भारतीय लष्कराच्या इतिहासात शौर्य आणि पराक्रमाच्या अनेक गोष्टी आपण ऐकत आलो आहोत. गेल्या काही वर्षांत यामध्ये महिलांचा सहभागदेखील वाढत आहे. नुकतीच लेफ्टनंट दीक्षा त्रिपाठी यांनी पुण्यातील ‘लष्करी शारीरिक प्रशिक्षण संस्थेत’ (AIPT) जो पराक्रम गाजवला, तो केवळ एका वैयक्तिक यशाचा टप्पा नाही, तर भारतीय लष्करातील महिलांच्या वाढत्या प्रभावाचे संकेत आहेत. अत्यंत खडतर मानला जाणारा ‘लष्करी मार्शल आर्ट्स रूटीन’ (AMAR) हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या दीक्षा त्रिपाठी या पहिल्या महिला लढाऊ सैनिक ठरल्या आहेत.
काय असतो हा ‘अमर’ (AMAR) अभ्यासक्रम?
२०२३ मध्ये भारतीय लष्कराने आपल्या प्रशिक्षण प्रणालीत एक क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे. काळानुसार युद्धाचे स्वरूप बदलत असताना, प्रत्यक्ष समोरासमोरच्या लढाईत आपला सैनिक सर्वप्रकारे निष्णात असावा, या उद्देशाने ‘अमर’(Army Martial Arts Routine) या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली. ही केवळ एक मार्शल आर्ट्सची पद्धत नाही, तर ती पारंपरिक भारतीय युद्धकला आणि जागतिक तंत्रांचा एक संगम आहे.
या प्रशिक्षणात नि:शस्त्र लढाई, आधुनिक शस्त्रांचा प्रभावी वापर आणि प्रतिकूल परिस्थितीत मानसिक संतुलन राखणे यावर भर दिला जातो. विशेषतः जेव्हा शत्रू अगदी जवळ असतो आणि शस्त्रे उपलब्ध नसतात, अशा वेळी स्वतःचा बचाव करत शत्रूवर आक्रमक हल्ला कसा करावा, याचे तंत्र यात शिकवले जाते. जे त्यांना भारताच्या उत्तर सीमेवरील १४,००० फुटांपेक्षा जास्त उंचीच्या प्रदेशांसारख्या खडतर वातावरणातील मोहिमांसाठी सज्ज करते. लेफ्टनंट दीक्षा यांनी या आव्हानात्मक प्रशिक्षणात केवळ सहभाग घेतला नाही, तर पुरुष सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून उत्कृष्ट कामगिरी करत हा गड सर केला.
लेफ्टनंट दीक्षा त्रिपाठी यांची नियुक्ती ‘फायर अँड फ्युरी कॉर्प्स’मध्ये आहे, ज्याचे कार्यक्षेत्र लडाखसारख्या अतिउंच आणि दुर्गम भागात येते. ‘अमर’ अभ्यासक्रमाची रचनाच मुळात अशा उंचीवरील ठिकाणांचा विचार करून केली आहे, जिथे हवेतील ऑक्सिजन कमी असतो आणि रक्त गोठवणारी थंडी असते. अशा वातावरणात शारीरिक कामगिरीवर मर्यादा येतात, मात्र दीक्षा यांनी प्रचंड धैर्याने आणि चिकाटीने या सर्व मर्यादा ओलांडल्या. लष्कराच्या प्रवक्त्यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘त्यांनी केवळ अमर अभ्यासक्रमातील अटीच पूर्ण केल्या नाहीत, तर त्या प्रक्रियेत स्वतःच्या मानसिक कणखरतेची नवी उंची गाठली.’
लेफ्टनंट दीक्षा त्रिपाठी यांचे यश हे एका अमूलाग्र बदलाचा एक भाग आहे. डिसेंबर २०२२ मध्ये आर्मी मेडिकल कॉर्प्समधील मेजर दीक्षा सी. मुदुदेवन यांनी ‘बलिदान’ बिल्ला मिळवून एक इतिहास रचला होता. विशेष दलांचे (Special Forces) सदस्यत्व दर्शवणारा हा बिल्ला मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. ही परंपरा आता दीक्षा त्रिपाठी पुढे नेत आहेत.
एकेकाळी लष्करातील महिलांची भूमिका ही काहीशा सेवांपुरती मर्यादित होती. मात्र, आज काळानुरुप चित्र बदलत चालले आहे. २०१६ मध्ये हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून महिलांची भरती झाली आणि आज त्या राफेल आणि सुखोई-३० सारखी अत्याधुनिक विमाने लीलया हाताळत आहेत. नौदलातही युद्धनौकांवर महिलांची नियुक्ती सुरू झाली आहे. लष्कराच्या तोफखाना (Artillery) आणि लष्करी विमानचालन (Aviation) यांसारख्या लढाऊ विभागांत आता महिलांचाही समावेश आहे.
जरी पायदळ (Infantry) आणि चिलखती दलात (Armoured Corps) महिलांचा प्रवेश अद्याप पूर्णतः झाला नसला, तरी ‘अमर’ सारख्या अभ्यासक्रमांतील यश हे याचेच निदर्शन आहे की, आजची महिला ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कोणत्याही लढाऊ भूमिकेसाठी सज्ज आहे. पॅरा-जंपिंग, लांब पल्ल्याची धाव आणि आता मार्शल आर्ट्समध्ये महिलांनी प्रावीण्य मिळवले आहे.
लेफ्टनंट दीक्षा त्रिपाठी यांची ही कामगिरी आगामी काळात अनेक तरुण मुलींना भारतीय संरक्षण दलात सामील होण्यासाठी प्रेरेणा देणारी ठरेल. ठाम निश्चय असेल आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतीही सीमा ओलांडता येते, हेच दीक्षा यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. rohit.patil@expressindia.com
