निळाशार, अथांग समुद्र कुणाला आवडत नाही? या समुद्राच्या लाटांवर स्वार व्हावं किंवा त्याच्या अंतरंगात जाऊन त्याची गुपितं जाणून घ्यावं असं कुणाला आवडत नाही? पण समुद्राच्या तळाशी जाणं जितकं मनमोहक वाटतं तितकंच ते भीतीदायकही असतं. आणि म्हणूनच सगळेजण पाण्याखाली जाण्याचं स्वप्नं पूर्ण करू शकत नाहीत. बंगळुरूच्या एका जलपरीनं मात्र तिचं हे स्वप्नं पूर्ण केलंय आणि वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी. तिचं नाव आहे कयना खरे. तिनं जगातील सर्वात लहान वयाची स्कूबा मास्टर डायव्हर होण्याचा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे स्कूबा डायव्हिंगच्या तिच्या या प्रवासाची सुरुवात फक्त दोन वर्षांपूर्वी म्हणजे ती १० वर्षांची असताना झाली. तिनं सगळ्यात आधी अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये स्कूबा डायव्हिंग सुरू केलं. त्यानंतर तिनं इंडोनेशियामधल्या बालीमध्ये ओपन वॉटर कोर्स पूर्ण केला. त्याचबरोबर तिनं थायलांडमध्ये ॲडव्हान्स्ड ओपन वॉटर कोर्सही पूर्ण केला. तिनं या दोन प्रमाणपत्रांबरोबरच अंडरवॉटर फोटोग्राफी, नायट्रॉक्स डायव्हिंगमधलं विशेष प्रावीण्य, बचाव डायव्हर प्रशिक्षण अशा अन्य कोर्सेसमध्येही प्रावीण्य मिळवलं आहे. त्यामुळेच तिला ‘मास्टर डायव्हर’ हा किताब मिळाला आहे. स्कूबा डायव्हिंग ऐकायला, बघायला जितकं छान वाटतं तितकंच ते करायला अत्यंत कठीण आहे.

समुद्राच्या आत जाणं ही एक मस्त सफर आहे असं कयनाला वाटतं. दोन वर्षांपूर्वी अंदमान निकोबारला गेली असताना तिच्या मनात पाण्याखालील जगाबद्दल कुतूहल निर्माण झालं. तिनं तिथं स्कूबा डायव्हिंग केलं आणि त्यानंतर ती स्कूबा डायव्हिंगच्या प्रेमातच पडली. खरं तर अगदी दोन वर्षांपूर्वीच कयना पोहायला शिकली. तेव्हा तिला अक्षरश: स्विमिंग पूलमधून ओढून बाहेर काढावं लागायचं असं तिची आई सांगते. तिला पाण्याबद्दल प्रचंड प्रेम आहे. अर्थात तरीही तिला स्कूबा डायव्हिंग करू द्यावं का अशी शंका तिच्या आईवडिलांच्या मनात होतीच. कारण पाण्याखाली जाण्यामध्ये अर्थातच भरपूर धोके आहेत आणि त्याचीच आम्हाला भीती वाटत होती. त्यात ती वयानंही लहान आहे. पण कयनाचं पॅशन पाहता आम्हाला माघार घ्यावी लागली असं कयनाची आई अंशुमा सांगतात. अर्थात ती तिची पहिली डाईव्ह विशेषज्ञ प्रशिक्षकांच्या देखरेखीखालीच मारू शकली, पण त्यानंतर तिला आणखी प्रशिक्षण घ्यायचं होतं. खाऊ, खेळणी यापेक्षाही तिला पाण्याचं वेड आहे.

हेही वाचा – १९४३ साली प्रवास, खरेदीसाठी खर्च केले तब्ब्ल ‘८३ कोटी’ रुपये! कोण होत्या महाराणी सीतादेवी? पाहा

अर्थात स्कूबा डायव्हिंग करण्यातही भरपूर आव्हानं आहेत. “पाण्याखाली गेल्यावर पुढच्या क्षणी काय होईल हे तुम्हाला माहिती नसतं,” अशा शब्दांत कयना आपला अनुभव सांगते. त्याशिवाय खराब हवामान, मार्ग चुकणं, समोरचं दिसेनासं होणं असं काहीही घडू शकतं. तसंच जलचर प्राणी विशेषत: मासे जीवाच्या भीतीपोटी तुमच्यावर हल्ला करण्याची शक्यता असतेच. पण या आव्हानांचा सामना करायला कयनाला मनापासून आवडतं. अंदमानमध्ये डाईव्ह करत असताना वादळ वारं सुटलं, पाऊस सुरू झाला, पाण्याच्या लाटा उसळू लागल्या, तिच्यासोबतचे डायव्हर बेशुद्ध झाले. पण अशा परिस्थितीतही तिला त्यांना खेचून बोटीपर्यंत जवळपास २० मीटर दूर आणावं लागलं. मात्र असे अडथळे तिच्या महासागर पार करण्याच्या स्वप्नाच्या आड येत नाहीत. कारण स्कूबा डायव्हिंग तिला मनापासून आवडतं. पाणी, पाण्याखालचं जग हे तिचं दुसरं घर आहे असं कयना सांगते. पाण्याखालचं जग अद्भूत आहे आणि तिला तिथे अगदी शांत आणि रिलॅक्स वाटतं. पाण्याखाली कयना जितकी खोल जाते तितकीच तिच्या स्वप्नांची भरारी उंच आहे. आजूबाजूला आपल्या वयाच्या मुली मोबाईल, सोशल मीडिया, नट्टापट्टा यांमध्ये गुंग असताना ही छोटीशी जलपरी समुद्राला गवसणी घालण्याचं स्प्नं पाहत आहे, त्यात तिला तिच्या पालकांचीही साथ आहे हे महत्त्वाचं.

हेही वाचा – Perinatal Depression : गरोदरपणात ताण घेणं सोडा! ‘या’ महिलांना हृदयविकाराचा अधिक धोका; नवा अभ्यास काय सांगतो?

स्कूबा डायव्हिंग म्हणजे काय?

स्कूबा डायव्हिंग म्हणजे पाण्याखाली डायव्हिंग करण्याचा एक खास प्रकार आहे. या डायव्हिंगमध्ये पाणबुडे पाण्याखाली जाऊन आपल्यासोबत असलेल्या टँकच्या मदतीने श्वास घेतात. स्कूबा डायव्हर्स पाण्यामध्ये जाताना आपल्यासोबत ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन जातात. भारतात अंदमान-निकोबार बेटे, लक्षद्वीप, कर्नाटकमधील तरानी बेट किंवा पिझन आयलंड आणि गोव्याच्या ग्रॅड आयलंडमध्ये स्कूबा डायव्हिंग केलं जातं. काही देशांमध्ये स्कूबा डायव्हिंगला खेळाचा दर्जा देण्यात आला आहे.