जम्मू आणि काश्मीरमधील वझिरिथल भागातील महिलांना बहुतेकवेळा अपत्याला अंधारातच जन्म द्यावा लागतो, असं सांगितलं तर त्यावर विश्वास बसेल? नक्कीच नाही! पण हेच भीषण वास्तव आहे आपल्याच देशातलं. अनियमित वीज पुरवठा आणि सार्वजनिक आरोग्य सुविधांचा अभाव, वैद्यकीय रिक्त पदे भरण्यातील गलथानपणा यामुळे जम्मू आणि काश्मीरमधील बांदिपोर जिल्ह्यातल्या दुर्गम खेड्यातील गरोदर महिलांना प्रसुतीसाठी संघर्ष करावा लागतो. खोऱ्यातल्या दुर्गम गावांत वीज नाही, प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा नाही, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये या गावातल्या गरोदर स्त्रियांची सगळी भिस्त एकविसाव्या शतकातही दुर्दैवाने तिथल्या वयस्कर अनुभवी सुईणीवर एकवटलेली आहे!

आणखी वाचा : झोपू आनंदे- स्वप्नांचा मागोवा

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Rural Health Services pregnant woman from Nandurbar lost her life due to lack of timely medical care
ग्रामीण आरोग्य सेवा : ठसठसती जखम!

जम्मू आणि काश्मीरमधल्या बांदिपूर जिल्ह्यातल्या वझिरीथलसारख्या गावांमध्ये एकतर सूर्य फार काळ किंवा रोज दिसत नाही. त्यामुळे पूर्वी इथले गावकरी रॉकेलच्या कंदिलावर आणि आताशा सौर उर्जेवर अवलंबून असतात. याच गावातील २२ वर्षांची शमिना बेगम दुसऱ्या खेपेच्या प्रसूतीबद्दलचा अनुभव सांगते. ती म्हणते, तीन दिवस सतत इथे बर्फवृष्टी होत होती. बर्फवृष्टी होत असताना या भागांत कित्येक दिवस सूर्यप्रकाश जवळपास नसतोच, साहजिकच घराचा सौर संच चार्जही होऊ शकत नाही. यातच एकेदिवशी संध्याकाळी माझी गर्भपिशवी फुटली. प्रसुतीपूर्व जीवघेण्या वेदनांनी मी कण्हत होते. माझं दुसरं अपत्य जन्माला येणार होतं. घरात सगळीकडे अंधार पसरलेला होता. एकच काय तो रॉकेलवर जळणारा कंदिल तेवत होता. माझं कण्हणं ऐकून आमच्या शेजारणी त्यांच्या त्यांच्या घरचे कंदिल घेऊन आल्या. त्या पाच कंदिलांच्या प्रकाशाने खोली भरून गेली. एप्रिल, २०२२ च्या त्या रात्री कंदिलांच्या उजेडात आईच्यासाथीने मी रशिदाला जन्म दिला. आई त्यावेळी मदतीला नसती तर गर्भपिशवी फुटल्याने दुसऱ्या बाळंतपणात मी वाचू शकले नसते, हेही तितकंच खरं आहे.

आणखी वाचा : पहिल्यांदाच चंद्रावर पडणार ‘ती’चं पाऊल…

शमिनाच्या घरापासून पाच – सहा घरे सोडून राहणाऱ्या आफरिनची गोष्ट वेगळीच आहे. २०१६ साली गुरेझमधील केंद्रिय आरोग्य केंद्रामध्ये नवऱ्याने अक्षरशः पाठीवरून प्रसुतीसाठी नेल्याचं ती सांगते. त्या केंद्रावर नेण्यासाठी तिच्या नवऱ्याने सुमो गाडी ठरवली होती. त्या गाडीपर्यंत पोहोचण्यासाठी ३०० मीटर अंतर नवऱ्याच्या पाठुंगळी बसून जाण्याशिवाय आफरिनकडे अन्य पर्यायच नव्हता. ह्या घटनेला आता आठ वर्ष उलटून गेली असली तरीही काश्मीर खोऱ्यातल्या गावांची स्थिती अद्यापही तशीच आहे. आतातर आमची सुईणही म्हातारी होत चालली आहे, कधीमधी आजारीही पडते. ही सुईण म्हणजे शमिनाची आई आहे, असंही ती सांगते.

आणखी वाचा : विश्लेषण: चर्चने लिपस्टिकच्या वापरावर बंदी का घातली होती? जाणून घ्या

वझिरीथल गावात वीजेच्या समस्येबरोबर मुलभूत आरोग्य सुविधांचाही अभावच आहे. गावापासून ५ किमी अंतरावर एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे परंतु केंद्रात वैद्यकीय कर्मचाऱ्यांची पदं रिक्त असल्याने नैसर्गिक – सामान्य प्रसुती हाताळण्याइतकीसुद्धा ही केंद्रे सुसज्ज नाहीत. बादुगम इथल्या केंद्रावर तर केवळ एकच नर्स आहे. तिच्या जीवावर बाळंतपणं कशी करणार, असा प्रश्न ५४ वर्षीय अंगणवाडीसेविका असलेली रजा बेगम विचारते. ती पुढे सांगते की, गर्भपात, सिझेरियन यासारख्या आणीबाणीच्या प्रसंगी अडलेल्या बाईला गुरेझलाच नेण्याखेरीज पर्याय उरत नाही. प्रसुतीच्या वेळी शस्त्रक्रियेसारखी स्थिती निर्माण झालीच तर श्रीनगरमधल्या हॉस्पिटलमध्येच स्त्रीरूग्णाला न्यावं लागतं. हे अंतर १२५ किमीचं आहे. वाईट हवामानामध्ये इथवर पोहोचायला नऊ तासही लागू शकतात.

