शनिवारची रात्र… घरात सगळे झोपले होते. मोबाईलच्या स्क्रीनचा हलका प्रकाश मात्र अजूनही एका खोलीत दिसत होता. एका १४ वर्षांच्या मुलीचा. ती ‘live’ होती, पण तिच्यासाठी तो फक्त एक व्हिडिओ नव्हता- तो एक सापळा होता.
पीडितेच्या आईने तक्रार केली की तिची मुलगी रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरते आणि कोणाशी तरी व्हिडिओ कॉलवर असते. सुरुवातीला तिला वाटलं की, ऑनलाइन क्लास किंवा मैत्रिणीशी बोलत असेल. पण तिच्या मुलीचं वागणं बदलायला लागलं. ती घाबरलेली, चिडचिडी आणि एकटी राहू लागली. तपास केल्यानंतर जे समोर आलं, ते धक्कादायक होतं.
मुलीची ओळख सोशल मीडियावरील एका व्यक्तीशी झाली होती. त्या व्यक्तीनं स्वतःला तिच्या वयाचा असल्याचं सांगितलं. काही दिवसांतच त्याने तिचा विश्वास संपादन केला. मग एक दिवस त्याने ‘private video call’ ची विनंती केली.
सुरुवातीला साधा संवाद… नंतर हळूहळू तो तिला वेगवेगळ्या गोष्टी करायला सांगू लागला. मुलगी नकार देत होती, पण त्याने आधीच्या चॅट्स आणि काही स्क्रीनशॉट्स दाखवून धमकावलं- “जर तू नाही केलंस, तर मी हे सगळं तुझ्या मित्रांना आणि कुटुंबाला पाठवेन…”
मुलगी घाबरली आणि तिथून सुरू झाला ‘live streaming abuse.’पुढील तपासात लक्षात आलं की, तो कॉल फक्त त्या व्यक्तीपुरता मर्यादित नव्हता- तो रेकॉर्ड होत होता आणि इतर लोकांपर्यंत पोहोचत होता. सायबर गुन्हेगार गरीब किंवा असुरक्षित कुटुंबातील मुला-मुलींना टार्गेट करतात. सायबर तपास करताना ‘Live Streaming Abuse’ आणि ‘sextoration’ हा प्रकार सर्वात वेदनादायक आणि धोकादायक वाटतो. कारण यात गुन्हा ‘रेकॉर्ड’ होतो, पण तो एकाच ठिकाणी नाहीतर वेगवेगळ्या ठिकाणावरून रेकॉर्ड केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये त्याला थांबवणं अवघड… आणि अनेक वेळा जगभरातील लोक त्याला प्रत्यक्ष पाहत असतात.
Live Streaming Child Abuse म्हणजे नेमकं काय?
हा असा प्रकार आहे ज्यात अल्पवयीन मुलींना जबरदस्ती, फसवणूक किंवा धमकावून live व्हिडिओद्वारे शोषण केलं जातं.
यामध्ये- • गुन्हेगार मुलींशी संपर्क साधतो (social media / gaming / chat apps)
• विश्वास संपादन करतो.
• व्हॉइस कॉल सुरू करतो.
• मग व्हिडिओ कॉल सुरू करतो.
• आणि नंतर धमकी देऊन live abuse करवून घेतो.
हे सर्व रिअल टाईममध्ये होत असल्यामुळे त्याचा पुरावा गोळा करणंही कठीण असतं. आणि जो पुरावा हाती येतो त्याची वैधता तपासणे क्लिष्ट स्वरूप घेते.
हा प्रकार इतका धोकादायक का आहे?
• गुन्हा त्वरित घडतो, त्यामुळे त्याचे रेकॉर्ड नसण्याची शक्यता असते.
• एकाच वेळी अनेक लोक पाहत असतात.
• याचा मुलांवर मानसिक दबाव प्रचंड असतो.
• एकदा कंट्रोल गेला की थांबवणं कठीण होतं.
पालकांसाठी महत्त्वाचे संकेत :
• मुलं अचानक रात्री उशिरापर्यंत व्हिडिओ कॉल करत असतील…
• कॉल दरम्यान दरवाजा बंद ठेवण्याची सवय…
• वर्तणुकीत भीती, दडपण किंवा चिडचिड वाढणं…
• अचानक मोबाईचा लपून वापर करणं…
काय करायला हवं?
• मुलांशी संवाद साधा.
• कोणीही काहीही सांगितलं तरी तू सुरक्षित आहेस, हा विश्वास द्या
• अनोळखी व्यक्तींचे व्हिडिओ कॉल टाळण्याचे नियम आखून द्या.
• कोणतीही धमकी आली, तर लगेच रिपोर्ट करा.
सोशल मीडियावर आजचा धोका हा फक्त फोटो किंवा चॅटपुरता मर्यादित नाही तो ‘live’ होतो हा आहे.
स्क्रीनच्या पलीकडे कोण आहे, किती लोक आहेत, हे आपल्याला दिसत नाही. परंतु त्याचे परिणाम मात्र खूप भयानक असतात. (सायबर फॉरेन्सिक विश्लेषक)
