मल्लिका चौकर
मी घराबाहेर राहायला लागले ते मास्टर्स करण्यसाठी स्वीडनला गेल्यावर. स्वीडनला शिक्षणासाठी गेल्यावर एकटे राहताना मला लक्षात आले की मला स्वयंपाक करता येतो, पण वाणसामान आणणे, दररोज जेवायला काय बनवायचे याची प्लानिंग, घराचे आर्थिक नियोजन, घर व्यवस्थापन यातले काहीच मला धड जमत नव्हते. त्यामुळे सुरुवातीला माझे अनेक गोंधळ व्हायचे. कधीकधी स्वयंपाक करायला सुरुवात केल्यावर लक्षात यायचे की आपल्याकडे त्यासाठी लागणारा एखादा जिन्नस नाहीये. मग गॅसवर चढवलेले भांडे काढून पुन्हा ग्रोसरी स्टोअरला जावे लागायचे. अभ्यास, युनिव्हर्सिटी, घरातली कामं, स्वयंपाक हे सगळं करताना माझी त्रेधातिरपिट व्हायची, चिडचिड व्हायची. टक्केटोणपे खात मी हळूहळू हे सगळं शिकले. माझ्याच वयाचे स्टुडंट हाऊसिंगमध्ये राहणारे माझे युरोपिअन शेजारी मित्रमैत्रिणी मात्र फार सराईतपणे घर मॅनेज करायचे. किचनमध्ये, फ्रीजमध्ये काय काय शिल्लक आहे, ते बघून कमीत कमी गोष्टी विकत आणून जेवण करायला त्यांना छान जमायचे. आपला साधारणतः घरखर्च होतो, त्यातले ग्रोसरीसाठी किती खर्च होतात, हेही त्यांना व्यवस्थित माहीत असयाचे. या शेजारी मित्रमैत्रिणींकडून मी ग्रोसरी प्लानिंग करायला शिकले.

आमच्या स्टुडंट हाऊसिंगमध्ये राहणारी माझी जिवलग मैत्रीण- सारा ही मूळची जर्मनीची. तीपण स्वीडनला मास्टर्स करायला आली होती. मास्टर्स पूर्ण झाल्यावर मी पी.एचडी करायला नेदरलॅण्डला गेले, तर सारा जर्मनीला परत जाऊन तिथे नोकरी करू लागली. गेल्या महिन्यात मी एका कॉन्फरन्ससाठी जर्मनीला गेले होते. ती कॉन्फरन्स नेमकी होती, सारा राहते त्याच शहरात. त्यामुळे मग कॉन्फरन्स झाल्यावर मी दोन दिवस साराला भेटणार आणि तिच्याच घरी राहणार असा प्लान ठरला. ठरल्या दिवशी व वेळी सारा मला कॉन्फरन्स सेंटरवर घ्यायला आली आणि तिच्या गाडीने आम्ही तिच्या घराकडे निघालो. गाडीत बसल्यावर तिने मला सांगितले की, तू दोन दिवस इथे माझ्या आईबाबांबरोबर राहणार आहेस, त्यांच्या घरच्या गेस्ट बेडरूममध्ये. मी आईबाबांच्या घरापासून अगदी जवळच असलेल्या माझ्या घरी राहणार आहे. आईबाबांच्या घरी तुझे सामान ठेवून आपण माझ्या घरी जाऊ, डिनर करू, मग मी तुला झोपायला परत त्यांच्या घरी सोडेन. माझे घर तसे छोटे आहे, त्यामुळे तिथे जास्तीचा बेड नाहीये.

