‘कार्य’ ॲपमुळे अनेक महिलांना रोजगार मिळला आहे. या रोजगारातून त्यांनी आपल्या व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या साधनांची खरेदी करू शकल्या.अलीकडे एआय, चॅट-जीपीटी हे इतके परवलीचे शब्द बनले आहे की, घरातील लहान मुलंदेखील सर्रास यांचा वापर करून आपल्या आयुष्यातील अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करीत असतात. 
पण मग असा प्रश्न निर्माण होतो की, ज्यांना फक्त इंग्रजी भाषा येते आणि ज्यांच्याकडे स्मार्ट फोन आहेत, तेच फक्त ए-आय, चॅट-जीपीटीसारख्या गोष्टी वापरू शकतात.  ज्यांच्याकडे या गोष्टी नाही त्यांचं काय? 
जी खेड्या-पाड्यात, दुर्गम भागात रहाणारी जनता आहे, त्यांनी विकासाची स्वप्ने पाहू नयेत का? 
असा प्रश्न एआय क्षेत्रात काम करणाऱ्या एका नामांकित कंपनीला पडला आणि त्यांनी ‘कार्य’ ही सामाजिक क्षेत्रासाठी डेटासेट्स तयार करणाऱ्या कंपनीची स्थापना केली.

जेणेकरून डिजिटल क्रांती युगात आवश्यक असणाऱ्या सर्व व्यावहारिक गोष्टींची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचेल. 
आणि शिका व कमवा या तंत्राचा वापर करून त्यांना स्वत:चा ही विकास साधता येईल. यात महिलांचाही विचार केला गेला. 
२०१७ साली मायक्रोसॉफ्ट या नामंकित कंपनीने स्वत:च्या संशोधन प्रकल्पातून ‘कार्य’ ची स्थापना केली.’कार्य’ हा एक विशिष्ट स्वरूपाचा कंपनीने विकसित केलेलं असं ॲप आहे.
 यात तुम्ही तुमच्या स्थानिक भाषेत तुमचा आवाज रेकॉर्ड करू शकतात. तसेच तुमच्या भाषेत लिहूही शकतात. 
यामार्फत डेटासेट्स तयार केले जातात. याचा सर्वाधिक फायदा महिलांना झाला आहे.

कार्य’ मार्फत प्रशिक्षणार्थीची एक टीम गावात किंवा दुर्गम विभागात पाठविली जाते. 
तेथील स्त्री-पुरुषांचे रोजगाराचे काम अथवा त्यांच्याजवळ असलेले कौशल्य लक्षात घेऊन त्यांना एक प्रकारचे ‘टार्गेट’ देण्यात येते. 
त्यानुसार ती स्त्री किंवा तो पुरुष आपल्या आवाजातील सूचना रेकार्ड करून किंवा टाईप करून ‘कार्य’ ॲपवर पाठविले जाते. 
या माहितीचे संकलन करून डेटासेट्स तयार केले जातात. तुमच्या वेळेच्या सोयीनुसार रोज ठरावीक तास हे काम करायचे असते. मग त्या मोबदल्यात ‘कार्य’कडून आर्थिक मोबदलाही दिला जातो. 
यासाठी गरज असते ती फक्त स्मार्ट फोनची. विशेष म्हणजे भारतातील ८० टक्क्याहून अधिक जनता स्मार्ट फोन वापरते.

अगदीच उदाहरण द्यायचे झाले तर, बचत कशी करायची, बँकेत खाते कसे उघडायचे, एटीएम चा वापर कसा करायचा, 
बँकेतून कर्ज घेण्याची काय प्रक्रिया असते, अशा रोजच्या व्यावहारिक जीवनात भेडसाविणाऱ्या गोष्टींची माहिती त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत गोष्टी स्वरुपात केली जाते. 
प्रशिक्षणार्थी ही गोष्ट त्यांना वाचवून दाखवितात आणि मग त्यांच्याकडून ती वाचून घेतली जाते. 
मग वेळेनुसार ही गोष्ट रेकोर्ड करून ॲपवर पाठवितात.

