला ठाऊक असतं की या जगात हीच आपली सुरक्षित जागा आहे, जिथे आपल्याला कोणीही इजा पोहोचवू शकत नाही. पण, दुर्दैवाने निसर्गाने बाळाची ही समजूत खोटी ठरवली. काळाने घाला घातला, तरीही अखेरच्या क्षणापर्यंत बाळ आईच्या कुशीतच होतं. आईनेही आपल्या काळजाच्या तुकड्याला घट्ट मिठीत घेतले होतं. दोघांनीही जणू एकमेकांना सुरक्षित असल्याची ग्वाही दिली, पण काळाला मात्र पाझर फुटला नाही. एकमेकांच्या मिठीत असलेल्या माय-लेकरांना काळानं एकत्रच गाठलं आणि एका सुंदर, भावनिक नात्याचा करुण अंत झाला. हा प्रसंग ‘आईपण’ जिवंत असेपर्यंत कायम स्मरणात राहील.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो काही दिवसांनी नजरेआड होईलही, पण आपल्या लेकाला प्रेमाने आणि मायेने छातीशी कवटाळणाऱ्या त्या मातेची प्रतिमा जनमानसातून कधीच पुसली जाणार नाही!