एका भीषण कार अपघातात शरीराला आलेले परावलंबित्व. यामुळे नैराश्येच्या गर्तेत खितपत पडलेल्या देवकी अम्माला एका मोक्याच्या क्षणी त्यांच्या आयुष्याचं ध्येय सापडलं. आणि झाडे लावता लावता ‘तपोवना’ची निर्मिती झाली. त्यांनी जे जंगल विकसित केलं, त्याला ‘तपोवन’ असं नाव देण्यात आलं आहे. वयाच्या ९२ व्या वर्षीदेखील देवकी अम्मा आजही सक्रीय आहेत. यंदाचा पद्मश्री पुरस्कार हा खऱ्या अर्थानं त्यांच्या यशाची पोचपावती आहे.
२६ जानेवारी हा दिवस तमाम भारतीयांसाठी खास असतो. कारण यानिमित्तानं परमवीर चक्र, वीरता पुरस्कार, पद्म पुरस्कार असे अनेक सन्माननीय पुरस्कार जाहीर होतात. आणि या पुरस्काराच्या निमित्तानं अनेक प्रेरणादायी लोकांच्या कहाण्या समोर येतात.
या पुरस्कारांच्या यादीवर नजर टाकली तर एक गोष्ट सहज जाणवतं की, पुरस्कारप्राप्त माणसं ही तुमच्या-आमच्या सारखीच सामान्य असतात. पण ती ज्या ध्येयानं वेडी असतात आणि तेच त्यांना असामान्य उंचीवर घेऊन जातं. अशाच लोकांच्या मांदियाळीतील एक नाव म्हणजे केरळच्या अलापुझ्झा जिल्ह्यातील पद्म पुरस्कार प्राप्त ९२ वर्षीय देवकी अम्मा. आपल्या गावातील उजाड जमिनीचं रुपांतर तपोवनात विकसित करण्याचं कार्य गेली कित्येक वर्षे त्या नेटानं करीत आहेत. त्यांच्या याच कार्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
केरळमधील अलापुझ्झा जिल्ह्यातील मुथूकुल्ल्म गावात आपल्या शिक्षक पतीबरोबर देवकी अम्मा राहत होत्या. सर्वसामान्य गृहिणीप्रमाणे त्यांचंदेखील जीवन सुरू होतं. परंतु एका भयंकर कार अपघातात त्या गंभीररित्या जखमी झाल्या. इतक्या की घरातल्या घरात चालणंदेखील मुश्कील होऊन गेलं. आयुष्यात त्या कधीच शेतीची कामं करू शकणार नाहीत, असं डॉक्टरांनी सांगितलं. सदैव घरकामात आणि शेती कामात व्यस्त असणाऱ्या देवकी अम्मासाठी हा मोठा धक्का होता. आता पुढे काय? परावलंबित्व जीवन जगायचं, या विचाराने त्या पार नैराश्यग्रस्त बनल्या.
आपल्या खोलीत नशिबाला दोष देत त्या बसू लागल्या. एक दिवस विचारांच्या तंद्रीत असताना अचानक त्यांची नजर घरामागे असलेल्या पडीक अंगणावर गेली. रडत-खडत कशाबशा त्या तिथपर्यंत पोहोचल्या आणि एक छोटेसं रोपटं लावलं. त्या रोपट्याला पाणी घालत असताना त्यांना एक प्रकारचं आत्मिक समाधान लाभलं. जसजसं हे रोपटं वाढू लागलं तसतसा देवकी अम्माचा चेहरादेखील उजळू लागला. आणि अचानक त्यांना त्यांच्या आयुष्याचे ध्येय सापडलं. एखाद्या नापीक जमिनीत जर छोटेसे झाड वाढू शकतं तर आपल्या उदासीन आयुष्यात आपणच हिरवळ निर्माण करू शकतो, असा विश्वास त्यांच्या मनात निर्माण झाला. मग काठीच्या सहाय्याने अडखळत चालत त्या घरामागील पडीक जागेत हळूहळू झाडे लावू लागल्या आणि त्यांची जमेल तशी योग्य ती काळजी घेण्याचा प्रयत्न करू लागल्या. त्यांचे हे प्रयत्न पाहून काहीजणांनी तर त्यांना वेड्यातदेखील काढलं. परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत त्यांनी आपलं काम सुरू ठेवलं. आधी एक मग दोन मग दहा असे होता होता शेकडो झाडे कधी लागली गेली हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही.
