साधारण सत्तर वर्षांपूर्वीची गोष्ट. हेनरिएटा लेक्स या अफ्रिकन अमेरिकन महिलेच्या पोटात बाळ वाढत होतंच आणि त्यासोबतच कॅन्सरची गाठही… या बाळाच्या जन्मानंतर चार महिन्यांनी तिला गर्भाशयाच्या मुखाजवळ गाठ असल्याचं लक्षात आलं आणि तिनं लगेच डॉक्टरकडे धाव घेतली. तिला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचं निदान झालं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यूही झाला, पण त्याकाळी हा दुर्मिळ आजार असल्याने डॉक्टर तिच्या शरीरातील काही पेशी काढून घेऊन संशोधन केलं आणि त्यामध्ये त्यांना अशा काही गोष्टी सापडल्या ज्यांनी मानवी आरोग्यावर उपचार करण्यात त्या पेशींनी मोलाची भूमिका बजावली. वैद्यकीय क्षेत्रातली एक नवी क्रांतीच होती. लेक्स स्वत:ला कर्करोग झाला असताना देखील मृत्यूपश्चात जगासाठी वरदान ठरली.

हेनरिएटा लेक्सचा जन्म १ ऑगस्ट १९२० मध्ये व्हर्जिनिया येथे एका आफ्रिकन -अमेरिकन गरीब कुटुंबात झाला. अवघ्या चार वर्षांची असताना तिच्या आईचं अकाली निधन झाल्यानं तिचं व तिच्या भावंडांचं पालनपोषण वडील व आजोबांनी केले. १० एप्रिल १९४१ रोजी त्यांचा विवाह डेव्हिड लेक्स यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांना पाच अपत्ये झाली. पाचव्या अपत्याच्या जन्मनंतर त्यांना यांना गर्भाशयाच्या मुखाशी गाठ असल्याने त्रास होऊ लागला. उपचारासाठी त्या जॉन्स हॉपकिन्समध्ये दाखल झाल्या. हे त्याकाळी कृष्णवर्णीयांवर उपचार करणारे एकमेव रुग्णालय होते. परंतु दुर्दैव असे की उपचारादरम्यान ४ ऑक्टोबर १९५१ रोजी त्यांचं निधन झालं.

हेही वाचा >>>महिलांसाठीची ड्रोन पायलट योजना नेमकी काय आहे ?

हेनरिएटा लेक्स यांच्यावर उपचार करणारे डॉ. हॉवर्ड जोन्स यांनी तिच्यावर उपचार करत असताना ती व तिच्या कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय तिच्या गर्भाशयामधील पेशींचे काही नमुने घेऊन ते संशोधनासाठी पाठवले. त्यात त्यांना एक वेगळी गोष्ट जाणवली. ती इतर मानवी पेशींपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि दुर्मिळ होती.

त्यावेळी मानवी पेशींवर प्रयोग करणारे जॉर्ज गे हे प्रयोग शाळेत मानवी पेशी वाढविणे शक्य आहे का यावर संशोधन करत होते. हेन्रिएटाच्या पेशींचे नमुने त्यांच्याकडे यायच्या आधी त्यांनी असंख्य वेळा हा प्रयोग करून पाहिला, पण जितके नवीन पेशींचे नमुने येत होते ते ठराविक कालावधीपर्यंतच जिवंत राहत होते. नंतर त्या निष्क्रीय, मृत होऊन जात. पण हेनरिएटाच्या पेशींवर प्रयोग करताना त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. ते म्हणजे तिच्या पेशी न मरता स्वत:हून विभाजित होऊन जिवंत राहू शकत होत्या. जॉर्ज यांनी त्या पेशींचे अमरत्व ओळखून त्या पेशींना हेनरिएटा लॅक्स ची आठवण म्हणून तिच्या नावातील अद्याक्षरं घेऊन त्या पेशींना ‘हेला’ (HELA) असे नाव दिले.

हेही वाचा >>>Afghanistan Taliban Rules For Women : आता स्त्रियांच्या आवाजावरही बंदी, तालिबानच्या नव्या फतव्यात महिलांवर जाचक निर्बंध!

पुढे जॉर्ज यांनी त्या पेशींविषयी त्यांचे संशोधक सहकारी तसेच अन्य देशांतील संशोधकांना सांगितलं. याच पेशींचा आधार घेऊन जोनस सॉल्क यांनी पहिली पोलिओ लस विकसित केली. इतकेच नव्हे तर कर्करोगग्रस्तांना केमाेथेरपी देण्यात, तसेच हल्लीच येऊन गेलेल्या कोरोना महामारीत कोविड लस बनवण्यात देखी ‘हेला’ सेलचे मोठे योगदान आहे. आजही विविध गंभीर, गुप्त आजारांवर उपचारांच्या शोधासाठी ‘हेला’ सेलचा वापर केला जातो.

वैद्यकीय क्षेत्रातील या योगदानाबद्दल हेनरिएटाचा सन्मान म्हणून ६ ऑक्टोबर २०१८ रोजी जॉन्स हॉपकीन्स विद्यापीठाने त्यांच्या विद्यापीठातील एका बिल्डिंगला तिचे नाव दिले. तसेच ऑक्टोबर २०२१ मध्ये ब्रिस्टल विद्यापीठाने रॉयल फोर्ट हाऊस येथे तिच्या पुतळ्याचे अनावरण केले. इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी कृष्णवर्णीय महिलेचा पुतळा उभारण्यात आला. तर ४ ऑक्टोबर २०२३ रोजी व्हर्जिनियामध्ये लेक्स प्लाझा येथेदेखील त्यांचा कांस्य धातूपासून बनवलेल्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तर काही ठिकाणी तिच्या नावाने शाळादेखील सुरू करण्यात आल्या आहेत.

हेनरिएटा लेक्स ही वैद्यकीय संशोधन क्षेत्रातील एक महान नायिका आहे. कर्करोगामुळे तिचे स्वत:चे प्राण तर वाचू शकले नाहीत, पण तिच्या शरीरातील पेशींनी आज वैद्यकीय क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. तिच्या अमर पेशींचा आज कित्येक आजारांवर लशी, औषधे निर्माण करण्यात मदत होत आहे. हेनरिएटा लेक्स आज हयात नसल्या तरी विज्ञान आणि मानवतेसाठीच्या त्यांच्या नकळत परंतु अमूल्य योगदानासाठी त्याकायमच स्मरणात राहील.

rohit.patil@expressindia.com