सध्या आंतरराज्य अॅथलेटिक्स मीट सुरू असणाऱ्या पंचकुला येथील तौ लाल देवी स्टेडियमच्या मोठ्या स्क्रीनवर जेव्हा किरण पहलच्या ४०० मीटर स्पर्धेची वेळ झळकली, तेव्हा किरणला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. मात्र, तिने अशी प्रतिक्रिया देणे अगदीच स्वाभाविक होते. अनेक समस्यांचा सामना करून, अथक परिश्रम करणाऱ्या किरणच्या कष्ट आणि मेहनतीचे फळ मिळाले होते.

खेळातून वर्षभर खंड पडल्यानंतर हरियाणाच्या या धावपटूने खेळलेली ही पहिली स्पर्धा होती. त्यामध्ये किरणने ४०० मीटरची स्पर्धा केवळ ५०.९२ सेकंदांमध्ये पूर्ण केली. ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेतील भारतीय महिला धावपटू हिमा दासच्या ५०.७९ सेकंदांनंतर किरणची ही वेळ सर्वोत्तम ठरली आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

“खरं सांगायचं तर, एक वर्ष थांबल्यानंतर मी स्पर्धेत भाग घेत होते. त्यामुळे सुरुवातीला मला थोडी चिंता वाटत होती. मात्र, हिट्समध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे मला हायसं वाटलं. पण, ही स्पर्धा मी इतक्या कमी वेळात पूर्ण करेन हे मात्र मला अगदीच अनपेक्षित होतं. मात्र, या कामगिरीमुळे आता मला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धकांत स्थान मिळालं आहे याचा खरंच खूप आनंद आहे”, असे किरणने म्हटले असल्याची माहिती दी इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखावरून मिळिते.

हेही वाचा : महाराष्ट्रातील दुर्गम भागातून थेट अवकाशाला गवसणी, गडचिरोलीच्या ‘या’ हवाई सुंदरीचा प्रवास वाचा

किरणपाठोपाठ देवयानीबा झाला ही उपांत्य फेरीमध्ये दुसऱ्या स्थानावर आली होती. किरण ही देवयानीबापेक्षा केवळ तीन सेकंदांच्या फरकाने विजयी झाली. मात्र, किरणचा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळविण्यापर्यंतचा प्रवास मुळीच सोपा नव्हता. असंख्य शारीरिक आणि मानसिक त्रासांना खंबीरपणे सामोरे जाऊन तिने हे यश प्राप्त केले आहे.

आपल्या कुटुंबाबद्दल सांगताना किरण हळवी होऊन म्हणाली, “मला माझ्या कौटुंबिक समस्यांमुळे मागच्या वर्षी स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते.” त्याबाबत दीर्घ श्वास घेऊन, ती पुढे सांगू लागली, “माझ्या वडिलांचं निधन होऊन साधारण दोन वर्षं झाली. मात्र, ते गेल्यानंतर माझ्या कुटुंबीयांनी मला क्रीडा क्षेत्राच्या बाबतीत विशेष पाठिंबा दिला नाही. माझं घरच्यांशी, आईशीबरोबरही शेवटचं बोलणं हे सहा महिन्यांपूर्वी झालं होतं. हे सर्व सहन करणं मुळीच सोपं नाहीये.”

कुटुंबासह असणाऱ्या तणावपूर्ण नातेसंबंधांसह २४ वर्षीय किरणला शारीरिक आणि आरोग्याच्या समस्यांनीदेखील भंडावून सोडले होते. किरणच्या हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे तिला भुवनेश्वरमधील मे महिन्यातील फेडरेशन चषकात भाग घेण्याची संधीदेखील हुकली असल्याचे तिने सांगितले आहे.

“मागचा साधारण एक ते दीड वर्षाचा कालावधी हा माझ्यासाठी अत्यंत त्रासदायक आणि खडतर होता. दुखापती, कौटुंबिक व आर्थिक त्रास.. सगळं सांगायला गेले, तर एक लांबलचक यादी तयार होईल. या सगळ्यामुळे खरं तर मी क्रीडा क्षेत्र सोडण्याचा विचार केला होता. मात्र कसंतरी करीत मी सर्व सांभाळत आहे”, असे किरण म्हणते.

हेही वाचा : लोकांनी वजनावरून चिडवले; मात्र महिला ‘सुमो’ कुस्तीपटू बनून हेतलने कसा रचला क्रीडाविश्वात इतिहास? पाहा….

किरणच्या वडिलांचे निधन मात्र तिच्यासाठी सर्वांत धक्कादायक होते. किरणचे वडीलच तिचे सर्वांत मोठे चाहते होते. तिच्या वडिलांनी तिला सर्वतोपरी मदत केली होती. “माझ्या वडिलांनी घरातील प्रतिकूल परिस्थितीची जाणीव मला कधीही होऊ दिली नव्हती. ते गेल्यानंतर मला समजले की, त्यांनी माझ्यासाठी, मला मदत करण्यासाठी अनेकांकडून कर्ज घेतलं होतं.”

किरणला तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी तिच्या वडिलांबरोबर अजून एक खास व्यक्तीदेखील मदत करीत होती. नॅशनल रेकॉर्ड होल्डर हिमा दास ही ती व्यक्ती होय. हिमा दास यांनी किरणला वेळोवेळी प्रोत्साहन दिले, मार्गदर्शन केले. इतकेच नाही, तर तिला बूट आणि इतर आवश्यक आहारासंबंधीच्या गोष्टींसाठीही मदत केली आहे.

“मी त्यांना माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे मानते. हिमाताईने मला आजपर्यंत खूप मदत केली आहे. मी त्यांना माझी परिस्थिती सांगितली तेव्हाही त्यांनी माझी साथ सोडली नाही. त्यामुळे त्यांची सोबत मिळाल्याबद्दल मी खरंच स्वतःला नशीबवान समजते”, असे किरणने हिमा दास यांच्याबद्दल बोलताना सांगितले.

अर्थात, किरणन बराच मोठा काळ क्रीडा क्षेत्रापासून लांब राहिली; परंतु परतल्यानंतर केलेल्या चमकदार कामगिरीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. किरणसह अनेकांना तिच्या कामगिरीबद्दल आश्चर्य वाटले; मात्र ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांना त्याबद्दल मुळीच नवल न वाटता, त्यांनी तिच्या ऑलिम्पिकमधील सहभागाचीदेखील पुष्टी केली आहे.

“या स्पर्धेसंबंधीचे सर्व नियम व मार्गदर्शक तत्त्वे संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. जर तिने स्पर्धेत आपली पात्रता सिद्ध केली असेल, तर ती नक्कीच पुढे जाईल”, असे सुमारीवाला यांनी म्हटले असल्याचे दी इंडियन एक्स्प्रेसच्या लेखावरून समजते. किरण पॅरिसमध्ये रिले संघात धावण्यासाठी तयारी केली असली तरीही केवळ ‘कॅम्पर्स’ असणाऱ्या स्पर्धकांची निवड करण्याचे कडक धोरण आहे. त्यामुळे फेडरेशन किरणचा विचार करेलच याची खात्री देता येणार नाही, असे समजते.

Story img Loader