इथे हळूहळू त्यांच्या तब्येतीतदेखील सुधारणा होऊ लागली आणि पडीक जमिनीवरदेखील हिरवळ फुलू लागली. त्यांच्या कुटुंबाची मालकी असलेल्या सुमारे पाच एकर जमिनीवर तपोवन फुलविण्यात देवकी अम्मा यशस्वी ठरल्या. देवकी अम्माच्या मेहनतीतून साकारलेला हा काही छोटा-मोठा बगिचा नव्हता तर ते मानवनिर्मित वन होतं.
आज या वनात तीन हजाराहून अधिक झाडं असून त्यात आंबा, सागवान, फणस, चिंच, बांबू, महागनी अशी विविध प्रकारची झाडं आहेत. इतकंच नाही तर केरळमधील कित्येक औषधी झाडे- जी काळाच्या ओघात लुप्त झाली, तीदेखील नव्याने रुजविण्यास सुरुवात केली. देवकी अम्मांनी झाडे नुसतीच लावली नाहीत तर त्या झाडांवर मुलांप्रमाणे प्रेम केलं. नुसतं झाडाला हात लावून समजते की, झाडाला पाण्याची गरज आहे का नाही की ते आजारी आहे. किंवा एखादे झाड किती वर्षांपूर्वी लावलं होतं हेदेखील त्यांना पक्कं माहीत असतं.
आपल्या या पाच एकरच्या जागेत त्यांनी नुसतीच झाडं नाही लावली तर तेथील जैव विविधतादेखील फुलविली. आज त्यांच्या या जंगलात विविध प्रकारचे पक्षी, वेगवेगळे किटक, साप, फुलपाखरांच्या अनेक दुर्मिळ प्रजातीदेखील इथे पाहायला मिळतात. देवकी अम्मांच्या या जंगलामुळे गावातील पाण्याच्या भूजल पातळीचा स्तरदेखील योग्य प्रमाणात राखण्यास मदत झाली. उन्हाळ्यात जिथे त्यांच्या घरातील विहीर सुकून जायची ती आज उन्हाळ्यातदेखील पाण्याने भरलेली असते.
देवकी अम्मांचे हे जंगल म्हणजे फक्त पर्यटकांसाठी पाहाण्याचे ठिकाण नाही तर वनस्पती शास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते मुक्त विद्यापीठ आहे. अनेक विद्यार्थी तिथं वनस्पती संदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठी येतात. रोप कसं लावावं यापासून ते कोणत्या झाडाला कोणती माती लागते, ऊन-पावसांपासून झाडांचे कसं रक्षण करावं यांसारख्या अनेक गोष्टींवर देवकी अम्मा मार्गदर्शन करीत असतात.
आज वयाच्या ९२ व्या वर्षीदेखील त्या तितक्याच कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्यानं त्यांना अनेक प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत. पण यंदाच्या म्हणजेच २०२६ च्या पद्मश्री पुरस्काराने केवळ त्यांनाच नाही तर त्यांच्या गावातील प्रत्येकालाच आनंद झाला आहे. आयुष्याच्या एका नैराश्येच्या टोकाच्या अवस्थेत देवकी अम्मांनी निसर्गाला घातलेली साद ही केवळ त्यांच्याच आयुष्यातच नाही तर अनेक पक्षी-प्राण्यांच्याही आयुष्यात नंदनवन फुलवित आहे. तुम्ही जर निसर्गाला प्रेम दिलं तर त्या प्रेमाची पाखर निसर्गदेखील तुमच्यावर करीत असतो, हे देवकी अम्मांच्या उदाहरणाने सिद्ध झाले आहे.
