मणिपूर… रत्नांची भूमी… अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि साधीभोळी माणसं. पार महाभारतापासून उल्लेख असलेले हे राज्य देशातील ‘सेव्हन सिस्टर्स’ पैकी एक महत्त्वाचं राज्य. निसर्गाप्रमाणेच इथल्या लोकांना कलेचा वारसा भरभरून मिळाला आहे. लक्ष्मीप्रिया देवी हे असंच एक नाव. सध्य़ा जगभरातील चित्रपट क्षेत्रात गाजत असलेल्या लक्ष्मीप्रिया देवी त्यांना मिळालेल्या पहिल्या ‘बाफ्ता’ पुरस्कारासाठी तर चर्चेत आहेतच. पण पुरस्कार सोहळ्याच्या वेळेस त्यांनी जे भाषण केलं ते अधिक गाजत आहे. लक्ष्मीप्रिया देवी यांना त्यांचा पहिल्यावहिला चित्रपट ‘बुंग’ या मणिपुरी चित्रपटासाठी ‘बाफ्ता’ (British Academy for Film And Television Arts) हा पुरस्कार मिळाला. हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेला ‘बुंग’ हा पहिलाच भारतीय चित्रपट आणि लक्ष्मीप्रिया देवी या ईशान्येकडील राज्यामधील पहिल्याच भारतीय दिग्दर्शिका ठरल्या आहेत.

प्रसिध्द निर्माता अभिनेता फरहान अख्तर यांच्या ‘एक्सेल एंटरटेनमेंट’ या संस्थेनं याची निर्मिती केली आहे. प्रादेशिक वास्तव मांडणारा चित्रपट जागतिक स्तरावर नेऊन त्याची दखल घ्यायला लावण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले आहे. गेल्या काही वर्षांपासून मणिपूर सतत धगधगतं आहे. वांशिक मतभेद, हिंसाचार आणि निर्वासितांच्या समस्या असे अनेक प्रश्न इथे आहेत. त्याची झळ आपल्याला बसत नाही. या प्रश्नांचा तिथल्या रहिवाशांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतोय. सतत तणावाखाली राहत असताना त्यांची अगदी छोटी छोटी स्वप्नंही अपूर्ण राहतायेत. आपल्या कलेच्या माध्यमातून हे वास्तव मांडत असताना लक्ष्मीप्रिया देवी यांनी मनापासून इथं शांतता परत नांदावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.

लक्ष्मीप्रिया देवी यांनी हा पुरस्कार मणिपूरलाच समर्पित केला आहे. “हेच औचित्य साधून आमच्या मणिपूरमध्ये पूर्वीसारखीच शांतता नांदू दे, यासाठी मी प्रार्थना करते. चित्रपटात काम केलेल्या बाल कलाकारांसह सर्वच निर्वासित मुलांना त्यांचा आनंद, त्यांचा निरागसपणा आणि त्यांची स्वप्ने पूर्वीसारखीच परत मिळू दे.” मणिपुरी भाषेत सुरुवात करून आपल्या मातृभूमीमधल्या शांततेबाबत सर्वांनीच प्रार्थना करण्याची विनंतीही त्यांनी जगभरातील लोकांना केली. लक्ष्मीप्रिया देवी यांच्या काळजाला भिडणाऱ्या या भाषणाने अनेकांचे डोळे पाणावले.

मणिपूरमधील अत्यंत संवदेनशील लेखिका, चित्रपट निर्मात्या आणि दिग्दर्शिका म्हणून लक्ष्मीप्रिया देवी यांची ओळख आहे. विशेषत: वंचितांचा आवाज आपल्या कलाकृतींमधून मांडण्यासाठी त्या ओळखल्या जातात. त्यांच्या ‘बुंग’ या पुरसक्राप्राप्त चित्रपटातही त्यांनी मणिपूरमधील समस्या, तिथल्या मुलांचं विश्व आणि त्यांची भावनिक आंदोलने प्रभावीपणे मांडली आहेत. मणिपूरच्या सीमेवर कायमच तणाव असतो. येथील वांशिक तणाव आणि रोजच्या आयुष्यात त्याचा होणारा परिणाम या सगळ्याला सामोरे जाणाऱ्या बूंग नावाच्या मुलाची ही कथा आहे. जन्मापासूनच त्यानं हिंसाचार, वांशिक मतभेद, त्याचे होणारे परिणाम हे सगळं खूप जवळून पाहिलं आहे. एकल मातेसोबत राहणारा बूंग त्याच्या वडिलांच्या शोधासाठी त्याच्या जीवलग मित्रासोबत निघतो. आपल्या कुटुंबाला पुन्हा एकत्र आणण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बूंग या छोट्या मुलाभोवतीच ही कथा फिरते.

चित्रपटात फक्त भावनिक कल्लोळ न दाखवता मणिपूरमधली सामाजिक आणि राजकीय परिस्थितीही लक्ष्मीप्रिया देवी यांनी या अत्यंत बारकाईने मांडली आहे. ‘बुंग’ चित्रपटापूर्वी त्यांनी वेगळ्या विषयांवरील शॉर्ट फिल्म्स आणि माहितीपटांच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या बहुतांश कलाकृती या मणिपुरमधील त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित आहेत. रोजच्या जगण्यातील संघर्ष, बालपणातील निरागसपणा, भावनिक आंदोलने मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. भारतीय सिनेमा क्षेत्रात मणिपूरच्या चित्रपटांना काहीसे दुर्लक्षितच राहिले आहे. पण तरीही लक्ष्मीप्रिया देवींसारख्या संवेदनशील कलाकारांनी ईशान्येकडील सांस्कृतिक वैभव आणि तिथले बोचरे वास्तव छोट्या मोठ्या पडद्यांवर आपल्या परीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

‘बुंग’ चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर याआधीही अनेक ठिकाणी नावाजण्यात आलं आहे. २०२४ मद्ये टोरँटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये डिस्कव्हरी विभागात या चित्रपटाचा प्रीमियर झाला होता. तसेच वॉर्सा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, ५ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया आणि इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न २०२५ या ठिकाणीही ‘बुंग’ प्रदर्शित करण्यात आला होता आणि त्याचे खूप कौतुकही झाले होते. ‘बुंग’ चित्रपट सर्वदूर तर पोहोचला आहेच. पण लक्ष्मीप्रिया देवींनी जी इच्छा प्रदर्शित केली आहे तसे मणिपूरमधली शांतता परतली तर अनेकांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण होतील आणि ही रत्नांची भूमी पुन्हा एकदा झळाळून उठेल!