स्त्रियांची पर्स जादूगाराच्या पोतडीसारखी असते, असं म्हटलं जातं. ‘तुमच्या पर्समध्ये कोणती वस्तू सापडेल काही सांगता येत नाही ब्वॉ! अख्खं घरच घेऊन फिरता की काय पर्समध्ये?’ असं म्हणून पुरूष मंडळी संधी मिळेल तेव्हा त्याची खिल्ली उडवत असतात. (ऑफिसमध्ये वेळेस आपणच त्यांना पटकन पर्समधून एखादी उपयुक्त वस्तू काढून देतो, ती मदत कुठेच गेली!) हा विनोदाचा भाग सोडला तरी आपण खरोखरच अख्खं घर पर्समध्ये घेऊन फिरतोय की काय आणि त्यापायी निष्कारण बोजा वागवतोय, अशी स्थिती पुष्कळदा येते. यात आपली (म्हणजे स्त्रियांची) चूक मुळीच नाहीये. रोजच्या जगण्यातल्या लहानमोठ्या गोष्टींचा विचार आधीच करून नेमक्या वेळेला सोय कशी होईल, असा ‘मेटिक्युलस’ विचार करण्यासाठी आपले मेंदू मुळातच ‘वायर्ड’ असतात. त्यामुळे पर्स भारंभार भरलेली असणं हा खरंतर दोष नसून आपला गुणच म्हणायला हवा! यात प्रश्न दोन- एक म्हणजे त्यापायी खांद्यावर पडणारं ओझं आणि दुसरं- खूप वस्तू पर्समध्ये भरल्यानं वेळेला अमूक वस्तू आपल्या पर्समध्ये आहे हे न आठवणं किंवा ती न सापडणं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आम्ही मात्र इथे अशा २० वस्तूंची यादीच तुम्हाला करून देतोय, ज्या तुमच्या पर्स, बॅग वा सॅकमध्ये असायलाच हव्यात. म्हणजे केवळ या बाळगल्यात तरी तुमची वेळप्रसंगी सोय होईल आणि पर्सचं वजनही वाढलेलं नसेल.

women handbag

कंगवा, पावडर, मॉईश्चरायझर आणि केसांची एक्स्ट्रॉ रबर
-अनेकींना कंगवा-पावडर व्यतिरिक्तही मेकअपच्या इतर वस्तू- म्हणजे लिपस्टिक, कॉम्पॅक्ट, आय-लायनर, मस्कारा वगैरे पर्समध्ये बाळगायला आवडतं हे आम्ही जाणतो. इथे मात्र आम्ही केवळ अशा गोष्टी घेतल्यात ज्या पर्समध्ये असल्या की तुमची नेहमी वेळ भागेल. बहुतेक स्त्रिया नोकरीनिमित्तानं रोज बराच आणि दमछाक करणारा प्रवास करतात. अशा प्रवासानंतर ऑफिसमध्ये गेल्यावर कंगवा-पावडर वापरल्यावर फ्रेश वाटतं.
-मॉईश्चरायझर चांगल्या दर्जाचं असेल, तर ते एकाच वेळी अनेक कामं करू शकतं. त्वचा, हात मऊ राखण्याबरोबरच प्रसंगी फाटलेल्या ओठांवर ते लावून वेळ निभावून नेता येते. क्वचित कधी हातापायावर किरकोळ काही लागलं, तरी मॉईश्चरायझर मदतीला धावून येतं. मॉईश्चरायझर छोट्या डबीत वा छोट्या बाटलीत मिळत असल्यानं पर्समध्ये ठेवायलाही सुटसुटीत.

केसांची रबर
-रबराची किंवा कापडाची इलास्टिसिटी असलेली स्वच्छ रबरं कायम २-३ तरी ठेवावीत. ही रबरं प्रसंगी केसांनाच नाही, इतर वस्तूंनाही लावता येतात. उदा. कधीतरी आपण खाण्याच्या सुक्या पदार्थांचे पॅक्स विकत घेतो, पण आतला पदार्थ लगेच खाऊन पूर्ण संपत नाही- उदा. नमकीन, खारे दाणे, बिस्किटांचा पुडा वगैरे. प्रत्येक वेळी हाताशी ‘चिप क्लिप’ किंवा स्टेपलर नसतं. अशा वेळी आतला पदार्थ नंतर खाता यावा, तो हवेनं सादळू नये म्हणून पॅक फोल्ड करून रबर लावून पर्समध्ये ठेवला की काम झालं.