तिच्या आईबाबांच्या घरातल्या गेस्ट बेडरूममध्ये मी गेले तर ती बेडरूम तिच्या आईबाबांनी माझ्यासाठी एकदम सज्ज करून ठेवली होती. मी नेदरलॅण्डमधून येणार म्हणून नेदरलॅण्डच्या फेमस विंडमिलचे फोटो त्यांनी इंटरनेट वरून शोधून प्रिंट करून भिंतीवर चिकटवले होते. मला छोट्या दिव्यांच्या माळा (fairy lights) आवडतात हे साराकडून कळल्यामुळे त्याही लावल्या होत्या. माझ्यासाठी टॉवेलची घडी, पांघरूण सज्ज होते. मला ती बेडरूम खूपच आवडली. मी गेले तेव्हा साराच्या आईबाबांचा चर्चचा काही कार्यक्रम होता, त्यामुळे त्या संध्याकाळी ते बाहेर गेले होते.
साराचे घर तिच्या आईबाबांच्या घरापासून चालत ७-८ मिनिटांच्या अंतरावर होते. सारा शेअरिंगमध्ये राहते. म्हणजे ७-८ बेडरूमचे मोठे घर काहीजण मिळून शेअर करतात. कॉमन किचन, हॉल, बाथरूम आणि बेडरूम आपापली अशी ही सोय. त्यामुळे या घरांचे रेंट तसे कमी असते आणि इतर शेजाऱ्यांची सोबतपण मिळते. तिच्या हाऊसमेटशी गप्पा मारत त्यांच्या कॉमन किचनमध्ये मी आणि साराने डिनर बनवलं. जेवण झाल्यावर मी चालत साराच्या आईबाबांकडे माझ्या मुक्काम स्थळी गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट साराच्या आईबाबांबरोबर त्यांच्या घरी करणार होते आणि साराही ब्रेकफास्टला आईबाबांच्या घरी येणार होती. त्यांनी सुंदर प्रकारे ब्रेकफास्ट मांडून ठेवला होता. वेगवेगळे जर्मन ब्रेड, त्यांनी घरी बनवलेले जाम, चीज, कॉफी असा एकदम जर्मन ब्रेकफास्ट मेनू होता. साराच्या आईला बऱ्यापैकी इंग्लिश येत होतं. तिच्या बाबांना अगदीच थोडं इंग्लिश येत होतं, मात्र तरीही ते गप्पा मारायला फार उत्सुक होते. सारा तिच्या घरून येईपर्यंत साराचे आईबाबा आणि मी आम्ही तिघं मस्त गप्पा मारत होतो. थोड्याच वेळात सारा आलीच ब्रेकफास्ट करायला. येताना कपड्यांचं गाठोडं घेऊन आली. तिच्या घरातलं वॉशिंग मशीन बिघडलं होतं म्हणून. आम्ही चौघांनी मस्त ब्रेकफास्ट केला आणि मग तिच्या आईबाबांचा शेतमाळा बघायला सारा, तिची आई आणि मी आम्ही निघालो. त्यांनी हौस म्हणून एक छोटासा शेतमळा जवळच्या गावी फुलवला आहे. तिथे ते टोमॅटो, लेट्युस, भोपळा अशा काही भाज्या स्वतःपुरत्या पिकवतात. त्यांच्या शेतमळ्यावर तयार झालेली गाजरं, टोमॅटो, लेट्युस आम्ही काढली आणि घरी घेऊन आलो. आम्ही परत येईस्तोवर साराच्या बाबांनी साराचे कपडे धुवून, इस्त्री करून ठेवले होते. दुपारचे जेवण झाल्यावर सारा मला तिचं गाव फिरवायला घेऊन गेली.

ही सगळी व्यवस्था बघून मी बुचकळ्यात पडले होते. साराच्या आईबाबांना सारा ही एकुलती एक मुलगी. त्या तिघांची किती प्रेमळ नाती आहेत एकेमेकांशी! तरी सारा एकटीच राहते शेअर्ड हाऊसमध्ये. तीनमजली, चार बेडरूमच्या प्रशस्त घरात तिचे आईबाबा दोघेच राहतात. साराचं शेअर्ड हाऊस तिच्या आईबाबांच्या घरासारखं सुंदर आणि कलात्मक नाहीये, कॉमन किचन असल्यामुळे ते तितकं टापटीपही नाहीये. ती राहते तिथून तिच्या आईबाबांचं घर जेमेतेम ७-८ मिनिटं चालत अंतरावर. तरी सारा का वेगळी राहते, हे मला कळत नव्हतं. न राहवून मी त्याबद्दल तिला विचारलं. तर ती म्हणली, “अगं, मी आत्ता २७ वर्षांची आहे. आमच्याकडे जास्तीत जास्त वय २१ होईपर्यंत मुलांनी आईबांच्या घरी राहण्याला मान्यता आहे. आमच्या शेजाऱ्यांचा मुलगा २४ वर्षांचा झाला तरी तो आईबाबांबरोबरच राहतो, तर त्याची गावभर चर्चा आहे! त्या मुलाच्या आईने तर त्याला ताकीद दिली आहे की २५ व्या वाढदिवसाच्या आधी त्याने घरातून बाहेर पडायचं.’’
सारा वयाच्या १८व्या वर्षापासूनच आईबाबांच्या घरापासून वेगळी राहतेय. तीन-चार वर्षांपूर्वी तिच्या आईबाबांनी त्यांच्या घरातल्या साराच्या सगळ्या गोष्टी आवरून घरातल्या स्टोअर रूममध्ये ठेवल्या. थोडक्यात काय, तर आता हे तुझं राहतं घर नाही, गरज लागेल तेव्हा, सुट्टीसाठी अशी कधी कधी तू नक्की येऊ शकतेस, पण आता हे तुझं घर नाही- असा हा संकेत!

