भाग्यश्री फडके-धर्माधिकारी
जागतिक सौंदर्यप्रसाधन उद्योग ६१० अब्ज डॉलर एवढा प्रचंड आहे. २०३५ पर्यंत तो ८०० अब्ज डॉलरचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा आहे. शाम्पू, मेकअप, परफ्युम, डिओ, साबण, कोलोन इ सौंदर्य प्रसाधनांमध्ये नवीन भर पडत चालली आहे आणि उद्योगाची प्रचंड वाढ होत जाणार आहे. यामध्ये द. कोरिया हा देश ‘स्किनकेअर’ क्षेत्रात बलाढ्य भूमिका बजावत स्किनकेअर बाजारपेठ काबीज करतो आहे.
मोठमोठ्या ब्रँड्ससाठी स्किनकेअर हा प्रचंड मोठा नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. गेल्या १० वर्षांत जागतिक स्किनकेअर उद्योगामध्ये एवढी प्रचंड वाढ झालेय की २०३३ पर्यंत, २०० अब्ज डॉलरला पोहोचणार आहे. भारतात सध्या ३ अब्ज डॉलरचा स्किनकेअर उद्योग; २०३३ पर्यंत, ८ अब्ज डॉलरला पोहोचणार आहे. स्किनकेअर उद्योगाने परफ्युम, शाम्पू उद्योगांना मागे टाकले आहे.
‘के-ब्युटी’- कोरियाने ब्युटी उद्योग कसा काबीज केला?
के-ब्युटी म्हणजे कोरियन ब्युटी. द. कोरिया देश ‘स्किन-फर्स्ट’ असे तत्त्वज्ञान मानतो. स्त्री-पुरुषांनी लहान वयापासून त्वचेची काळजी घेणं, तिला सौंदर्य प्रसाधनांनी वर्धित करणे कोरियन संस्कृतीचा भाग आहे. पुरुषांची स्किनकेअरसुद्धा तिथे सामाजिकरित्या रूढ आहे. (पुरुष स्किनकेअर घेत नसतील त्यांना अस्वच्छ, आळशी समजतात.
मुले लहान वयाची असल्यापासून फेस वॉश आणि टोनर यावर बोलतात). त्यामुळे कोरिया देश नवनवीन सौंदर्य प्रसाधनांचे संशोधन, उत्पादन करतो आहे. तिथले छोटे उद्योजक, ब्युटी गुरू यांनी सौंदर्य पुस्तकांचे लेखन केले. ऑनलाइन बाजारपेठ तयार केली आणि तिथे के-ब्युटी प्रसाधनांचा प्रचार केला. अमेरिकतील ग्राहकाला आकर्षित करायला सुरुवात केली.
नाविन्यपूर्ण प्रसाधने अमेरिकेच्या बाजारपेठेत येऊ लागली. कोरियन प्रसाधनांची प्रचंड प्रमाणात निर्यात सुरु झाली, कोरियन प्रसाधनांबरोबरचं अमेरिकी सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादनदेखील सुरू केले. तेथील स्किनकेअर गुरू आणि मेकअप कलाकारांनी सोशल मीडियावरून ग्राहकांना शिक्षण, माहिती, द्यायला सुरुवात केली. कारण अमेरिकेमध्ये स्किनकेअर बाबत कोरियाएवढी जनजागृती नव्हती.
भारतातदेखील हे लोण पसरले आणि सेलिब्रिटी इन्फ्लुएन्सर सोशल मीडिया Youtube, Instagram वरून सौंदर्य प्रसाधन व्हिडीयोंचा भडिमार करू लागले. स्किनकेअरला इतर सौंदर्य प्रसाधनांपेक्षा प्रचंड आर्थिक नफा आहे, त्यामुळे नफेखोरीसाठी अनेक नामांकित ब्रँड स्किनकेअर मध्ये उतरले.
या सगळ्यांचा परिणाम म्हणून सध्या दूरचित्रवाणीवरच्या जाहिरातींमध्ये ‘आमचे प्रॉडक्ट वापरा आणि कोरियन त्वचा मिळवा’ आणि ‘कोरियन ग्लास स्किन’ मिळवा म्हणजे काचेसारखी गुळगुळीत नितळ त्वचा मिळवा अशा जाहिराती पाहिल्या असतील. कोरियन स्किनकेअर प्रॉडक्ट जाहिरातींचा मारा सुरू आहे.
नायसिनामाईड, हायल्युरोनिक ॲसिड, ग्लायकॉलीक ॲसिड, सीरम असे बोजड शब्द या जाहिराती वापरत असतात. त्यापैकी हायल्युरोनिक ॲसिड शरीरात तयार होते आणि वंगण म्हणून काम करते. शिवाय ओलावा देते. सीरम म्हणजे त्वचेवर लावायचे हलके, दाट पोषक घटक असलेले द्रव.