याचा परिणाम असा होतो की, रोजच्या जीवनातील व्यवहार कसे चालतात हे तर समजते. 
आणि तीच बोलीभाषा येणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला देखील त्याच्या भाषेतून उपयुक्त माहिती मिळाल्यामुळे ती व्यक्ती 
देखील सज्ञान बनते. कार्य’ चे प्रमुख असलेले मनु चोप्रा यांच्या मते, आजच्या डिजिटल क्रांतीच्या युगात ग्रामीण भागातील लोकांचा सहभाग जास्ती जास्त वाढला पाहिजे. निव्वळ साधने नाहीत म्हणून आणि हे सर्व व्यवहार बहुतांश वेळा इंग्रजी किंवा हिंदी भाषेत असतात. 

त्यामुळे ते वापरण्याकडे लोकांचा जास्त कल नसतो. पण जेव्हा तुम्हाला हवी असलेली माहिती तुमच्या भाषेत मिळाली. 
तर लोकं निश्चितपणे हे व्यवहार करण्यास पुढे येतील.  या ॲपच्या माध्यमातून आतापर्यंत १ लाखांहून अधिक लोकांना (ज्यामध्ये ६० टक्क्यांपेक्षा जास्त महिला आहेत) डिजिटल रोजगार उपलब्ध झाला आहे.

गेल्या काही वर्षापासून पुणे येथील खराडी भागात ‘कार्य’ चे काम सुरू असून तेथील अनेक महिलांना यामुळे रोजगार लाभला आहे. 
या रोजगारातून त्यांनी आपल्या व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या साधनांची खरेदी करू शकल्या. 
जसे एकीला शिवणयंत्राचा एक भाग पाहिजे होता, तो या ॲपवरील कामांमुळे लवकर खरेदी करता आला. 
मुलांच्या शिक्षणासाठी एफडी सारखी तरतूद करायला महिला शिकल्या. बँकेचे व्यवहार करताना महिला चौकसपणे सगळ्या गोष्टी समजून घेतात.

तर ओरिसा, प.बंगाल यासारख्या राज्यातील दुर्गम खेड्यांमध्ये माती किंवा काचेची भांडी यांवर नाजूक चित्रकारी करण्याची कला अनेक महिलांना/ तरुणीना अवगत असते. 
कार्य’ ॲपचा वापर करून अनेक स्त्रियांना आपली कला ग्लोबल व्यासपीठावर पोहचविता आली. 
शिवाय त्याबदल्यात त्यांना रोजगार मिळून आर्थिक कमाईचा स्रोतदेखील निर्माण झाला.

बऱ्याचदा शहरात रहाणाऱ्या स्त्रियांना ‘वर्क फ्रॉम होम’ किंवा फ्री लान्स पद्धतीने काम करता येते. 
त्यामुळे बऱ्याच महिला घरची जबाबदारी पार पाडत स्वत:ची आर्थिक कमाई करीत असतात.
मात्र गावात राहणाऱ्या महिलांना कित्येकवेळा अशी संधी मिळत नाही. 
त्यांच्याकडे वेगवेगळ्या स्वरुपाची कौशल्ये असतात, जसे कलाकुसर करणे, रंगकाम करणे, नाजूक स्वरुपाची चित्रकारी करणे 
किंवा भरतकाम,कशिदाकारी अशा कित्येक कला त्यांना येत असतात.

परंतु त्यांचा वापर करून आर्थिकदृष्ट्या स्वत:ला कसे सक्षम करायचे हे त्यांना माहीत नसते. किंबहुना तशा संधी त्यांना प्राप्त होत नाही. पण कार्य’ सारख्या ॲपमुळे आता ग्रामीण भागातील स्त्रियांनादेखील घर बसल्या काम करण्याची संधी मिळत आहे.कार्य’च्या ॲपमुळे फक्त व्यवहारच नाही, तर बोली भाषांचे संवर्धन सहज सुलभ झाले आहे. स्थानिक लोकांजवळ असलेली कौशल्ये ग्लोबल व्यासपीठावर मांडणे देखील सहज सोपे झाले आहे.

कार्य’ ॲप भारतातील विविध राज्यांतील गावागावांमध्ये आपला विस्तार करीत आहे. यामुळे स्थानिकांना रोजगाराबरोबर नवीन शिक्षणदेखील मिळत आहे. ते देखील स्वत:च्या भाषेत. एखादे तंत्रज्ञान हे मुठभर लोकांपुरताच मर्यादित न राहता त्याचा तळागाळातील लोकांपर्यत प्रसार-प्रचार होतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने डिजिटल क्रांतीचा उत्कर्ष होतो.