सॅनिटरी पॅड आणि पँटी लायनर
बहुतेकींच्या पर्समध्ये सॅनिटरी पॅड असेलच. पण एखाद्या वेळी ते वापरून संपलं, तर रीप्लेस करायला विसरू नका. काही स्त्रियांच्या नोकऱ्या अशा ठिकाणी असतात, जिथे अनेकदा जवळ मेडिकलचं दुकान नसतं (उदा. औद्योगिक क्षेत्र- कारखान्यांचा परिसर आदी). अशा वेळी याचं महत्त्व अधिक.
पँटी लायनर हीदेखील एक उपयुक्त गोष्ट आहे आणि हल्ली अगदी छोट्या आकाराची, कव्हरमध्ये चौकोनी फोल्ड केलेली पँटी लायनर्स मिळू लागली आहेत. असं एकतरी पँटी लायनर सॅनिटरी पॅडबरोबर ठेवायलाच हवं. काहीजणींना अचानक व्हाईट डिस्चार्जचा त्रास होतो किंवा मूत्र संसर्गासारख्या गोष्टीमुळे काही वेळा ‘युरिन इन्कॉन्टिनन्स’ची (म्हणजे स्वच्छतागृहात पोहोचेपर्यंत पँटीमध्येच काही थेंब लघवी होणं किंवा त्या भीतीनं स्वच्छतागृहाकडे पळावं लागणं) समस्या निर्माण होते, तेव्हा हे पँटी लायनर पँटीला लावून टाकलंत तर तुमचा उर्वरित दिवस तरी त्या चिंतेविना जाईल.

ड्राय टिश्यू आणि कापडी रुमाल
कोरड्या टिश्यू पेपरचा एक बॉक्स पर्समध्ये ठेवायलाच हवा. वेळप्रसंगी त्याचा विविध कारणांसाठी उपयोग होतो. मात्र तो निष्कारण वापरून संपवून टाकू नये. रोजच्या वापरासाठी स्वच्छ कापडी रूमाल केव्हाही उत्तम आणि पर्यावरणपूरकही.

पेन आणि छोटंसं नोटपॅड
हल्ली आपण बहुतेक काम लॅपटॉप, काॅम्प्युटर आणि मोबाईलवरच करत असतो. लिहिण्याची वेळ कमीच येत असली, तरी ऑफिसमध्ये ठेवलेल्या नोटपॅडव्यतिरिक्त पर्समध्येही एक चालू असलेलं पेन (शक्यतो साधं बॉलपेन) आणि छोटंसं नोटपॅड ठेवायलाच हवं. त्याचा अचानक कधी उपयोग करता येईल सांगता येत नाही.

women handbag

आवळा सुपारी वा बडीशेप
तुम्हाला आवळा सुपारी वा बडिशेप किंवा आवडणाऱ्या गोळ्या यापैकी जी चांगली मुखशुद्धी आवडत असेल त्याचे १-२ सॅशे पर्समध्ये हवेतच. तासन् तास चालणाऱ्या मीटिंग्जमध्ये फारच कंटाळायला होतं आणि चहा-कॉफीही मिळण्याची शक्यता नसते, तेव्हा हे तोंडात टाकल्यामुळे निश्चित जरा बरं वाटतं. क्वचित कधी मळमळण्यासारखी तक्रार उद्भवते तेव्हाही अनेकींना त्याचा उपयोग होतो.
गोड गोळ्यांऐवजी लहानशा डबीत खडीसाखर ठेवता येईल. त्यात खडीसाखरेबरोबर लवंगा वा वेलची घालून ती डबी जवळ बाळगली, तरी छान.