भारतात कोणती कोरियन सौंदर्य प्रसाधने आहेत?
भारतात कोरियन सौंदर्य प्रसाधने (K-Beauty) हायड्रेशन, चमकणारी त्वचा (Glass Skin) आणि नैसर्गिक घटकांसाठी खूप लोकप्रिय आहेत. प्रमुख ब्रँड्स भारतात उपलब्ध आहेत. ही उत्पादने त्वचेचे पोषण, आर्द्रता टिकवणे आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी वापरली जातात, ज्यात स्नेल म्युसिन आणि तांदळाचे पाणी यांसारखे घटक असतात
भारतातील प्रमुख कोरियन उत्पादने आणि त्यांचे उपयोग
- हायड्रेटिंग टोनर आणि सीरम : त्वचेला खोलवर ओलावा देण्यासाठी आणि काचेसारखी चमक आणण्यासाठी वापर करतात.
- शीट मास्क : त्वचेला त्वरित तजेला आणि ओलावा देण्यासाठी वापर करतात.
- स्नेल म्युसिन : गोगलगायीचा अर्क, गोगलगायीच्या शरीरातून स्रवणारा एक चिकट पदार्थ आहे (Mucin), त्वचेच्या दुरुस्तीसाठी वापरला जातो. त्वचेला दीर्घकाळ ओलसर ठेवते. बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी करते, त्वचा घट्ट करते. कोरड्या त्वचेवर उपाय, डाग कमी करण्यासाठी आणि जखमा भरून काढण्यासाठी वापर करतात.
- डबल क्लिन्झर : मेकअप आणि धुळीचे कण पूर्णपणे काढून टाकण्यासाठी वापर करतात.
- सनस्क्रीन : कोरियन सनस्क्रीन हलके असतात आणि अतिनील किरणांपासून संरक्षण करतात.
- तांदळाचे पाणी : तांदूळ भिजवल्यानंतर किंवा शिजवल्यानंतर उरलेले पांढरे पाणी. यात जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. चेहऱ्यावरील काळेपणा कमी करून त्वचा उजळ आणि चमकदार बनवते. त्वचेच्या छिद्रांचा आकार कमी करते आणि पोत सुधारते.
दुष्परिणाम
कोरियन स्किनकेअर उत्पादने भारतीय हवामानासाठी (उष्ण आणि दमट) खूप जड असू शकतात. कोरियन उत्पादने कोरड्या हवामानासाठी बनवली जातात. भारतातील दमट हवेत ती वापरल्यास त्वचेवर अतिरिक्त तेलकटपणा येऊन मुरुमे येतात. काही उत्पादनांमध्ये असलेल्या तीव्र सुगंध आणि रसायनांमुळे संवेदनशील त्वचेवर जळजळ किंवा ऍलर्जी होऊ शकते. त्वचेचा नैसर्गिक संरक्षक थर कमकुवत होऊ शकतो.
त्वचेचा पोत खराब होऊ शकतो. भारतीय त्वचेमध्ये मेलेनिन जास्त असल्याने, काही चुकीची उत्पादने वापरल्यास त्वचेवर काळे डाग पडू शकतात. त्वचेची जळजळ, आणि हायपरपिग्मेंटेशन वाढू शकते. त्वचेवर थराथराने उत्पादने लावल्याने छिद्र बंद होऊन त्वचेचे नुकसान होऊ शकते. ‘ग्लास स्किन’ (काचेसारखी त्वचा) हे जनुकीय असते. भारतीय त्वचेवर हे परिणाम मिळवणे कठीण असते आणि त्यासाठी प्रयत्न केल्यास केवळ निराशाच हाती येते.
सुज्ञ विचार
कोरियन सौंदर्य प्रसाधने आकर्षक वाटू शकतात, पण प्रत्येक त्वचा वेगळी असते. प्रत्येक घटक आपल्या शरीराशी जुळेलचं असे नाही. आपल्या सर्व संवेदनांपैकी स्पर्श ही त्वचेची संवेदना कुठल्याही रोगाने जात नाही. त्यामुळे आपली त्वचा नैसर्गिकरीत्या कशी चांगली राहील हे प्रत्येकीने पाहिले पाहिजे. कोणतेही उत्पादन वापरण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न जरूर विचारावा-हे माझ्या त्वचेसाठी योग्य आहे का, की मी फक्त ट्रेंडच्या मागे धावत आहे? पळत्या मागे धावण्या पेक्षा आपला सारासार विवेक वापरून योग्य निर्णय घ्यावा.
(लेखिका औषधनिर्माणशास्त्र आणि आरोग्य व्यवस्थापन शास्त्र अभ्यासक आहेत)
phadkebhagyashri@gmail.com
