scorecardresearch

Premium

परदेशी जाण्याच्या कारणास्तव घटस्फोटित स्त्रीला अपत्याचा ताबा नाकारता येणार नाही

वैवाहिक वाद उभे राहिल्यावर अपत्यांचा ताबा मिळवणं हा विषय त्याच्या केंद्रस्थानी असतो. अशा वेळी महिलांचे काम करणे किंवा त्यांचे परगावी, परदेशी स्थलांतरित होणे हे त्यांच्या विरोधात वापरता येणार नाही, असा अत्यंत महत्त्वाचा संदेश एका ताज्या निकालातून न्यायालयाने दिला आहे. हल्ली बहुतांश महिला या कर्त्या, कमावत्या असून प्रगतीच्या संधी शोधत गावोगावी, देशोदेशी जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा निकाल अजून महत्त्वाचा ठरतो.

kerala high court decision Custody child mother relocating abroad job
परदेशी जाण्याच्या कारणास्तव घटस्फोटित स्त्रीला अपत्याचा ताबा नाकारता येणार नाही (Photo Courtesy – Pixabay)

वैवाहिक नात्यात कटुता निर्माण झाल्यास अनेकानेक वादाचे मुद्दे उपस्थित होतात. मात्र, अपत्याच्या ताब्याचा मुद्दा हा त्या सर्व मुद्द्यांमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरतो. सर्वसाधारणत: अपत्याचा ताबा देताना, अपत्याच्या भल्याच्या विचाराला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते.

अशाच एका प्रकरणात परदेशी जाणा-या आईला अपत्याचा ताबा द्यावा का? असा प्रश्न केरळ उच्च न्यायालयासमोर उपस्थित झाला होता. या प्रकरणात पती-पत्नी बहारीन येथे राहत होते. गरोदरपणाकरता पत्नी माहेरी केरळ येथे आली होती आणि तिने घटस्फोटाची याचिका दाखल केली. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान उभयतांनी समझोता केला आणि त्या समझोत्यानुसार अपत्याचा ताबा आईकडे राहणार होता आणि वडिलांना अपत्याशी संपर्क आणि भेटीचा अधिकार होता. उभयतांना हे मान्य असल्याने त्या समझोत्याच्या अनुषंगाने प्रकरण निकाली काढण्यात आले.

nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!
love triangle nagpur
‘पती, पत्नी और वो…’ प्रेमाच्या त्रिकोणातून दोन संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; भरोसा सेलने…
Loksatta kutuhal State of Artificial Intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अवस्था
CAPF
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात महिलांनाही प्रोत्साहन, प्रसूती रजेसह ‘या’ सुविधाही मिळणार; केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: पित्तामुळे हैराण

कालांतराने पत्नीला न्युझीलंड येथे नोकरी मिळाली, तिला तिथे स्थायिक होण्याची अधिकृत परवानगी मिळाली आणि तिथे अपत्याला सोबत नेण्याकरता पत्नीने स्वत:ला अपत्याची अज्ञानपालनकर्ती (गार्डियन) घोषित होण्याकरता न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेतील मागणी समझोत्याचा भंग करणारी असल्याचं कारण देऊन पतीने त्यास विरोध केला. कौटुंबिक न्यायालयाने पत्नीची याचिका अमान्य केली आणि अपत्याचा ताबा पतीच्या पालक आणि बहिणीकडे देण्याचे आदेश दिले.

हेही वाचा… चॉइस तर आपलाच: घरातल्या मोठ्यांचा राग येतो?

त्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. उच्च न्यायालयाने या प्रकरणात नोंदवलेली निरीक्षणे खालीलप्रमाणे-

१. कौटुंबिक न्यायालयाने निकाल देताना सर्वांत महत्त्वाच्या बाबीकडे हवे तेवढे लक्ष दिलेले नाही.

२. कौटुंबिक न्यायालयाने अपत्याच्या भल्यापेक्षा प्रकरणातील पक्षकारांचे अधिकार आणि कर्तव्य या चष्म्यातून प्रकरणाकडे पाहिले.

३. अपत्य कोणत्याही जैविक पालकाकडे असणे हे अपत्याकरता सर्वांत महत्त्वाचे असते.

४. या प्रकरणातील पती बहारीन येथे असताना अपत्याचा ताबा आजी-आजोबांकडे देणे योग्य ठरेल असा अयोग्य निष्कर्ष न्यायालयाने काढला. ५. अपत्याच्या ताब्याकरता एखाद्याने कायम एकाच ठिकाणी स्थानबद्ध राहावे असा अर्थ होत नाही.

५. पत्नीचे स्वत:च्या उन्नतीकरता न्युझीलंड इथे स्थलांतरित होणे हे अपत्याच्या ताब्याबाबत तिच्या विरोधात वापरता येणार नाही.

६. अपत्य पालकांसोबत वाढणे नैसर्गिक आहे, पालक अपत्याचा सांभाळ करायला तयार असताना त्यांना अपत्याचा ताबा नाकारणे हे अपत्याच्या दृष्टीने चांगले नाही.

७. सर्वसाधारणत: आणि नैसर्गिकपणे अपत्याचा ताबा आईकडे असणे हे चांगले असते.

८. पत्नीने अपत्याच्या सर्व सोयीसुविधांबद्दल खात्री देणारे आणि सुट्टीत वडिलांना भेटायला देणे मान्य करणारे सत्यप्रतिज्ञापत्रदेखील सादर केले आहे.

९. साहजिकच अशा वेळेस पतीच्या कोणत्याही अधिकारांचे हनन व्हायची शक्यता नाही.

अशी निरीक्षणे न्यायालयाने नोंदवली आणि पत्नीची याचिका मंजूर केली. तिची अपत्याची अज्ञानपालनकर्ती म्हणून नेमणूक करून अपत्याचा ताबा तिच्याकडे दिला.

अपत्याचा ताबा मिळवण्याच्या वादात संबंधित महिलेचे (आईचे) काम करणे किंवा परगावी, परदेशी स्थलांतर होणे, हे तिच्या विरोधात वापरता येणार नाही, हा अत्यंत महत्त्वाचा संदेश या निकालातून न्यायालयाने दिला आहे, त्याबद्दल न्यायालयाचे कौतुकच आहे. हल्ली बहुतांश महिला या कर्त्या आणि कमावत्या आहेत. आपल्या प्रगतीच्या संधी शोधत गावोगावी आणि देशोदेशी जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा निकाल अजूनच महत्त्वाचा ठरतो. अपत्याच्या ताब्याकरता आपल्याला स्थलांतराच्या संधी सोडाव्या लागतील का? स्थलांतर केले तर अपत्याचा ताबा गमवावा लागेल का? या शंकांना आणि भीतीला या निकालाने दिलासादायक उत्तर दिले आहे असेच म्हणावे लागेल.

tanmayketkar@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kerala high court decision about custody of child when mother is relocating abroad for job dvr

First published on: 04-10-2023 at 17:55 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×