बिस्किटांचा छोटा पुडा आणि एनर्जी बार
ही कठीण प्रसंगासाठीची पोटापाण्याची सोय! बिस्किटचा पुडा खूप दिवस टिकतो आणि चहाबरोबर खाल्लं तर थोडा काळ तरी वेळ भागते. एनर्जी बारही बरेच दिवस टिकणारा, पोटाला आधार होईल असा. मात्र या वस्तू अडीनडीसाठी आहेत हे विसरू नका बरं! अर्थात म्हणून `एक्स्पायरी डेट’ उलटेपर्यंतही ठेवू नका. हे पदार्थ खाऊन संपल्यावर परत आणून पर्समध्ये भरून ठेवा.

पाण्याची बाटली
पाण्याची बाटली ही पर्समधली सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्यापैकी कित्येक जण कामाच्या नादात पुरेसं पाणी प्यायलाच विसरून जातात आणि पाणी कमी प्यायल्यामुळे आरोग्याच्या विविध तक्रारी उद्भवतात. त्यामुळे रोज पाण्याची किमान अर्धा लिटरची (खरंतर एक लिटरची) बाटली बरोबर भरून घ्यायला विसरू नका.

मोबाईल आणि हेडफोन
मोबाईल आणि हेडफोन पर्समध्ये बाळगायला तुम्ही विसरणार नाही हे आम्हाला पक्कं माहीत आहे. आमची टिप इतकीच, की हेडफोनला त्याची वेगळी डबी नसेल, तर तो एका लहान प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेला चांगला. म्हणजे धूळ बसून वा इतर वस्तूंमध्ये दबला जाऊन हेडफोन लवकर खराब होणं टाळता येतं. पावसाळ्यात मोबाईलसाठीही एक प्लास्टिक पिशवी बाळगलेली उत्तम.

women handbag

पैशांची छोटी पर्स
तुम्ही कितीही फोन बँकिंग आणि नेटबँकिंग वापरत असाल आणि तुम्हाला प्रत्यक्ष स्वरूपात पैसे वापरावेच लागत नसले, तरीही पर्स वा बॅगमध्ये पैशांची वेगळी पर्स हवीच हवी. त्यात किंवा तुमच्या मुख्य पर्समध्ये एकतरी दडवलेला छोटा कप्पाही हवा आणि त्यात किमान पाचशे रूपये तरी कायम ठेवून द्यायला हवेत. शिवाय पैशांच्या पर्समध्ये काही सुट्टे पैसे नेहमी असावेत. या सुट्ट्या पैशांची कधी गरज लागेल सांगता येत नाही. पैशांच्या पर्समध्ये एटीएम कार्डबरोबर एखादं ओळखपत्र (उदा. ड्रायव्हिंग लायसन्स) कायम सोबत तर अधिक उत्तम.

३-४ चांगल्या, जाड सेफ्टीपिना
हल्ली बहुतेक जणी साड्या नेसत नसल्यामुळे सेफ्टिपिना जवळ बाळगणं कमी झालं आहे. पण किमान ३-४ लहान-मोठ्या आकाराच्या आणि चांगल्या दर्जाच्या जाड अशा सेफ्टिपिना पर्समध्ये हव्यातच. कित्येकदा अगदी अचानक त्याचा उपयोग होतो. पर्समधल्या इतर वस्तूंमध्ये त्या हरवतील असं तुम्हाला वाटत असेल, तर पर्सच्या आतल्या कप्प्याला तुम्ही सेफ्टिपिना लावून ठेवू शकता.

भाजीची फोल्डेबल कापडी पिशवी
तुम्ही भाजीखरेदी वा वाणसामान खरेदी करा किंवा करू नका. तुमच्याकडे रोजच्या पर्समध्ये एक चांगली मोठी, पातळ कापडाची, शक्यतो फोल्डेबल- जास्त जागा न व्यापणारी पिशवी हवीच. कधीतरी ऑफिसमधून घरी येताना एखादी वस्तू आणायची आहे असं एकदम आठवतं किंवा कधी मैत्रिणींबरोबर बाजारात जाण्याचा प्लान ठरतो, तेव्हा ही पिशवी फारच उपयुक्त.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know these 20 things every woman should have in her handbag nrp
First published on: 18-08-2022 at 06:40 IST