मला कसंतरीच वाटलं हे ऐकून. माझ्या आईबाबांच्या मुंबईतल्या घरापासून मी काही हजार किलोमीटर दूर राहते. वर्षातून एकदाच २०-२५ दिवस तिथे जाते. तरीही मी त्या घराला माझंच घर म्हणते. ते ‘आईबाबांचं घर’ असं संबोधायला मला विचित्र वाटतं. त्या घरातली माझी बेडरूम, माझं कपाट याबद्दल मी खूप पझेसिव्ह आहे. माझं कपाट आईने मला न विचारता आवरलेलं मला फारसं रुचत नाही. घराच्या किल्ल्यांचा माझा हक्काचा असलेला सेट त्यांनी मी गेल्यापासून शेजाऱ्यांकडे राखीव म्हणून ठेवायला दिला, हे मला कळलं, तेव्हा मला जाम रागच आला होता. आणि इथे साराच्या आईने सरळ तिचं सामान गुंडाळून स्टोअर रूममध्ये ठेवलं होतं, याचं साराला काही वावगं वाटलं नव्हतं!

मुलांनी २०-२१ वर्षांचं झाल्यावर आईबाबांच्या घराबाहेर पडून स्वतःचं घर थाटणं हा इथे ठाम संकेतच आहे. त्यामुळे अगदी लहानपणापासूनच मुलांना स्वयंपूर्ण घडवलं जातं. मुलंसुद्धा आजूबाजूला हेच बघत मोठी होतात, त्यामुळे अगदी लहानपणापासूनच ती घरातल्या जबाबदाऱ्या घेतात. माझी डच मैत्रीण मला सांगत होती की, ती १२-१३ वर्षांची असल्यापासून ते आईबाबांचे घर सोडेपर्यंत आठवड्यातून एक दिवस स्वयंपाकाची पूर्ण जबाबदारी घेऊ लागली होती. त्या दिवशी जेवण काय बनवायचं आहे हे ठरवणं, त्यासाठीचं वाणसामान आणणं, ते जेवण एकटीने बनवणं ही तिची जबाबदारी होती. आणखीन एक दिवस ही जबाबदारी तिची बहीण घ्यायची आणि उरलेले पाच दिवस तिचे आई आणि बाबा मिळून. तिच्या ठरलेल्या दिवशी जर अचानक मित्रमैत्रीणींबरोबर काही प्लान ठरला, तर ती तोसुद्धा रद्द करायची, कारण त्या संध्याकाळी तिला घरी वेळेत येऊन जेवण बनवायचंच असायचं.

आपल्याला स्वतंत्रपणे सगळं काही करायला जमलं पाहिजे, यासाठी माझे युरोपियन मित्र-मैत्रिणी असे स्वत:ला सज्ज करतात, त्यांचे पालकही त्यांना त्यासाठी तयार होण्यासाठी आग्रही असतात. १८-२० वर्षांचे होईपर्यंत कोणाच्याही मदतीशिवाय, स्वतःच्या विचारांनी, स्वतःच्या इच्छेप्रमाणे आयुष्य जगताना ते दिसतात खरे, पण त्यासाठी लहानपणापासून त्यांनी कष्टपूर्वक तयारी केलेली असते. इथे युनिव्हार्सिटीमध्ये स्वस्तातली मेस नसते की सफाईची सेवा नसते. त्यामुळे घरापासून लांब शिकायला गेल्यावर साफसफाई, स्वयंपाक सगळं काही स्वत:वर येऊन पडतं. आर्थिक भारही आपला आपण पेलायचा असतो, त्यामुळे आर्थिक कमाईसाठी काही वेळ आणि कष्ट खर्ची पाडावे लागतात. इथे सगळेचजण स्वतंत्र आयुष्य जगण्याची पुरेपूर किंमत कष्टाने मोजतात. हे सगळं मला गेली पाच वर्षे युरोपात राहून ऐकून, बघून माहीत होतं, पण साराच्या घरी राहिल्यावर मला तो फरक अधिक जवळून अनुभवता आला.

mallikachaukar@gmail.com