scorecardresearch

Premium

‘अंध महिला क्रिकेट संघा’तली महाराष्ट्राची उगवती तारका…गंगा कदम

हलाखीच्या परिस्थितीत राहून नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण घेत असतानाच ‘ती’ला ‘अंध क्रिकेट’नं भुरळ घातली आणि शारीरिक अडचणींवर मात करून, विरोध पत्करून क्रिकेट खेळण्यासाठी ती सज्ज झाली. ती भारतीय अंध महिला क्रिकेट संघातली महाराष्ट्राची एकमेव खेळाडू गंगा कदम…

Maharashtra's rising star blind women's cricket team Ganga Kadam
‘अंध महिला क्रिकेट संघा’तली महाराष्ट्राची उगवती तारका…गंगा कदम

चारूशीला कुलकर्णी

 “मला भीतीच वाटते… मी खेळायला बाहेर गावी, बाहेर देशात जातेय हे घरी सांगायला. कारण मला घरच्यांची प्रतिक्रिया माहिती आहे! खेळ सोड आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित कर… शिकली आहेस तर नोकरी कर… तरच तुझ्या लहान भावडांना तू स्थिर आयुष्य देऊ शकशील. ‘खेळाचा नाद सोड’ हे पालकांकडून सातत्यानं बजावलं जातं.” ही बोलकी प्रतिक्रिया आहे भारतीय अंध महिला क्रिकेट संघातली महाराष्ट्राची एकमेव खेळाडू गंगा कदम हिची.

RSS Mohan Bhagwat
महिला आरक्षण : राष्ट्रीय स्वयंसवेक संघाकडूनही ‘पुरुषप्रधान’ शिक्का पुसण्याचा प्रयत्न
Bookie Sontu Jain
बुकी सोंटू जैन करतोय पोलिसांची दिशाभूल! ऑनलाईन क्रिकेट ‘गेमिंग अ‍ॅप’ प्रकरण
maharashtra anis demand to dismiss coach igor stimac
सातारा: कुंडली पाहून राष्ट्रीय फुटबॉल संघ निवड करणाऱ्या प्रशिक्षक स्टीमक यांना बडतर्फ करा, महाराष्ट्र अनिसची मागणी
team india asia cup
आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे भारताचे ध्येय!

गंगा मूळची हिंगोली जिल्ह्यातली फुटाणे गावातली. कौटुंबिक परिस्थिती बेताची. वडील शेतकरी. कुटुंबात आठ मुली आणि एक मुलगा. मुलींत गंगा पाचव्या क्रमांकाची. शासकीय परिभाषेत तिच्या जन्मजात अंधत्त्वाची पातळी बी-३ मध्ये मोडते- म्हणजे तिला काही प्रमाणात दृष्टी असली तरी ती अधू आहे. तिच्याहून मोठ्या बहिणी फारशा शिकल्या नाही. कमी वयातच त्यांची लग्नं झाली. गंगाचं व्यंग पाहता किमान तिनं शिक्षण पूर्ण करत स्वत:च्या पायावर उभं राहावं, ही तिच्या पालकांची अपेक्षा होती. ती शिकली, नोकरीला लागली, तर घरची आर्थिक स्थिती काही अंशी सुधारेल अशी त्यांची इच्छा. यामुळे घरातून खेळाचे संस्कार किंवा त्याला पाठिंबा तिला कधी मिळाला नाही. सोलापूर येथे अंध शाळेत शिकत असताना मुलांना किक्रेट खेळताना पाहून तिलाही हा खेळ खेळावासा वाटला. मैदानावर अम्पायरकडून खेळाडूंना ‘हियर’चा देण्यात येणारा आवाज, चेंडूत असलेले घुंगरू, त्या आवाजाच्या दिशेनं खेळाडूनं हवेत उंचवलेली बॅट, हे सारं तिला अनुभवायचं होतं. त्यातून क्रिकेटची आवड निर्माण झाली. या आवडीला तिचे क्रिडा शिक्षक शेळके सर यांनी खतपाणी घातलं.

