scorecardresearch

वाइफ आणि हसबंड मटेरियल कसं ओळखाल?

लग्नाआधी स्वतःला एक व्यक्ती म्हणून ओळखा, म्हणजे तुमच्या आवडीनिवडी, सवयी, स्वभाव, राहणीमान, आर्थिक विचारसरणी; तरच नंतर होणाऱ्या जोडीदाराचे विचार समजून घेऊ शकाल.

वाइफ आणि हसबंड मटेरियल कसं ओळखाल?
लग्नाआधी स्वतःला एक व्यक्ती म्हणून ओळखा, म्हणजे तुमच्या आवडीनिवडी, सवयी, स्वभाव, राहणीमान, आर्थिक विचारसरणी; तरच नंतर होणाऱ्या जोडीदाराचे विचार समजून घेऊ शकाल.

वंदना सुधीर कुलकर्णी 

मुग्धाने विवाहपूर्व मार्गदर्शन (premarital workshop) शिबिरामध्ये ऐकलेलं जे काही शेअर केलं ते ऐकून आज सगळे जण विचारात पडले होते. लग्न करावं की नाही, केलं तर प्रेमविवाह करावा की ठरवून केलेला? याबद्दलचा सगळ्यांचा गोंधळ वाढला होता.

“हे गर्लफ्रेंड आणि वाइफ मटेरियल असं वेगळंच असणार असेल तर मग आधी गर्लफ्रेंडबरोबर मजा मारून घ्यायची नि नंतर आई, बाबांनी स्थळ म्हणून आणलेल्या ‘वाइफ मटेरियल’शी लग्न करायचं की काय?’’ पम्या बोललाच अखेर.

“असा विचार आम्ही जास्त करायला हवा जर बॉयफ्रेंड नवरा झाल्यावर असं टिपिकल पुरुषी मनोवृत्तीने वागणार असेल तर. एक तर आम्ही आमचं घर, माणसं, सगळं सवयीचं सोडून तुमच्याकडे यायचं नि आम्हाला, आमच्या अडचणींना समजून घेण्याऐवजी, नवीन माणसांत, तुमच्या घरच्या नवीन पद्धतींमध्ये सामावून घेण्याऐवजी वर तुम्ही शिरजोर होणार…’’ रेवा म्हणाली.

आणखी वाचा – विवाहपूर्व मार्गदर्शन : बॉयफ्रेंडचा नवरा होतो तेव्हा…

“अगं, माझ्या ऑफिसमधली कांचन सांगत होती, की ती कामावरून घरी पोहोचते तेव्हा तिचा नवरोबा तंगड्या पसरून टी.व्ही. समोर बसलेला असतो. त्याचं ऑफिस घराजवळच आहे. ही पोहोचल्यावर रात्रीच्या स्वयंपाकाची हालचाल सुरू करणार. साधा कूकरही लावायला शिकवलं नाहीये त्याच्या आईनं… काही म्हटलं, की लगेच बाहेरून ऑर्डर करू म्हणायचं. आता रोज रोज काय बाहेरून मागवणार का?’’ स्नेहानं पुस्ती जोडली.

“ए, तुम्ही काय आघाडी उघडली आहे का आमच्याविरुद्ध? सगळेच जण काही असे नसतात हं. माझा भाऊ किती मदत करत असतो माझ्या वहिनीला. त्यांची अगदी फिफ्टी, फिफ्टी पार्टनरशिप असते.’’…सम्या म्हणाला.

“तसं तर जनरलाइज काहीच करता येत नाही रे! आणि करोनाकाळात किती तरी पुरूष स्वयंपाक करायला शिकलेच की! ते म्हणाले, की आम्हाला नेहमीच आवड होती; पण महिलावर्ग कधी घुसूच द्यायचा नाही स्वयंपाकघरात… ‘तुझं इथे काम नाही,’ असं म्हणून आई तर बाहेरच काढायची मला… पुरुषांनी स्वयंपाक करणं कमीपणाचं; पण पुरूष आचाऱ्याने स्वयंपाक केला तर चालतो, कारण त्याचा तो पोटासाठीचा व्यवसाय… सगळा दुटप्पीपणा…’’ “व्वा! हे तू बोलतो आहेस… ऐकून कान कसे सुखावले…’’

आणखी वाचा – नातेसंबंध : जास्त इनव्हॉल्व्हमेंट नकोच!

“ए, कुठली चर्चा तुम्ही कुठे नेताय रे? मूळ मुद्दा काय होता? आपल्याला हवा तसा जोडीदार कसा मिळेल? प्रेमविवाह करून की स्थळं शोधून?’’ अनयनं घसरलेली गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न केला.

“प्रेमविवाहात निदान खरी ओळख तरी झालेली असते. एक कम्फर्ट आलेला असतो. ॲरेंज मॅरेजमध्ये कोण, कुठली व्यक्ती, ओळख ना पाळख नि…’’
“प्रेमविवाहात एकमेकांची ‘खरी ओळख’ होते असं म्हणायचं आहे तुला, अनय?’’ मुग्धा अनयचं वाक्य मध्येच तोडत म्हणाली.

“असं असतं तर आहान आणि रीना घटस्फोटापर्यंत पोहोचले तरी असते का? प्रेमविवाहच होता ना त्यांचा? प्रेमातले दाखवायचे दात वेगळे नि जोडीदार झाल्यावर खायचे दात वेगळे!’’

