"आजपर्यंत कितीतरी चांगली स्थळं नाकारली या पोरीनं! तिच्या मनात कुणी आहे का विचारलं तर तेही नाही म्हणते. आम्हीतर जातपात पण बघणार नाही. तिला आवडणारा पोरगा खरंच चांगला वाटला तर आनंदाने लग्न लावून येऊ. पण ही मूग गिळून बसलीये नुसती! ताई, ती तुझ्याजवळ मोकळं बोलते. तूच बोल तिच्याशी आणि तिच्या मनात नेमकं काय आहे विचार बाई ! " विभावरी आपल्या मोठ्या बहिणीशी- सुनंदाशी मुलीच्या काळजीपोटी बोलत होती. विभावरीची मुलगी काया आता अठ्ठावीसची झाली होती आणि तिला आलेल्या स्थळापैकी कोणताही मुलगा पसंतच पडत नव्हता. तिच्या मावशीनं तिच्याशी बोलण्यासाठी खास बाहेर जेवायला जायचा बेत ठरवला आणि थोडं कायाच्या कलानं घेऊन सुनंदानं विचारल्यावर काया बोलती झाली . "मावशी, आपण आपलं संपूर्ण आयुष्य कुणासोबत घालवावं याबद्दल आपलं मत पक्कं झालं असेल तर पुढे काय निर्णय घ्यावा?" "अगं, आम्ही तेच तर बोलतोय. तुझ्या मनात कुणी असेल तर सांग ना. मी तर तुझ्या बेस्ट फ्रेंडशी- मोनिकाशीसुद्धा बोलले. पण ती म्हणाली, तुझा कुणीच 'बॉयफ्रेंड' नाही. मग आता तूच बोल बाई!" "मोनिकानं सांगितलं मला आणि ती बरोबर म्हणतेय, माझा कुणीच बॉयफ्रेंड नाही. कारण मला मुलं नाही, तर मुली आवडतात. अगदी खरं बोलायचं तर मला मोनिकाच आवडते." "तू गंमत करतेयस का माझी?" "नाही मावशी. मी खरं काय तेच बोलतेय. आई-बाबांनी इतकी चांगली स्थळं आणली, पण मी नाकारली, कारण मला मुलाशी लग्नच नाही करायचं. मी 'लेस्बियन' आहे. हे मला माहित असूनही केवळ समाजासाठी एका पुरुषाशी लग्न करून त्याचं आयुष्य मी खराब नाही करणार. नकार देताना एकाजवळही खरं कारण बोलण्याचं धाडस आजवर माझ्याजवळ नव्हतं. आईबाबांनाही मी कधी हे सांगू शकले नाही. किती वर्ष झाली, माझ्या मनाचा प्रचंड कोंडमारा होतोय. वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षापासून मला काही वेगळं जाणवू लागलं. मला मुलांबद्दल नाही, तर मुलींबद्दल शारीरिक आकर्षण वाटतं ते लक्षात येत होतं. सोळाव्या वर्षीच मी मोनिकाच्या प्रेमात पडले होते. हे प्रेम खूप दिवस मनातच ठेवलं. पण एकदा भीत भीत तिला सांगितलं. तिलाही माझ्याबद्दल तशाच भावना आहेत म्हटल्यावर मला इतका आनंद झाला होता सांगू! माझ्या मनातल्या सततच्या गोंधळावर जणू उत्तर मिळालं होतं. आता मला सांग, तिच्याबद्दल मला जे वाटतंय ते मी आईबाबांना कसं समजावून सांगू? ती गेली पंधरा वर्षं सतत घरी येतेय. जगासाठी आम्ही केवळ बेस्ट फ्रेंड आहोत. ती आईबाबांची जणू दुसरी मुलगी असल्यासारखी घरात वावरते. आता तिलाच माझी 'जोडीदार' म्हणून त्यांच्या समोर कसं उभं करू? एवढं धैर्य अजून नाही आम्हा दोघींत." हेही वाचा. मला कुण्णाची मदत लागत नाही?’… बायांनो, मदत घ्या ! काया एका दमात सगळं बोलली. मावशी काही क्षण शांत बसली. प्रथम तिचा विश्वासच बसत नव्हता. या विषयी ऐकलंय, वाचलंय, पण आपली काया 'अशी' असेल हे नाही वाटलं, अशी काहीशी तिची पहिली भावना होती. पण लगेच सुनंदाला त्या विचारातली चूक लक्षात आली. तिनं आणखी थोडा वेळ विचार केला. कायाच्या जागी स्वतःला ठेवून पाहिलं आणि मग तिला कायाचं मन कळलं. चहाचा घोट घेऊन सुनंदा म्हणाली, "काया, इतकी वर्षं तू किती मानसिक त्रास सहन केला असशील याची कल्पना येतेय मला. तुझ्या भावना मी समजू शकते. तिनं तिच्या घरी हे सांगितलं आहे?" "हो, पण तिच्या घरी माहित झाल्यापासून मला तिथे जायला बंदी आहे. गेलं वर्षभर मी त्यांच्याकडे गेले नाही. आमची ही भावना काही काळाने बदलेल असं त्यांना वाटतं. तसं होत नसतं नं मावशी! या भावना नैसर्गिक असतात. त्या जबरदस्तीने बदलता येत नसतात. हे त्यांना कुणी सांगायचं?" हेही वाचा. आयुर्वेदाच्या स्मृतीतून: गवती चहा, तुळस व आलं "काया, तुझ्या निर्णयात मी तुला साथ देईन. मी तुझ्या आईबाबांनापण समजावून सांगेन. पण एक लक्षात घे, की त्यांच्यासाठी हे स्वीकारणं अत्यंत अवघड जाणार आहे. त्यांच्या मनातील स्थित्यंतरं त्यांना पार कोलमडून टाकू शकतात. तुझ्या सुखासाठी ते तुला सपोर्ट करतील असं मला नक्की वाटतं. पण त्यांच्यासाठी ते अत्यंत कठीण असणार आहे याची तुला जाणीव ठेवावी लागेल. थोडं त्यांनाही समजून घ्यावं लागेल तुला. दुसरा मुद्दा म्हणजे आपले कायदे. त्या आघाडीवरही अजून फार मोठा लढा बाकी आहे. आज तू माझ्याजवळ मन मोकळं केलंस हे उत्तम झालं. आता तुला पुढील काही काळ अत्यंत धीराने वागावं लागेल. समाजाशी, नातेवाईकांशी आणि स्वतःशी प्रामाणिक राहावं लागेल. जे सत्य आहे त्याला ठामपणे सामोरं जाण्याची दोघीजणी तयारी ठेवा. मी तुम्हाला साथ देईन. तुझ्या आईबाबांनंतर आपण सर्वजण मोनिकाच्या घरी जाऊन तिच्या आईबाबांंशीसुद्धा बोलूया." कायानं प्रेमानं मावशीला मिठीच मारली. तिच्या मनातील वादळाला आणि मग समाजाला सामोरं जाण्यासाठी तिला मावशीची साथ लाभणार होती. adaparnadeshpande@gmail.com