गंगा सांगते, की ‘खेळात उतरले आणि माझा आत्मविश्वास वाढला.’ जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, विभागस्तरीय अशा विविध, दिव्यांगांसाठी असलेल्या स्पर्धांत तिनं उल्लेखनीय कामगिरी केली. शिक्षणासाठी बाहेर असल्यानं शिक्षण पूर्ण कर, स्वत:च्या पायावर उभी रहा, खेळबिळ खेळू नको, असं घरून सांगितलं जातं. माध्यमांमधून तिच्या कामगिरीविषयी काही बातम्या आल्या की तिसऱ्या व्यक्तीकडून तिच्या कुटुंबातल्या सदस्यांना त्याची माहिती मिळते आणि घरात एक ‘फायरिंग सेशन’ पार पडतं, असं गंगा सांगते. गंगा सांगते, “गावात सातवीपर्यंत शाळा आहे. पण तिथून पुढे शिकायचं, तर गावापासून पुढे पाच ते सात किलोमीटर असा वाहनानं प्रवास करावा लागतो. त्यासाठी दिवसाला एकाला ४० रुपये पडतात. हा खर्च परवडण्यासारखा नसला की शिक्षण थांबतं. माझं शिक्षण मी नोकरी करावी यासाठी सुरू आहे.”

महाराष्ट्रातून अंध महिला क्रिकेट संघात गेलेली ती एकमेव खेळाडू आहे. पहिलाच सामना एप्रिल-मे २०२३ स्पर्धेत नेपाळ येथे- अर्थात बाहेरील देशात जाणार होता. याची माहिती तिनं वडिलांना दिली. नेहमीप्रमाणे वडील रागवले आणि खेळण्यापेक्षा नोकरी मिळते का पहा, असं त्यांनी सुचवलं. गंगाचा खर्च क्रिकेट संघ करणार असला तरी प्रशिक्षण व अन्य खर्चाच्या मदतीसाठी तिच्या प्रशिक्षकांनी मदत मिळवली. नेपाळ, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया अशा वेगवेगळ्या संघांशी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून तिच्या संघानं विजय संपादित केला. तिच्या बरोबरीच्या अन्य महिला क्रिकेटपटूंचा त्या त्या राज्य सरकारांनी दखल घेत सत्कारही केला. काहींना आर्थिक मदत केली. मात्र महाराष्ट्र सरकारनं अद्याप गंगाच्या कामगिरीची दखल घेतलेली नाही, ही तिची शोकांतिका आहे.

गंगा ‘ऑल राऊंडर’ खेळाडू आहे. तिचे शिक्षक शेळके सर, क्रिकेटपटू जेमिमा रॉक्ड्रिग्ज, स्मृती मंदाना हे तिचे खेळातील आदर्श आहेत. तिनं घेतलेल्या उत्तुंग भरारीचं अप्रूप तिच्या नजरेत कुठेच दिसत नाही. तिला खंत आहे, की महिला खेळाडू उत्तम खेळू शकतात, परंतु केवळ कुटुंबाचं कारण किंवा शिक्षण, लग्न अशी कारणं पुढे करत त्या नंतर खेळ थांबवतात. ‘मला खेळायचं आहे आणि मी खेळणारच’ असं मुलींनी म्हटलं, तर त्यांना कुणीही थांबवू शकत नाही. सध्या गंगा ‘एम.ए.- पॉलिटिक्स’ शिकते आहे. कुटुंबाचा विरोध असला तरी गंगा तिच्या खेळण्यावर ठाम आहे. फक्त शिक्षण, खेळ सुरू असताना इतर सामान्य खेळाडूंप्रमाणे शासकीय नोकरी मिळावी अशी अपेक्षा तिला आहे. या विषयी मुख्यमंत्री, क्रिडा मंत्री यांच्या कार्यालयाशी पत्रव्यवहार करूनही अद्याप तिच्या पदरी निराशा आली आहे. मात्र तिच्यातली जिद्द, खेळतानाचा तिचा उत्साह आणि सततचा विरोध पत्करून खेळ सुरू ठेवण्यासाठी लागणारी चिकाटी तिच्यात आहे, हे तिच्या बोलण्यातून वारंवार प्रतीत होतं. आणि तेच सर्व तरुणींना आणि महिला खेळाडूंना प्रेरणादायी ठरेल असं आहे.

lokwomen.online@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra rising star in the blind women cricket team ganga kadam chatura article ysh

First published on: 20-09-2023 at 20:09 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×