“Husband material and wife material’’… सगळे एका सुरात हसत म्हणाले. “म्हणजेच भूमिका बदलली की वागणं जर बदलत असेल तर love काय नि arranged काय, ‘माणूस’ म्हणून त्याची वा तिची ‘खरी ओळख’ नाहीच कळली ना!’’ “करेक्ट!… म्हणूनच तर सगळं confusion ना! मग शेवटी आईवडिलांनी आणलेली स्थळं बरी म्हणायची की काय? निदान त्यांची काही तरी चाळणी लागते…’’

“अरे, लग्न तुम्ही करणार आहात की ते? तुमच्या विचारांच्या गोंधळामुळे तुम्हाला निर्णय घेता येत नाही, म्हणून आई-बाबा तुमच्यासाठी निर्णय घेणार? तोही आयुष्यातला एवढा महत्त्वाचा निर्णय? हा पळपुटेपणा झाला हं! आणि ते काय ‘सून मटेरियल’ बघणार! तुमचे आणि त्यांचे जोडीदार निवडीचे चॉइस सारखे असणार आहेत का? काही तरी आपलं,’’ मुग्धा म्हणाली.

आणखी वाचा – लैंगिक समस्या आणि व्हायग्रा

“अगं, उद्या नाही पटलं तर आईवडिलांवर ढकलून देऊन मोकळं होता येतं ना! …तुम्ही आणलेलं स्थळ…’’ पम्या खी खी हसत म्हणाला. मुग्धा, स्नेहा जाम वैतागल्या. अनय मात्र गंभीर होता. “मग एखाद्याला ओळखायचं कसं याच्या काही टिप्स दिल्या का गं मुग्धा त्या तुझ्या वर्कशॉपमध्ये?’’ त्यानं उत्सुकतेनं विचारलं…

“अर्थातच! तो तर महत्त्वाचा भाग होता त्या वर्कशॉपमध्ये. आधी स्वतःला ओळखा, एक व्यक्ती म्हणून. म्हणजे, तुमच्या आवडीनिवडी, सवयी, स्वभाव, राहणीमानाच्या कल्पना, आर्थिक विचारसरणी. म्हणजे काही जण फारच खर्चीक नि काही पैशाला चिकट, अति हिशोबी, कटकटे, तुमच्या श्रद्धेच्या संकल्पना, स्त्री-पुरुषांमधील मैत्रीबद्दलचे विचार, जगण्याचे प्राधान्यक्रम, तुमचं अपब्रिंगिंग कसं झालं आहे, तुमचं कुटुंब कोणत्या विचारसरणीचं आहे… पारंपरिक की नव्या विचारांचं, परस्परांमधले नातेसंबंध कसे आहेत, घरात प्रत्येकाचा योग्य आदर होतो का, सुट्टीच्या दिवशी तुम्हाला काय करायला आवडतं, व्यायामाची आवड, फिटनेसबद्दल जागरूकता आहे का, तुम्हाला काही छंद, सांस्कृतिक ॲक्टिव्हिटीज करता का, तुमचं सोशल लाइफ… वगैरे… वगैरे…’’

“स्वतःची नीट ओळख वा माहिती असेल तरच समोरचा आपल्याशी या सगळ्या महत्त्वाच्या विषयांवर किती मिळताजुळता आहे; आपली मतं, मनं, विचार किती जुळू शकतात ते कळणार ना…’’

“शिवाय हल्ली व्यक्तिमत्त्वाच्या चाचण्याही असतात हे तर तुमच्या गावीही नसेल. Psychometric tests म्हणतात त्यांना! ती टेस्ट केल्यावर जे रिपोर्ट्स येतात, त्यात तुमचा आणि दुसऱ्याचा स्वभाव बरोब्बर कळतो. शिवाय वर्तनामध्ये काही त्रासदायक गोष्टी असतील, जसा संशयी स्वभाव किंवा प्रचंड रागीट, अहंकारी, हट्टी, दुराग्रही, टोकाचा अबोल, स्वतःला अतिशहाणा समजणारा… इत्यादी तर ते काही लपत नाही. मग हे खरं समजणं, खरी ओळख नव्हे का?… मग जोडीदार प्रेमात पडून निवडा नाही तर स्थळं बघून…’’

“अरेच्चा! काय, काय समजलं आहे रे या मुग्धाला त्या वर्कशॉपमध्ये!’’ सर्वांनाच सगळं नवीन होतं… “अरे, पण हे किती महत्त्वाचं आहे. आपण नुसते वरून आधुनिक झालोय, पण या इतक्या शास्त्रीय गोष्टींचा ना आपल्याला पत्ता आहे ना आपल्या पालकांना… बघतायत आपल्या पत्रिका… वर्षानुवर्षं… पत्रिका जुळली, पण अपेक्षा, मनं जुळली नाही म्हणून लग्न मोडतातच आहेत की… तरी आपल्या त्याच प्रथा चालू…’’

“ हो ना, मला खूपच हुश्श वाटलं हं ही सगळी माहिती कळल्यावर. आता मी ठरवलं, जो या विवाहपूर्व समुपदेशनाला आणि या टेस्ट्सना तयार होईल लग्न ठरवण्याआधी, त्याच व्यक्तीशी मी लग्नाचा विचार करणार. मग तो प्रेमविवाह असो वा ठरवून केलेला. थॅक्यू मुग्धा,’’ स्नेहा एक्साइट होऊन म्हणाली.
बाकी मित्रमंडळींमध्ये काहींनी लगेच सहमती दर्शवली, तर काही विचारात गढून गेली. “मुग्धा, पुढच्या भेटीत जरा अधिक सविस्तर सांगशील का या टेस्टबद्दल?’’ अनयनं उत्सुकता दाखवत म्हटलं. “नक्की,’’ ती हसत म्हणाली. बाकीच्यांनी खांदे उडवले!

(लेखिका समुपदेशक आहेत)
vankulk57@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या