गुरेझच्या आरोग्य केंद्रापर्यंत पोचायला बरेच तास लागतात, त्यानंतर तुमच्यावर औषधोपचार वगैरे व्हायला सुरूवात होते. २०२० मधे टाळेबंदीच्या काळातील शमिनाच्या पहिल्या बाळंतपणात या केंद्रातल्या सफाई कर्मचारी महिलेने तिची मदत केली होती. तिच्या प्रसववेदनांदरम्यान किंवा अपत्याच्या जन्मानंतर एकही डॉक्टर केंद्रात तिला, नवजात अर्भकाला तपासायलासुद्धा फिरकला नाही. शमिनाचा हा अनुभव खोऱ्यातल्या आरोग्यव्यवस्थेतल्या भीषणतेची जाणीव करून देण्यासाठी पुरेसा आहे.

गुरेझमधल्या प्राथमिक तसंच केंद्रिय आरोग्य केंद्रातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची आणि डॉक्टर, स्त्रीरोगतज्ज्ञ तसंच बालरोगतज्ज्ञांची अनेक वर्षांपासून कमतरता आहे. याविषयी राज्यातल्या माध्यमांमधून अनेकवार चर्चाही झालेली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राला तर फक्त प्रथमोपचार आणि एक्स रे मशिनची सुविधा पुरवण्यात आली आहे. रुग्णाला कोणत्याही वैद्यकीय आवश्यकतेसाठी ३२ किमीवरील गुरेझमधील केंद्रिय आरोग्य केंद्रात धाव घ्यावी लागते. गुरेझच्या केंद्राची अवस्था तर याहीपेक्षा भयानक आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये सोशल मीडियावर प्रसृत झालेल्या इथल्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या अहवालातील नोंदीनुसार ११ वैद्यकीय अधिकारी, ३ तज्ज्ञांसह दंत शल्यचिकित्सक, फिजिशियन, बालरोगतज्ज्ञ आणि प्रसुती स्त्रीरोगतज्ज्ञ यांची पदे रिक्त आहेत. नीती आयोगाचा आरोग्य निर्देशांकाचा अहवाल ह्या विरोधाभासावर लक्ष वेधून घेत रिक्त पदे भरण्याचे सुचवतो.

वझिरिथलमधील सुईण म्हणजेच जानी बेगम, शमिनाची आई आता ७१ वर्षांची आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होतो आहे. पण ७५ वर्षांत परिस्थिती बदललेली नाही. ३५ हून अधिक वर्षांपासून शमिनाची आईच गावातल्या गरोदर स्त्रियांची बाळंतपणं करत आलेली आहे. तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या तिच्या अनुभवीपणाची साक्ष देतात. खोऱ्यातल्या दुर्गम गावांतील गरोदर स्त्रियांच्या प्रश्नांविषयी तिची स्वतंत्र मतं आहेत. बाळंतपणात अडलेल्या स्त्रीला मदत करायली ती लहानपणापासूनच आईसोबत जात असे. बाळंतपणं कशी करायची, हे ती तिच्या आईकडूनच शिकली. सुखरूप प्रसुतीसाठी गरोदर स्त्रीची मदत करण्याचं कौशल्य आपल्याठायी असणं हा जानी आशिर्वाद समजते. बदलत्या काळानुसार प्रसुती करताना झालेल्या बदलांचीही ती साक्षीदार आहे. आजच्या महिलांना उपयुक्त पोषक आहाराबरोबरच, लोहाच्या गोळ्याही मिळत असल्यामुळे आजच्या प्रसुतीमध्ये पूर्वीच्या तुलनेत जोखीम कमी असल्याचं ती सांगते.
जम्मू आणि काश्मीरमधल्या दुर्गम खेड्यातल्या मुली आता शिकू लागल्या असल्या तरी त्यांच्यासाठीच्या आरोग्यसेवांबाबत म्हणावी तेवढी आधुनिकता या भागात अद्याप आलेली नाही, हे वास्तव आहे. इतर गावांच्या तुलनेत इथे आरोग्यसेवा सुविधांची कमतरता आहे. रूग्णालये आहेत परंतु तिथवर पोचण्यासाठी आवश्यक किमान रस्त्यांची उणीव आहे. आपत्कालीन परिस्थितीत अशावेळी गावातल्याच सुईणीशिवाय दुसरा मार्गच इथल्या महिलांसमोर उरत नाही, हेही तेवढेच दाहक सत्य आहे.