जन्म पुण्यातला, शालेय शिक्षण पुण्यातच झालं. या कला-संस्कृतीच्या नगरीनं मला आपल्या कवेत घेतलं आणि माझ्यात नृत्याची आवड निर्माण केली. शाळेत शिक्षकांनी नेहमीच मला सांस्कृतिक कार्यक्रमात निवडलं. त्यावेळचे नृत्य शिक्षकच माझे मेन्टॉर, माझे मार्गदर्शक होते. त्यांच्यामुळेच शाळेत मला उत्तम नृत्यांगना म्हणून ओळख मिळाली.

आवड असूनही का कोण जाणे मला नृत्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेणं तेव्हा जमलं नाही खरं! माझ्यात नृत्याची जन्मजात आवड असली, नृत्याचं अंग असलं तरी भविष्यात याच क्षेत्रात करिअर करायचं असल्यास नृत्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेणं आवश्यक असतं, खास करून आजच्या काळात. असो, पण मी कुठल्याही प्रकारच्या शास्त्रीय नृत्याचं, अभिनयाचं प्रशिक्षण न घेता या क्षेत्रात करिअर करतेय याचा आनंद मोठा आहे. जे शक्य झालं नाही त्याची खंत बाळगत आयुष्य घालवण्यापेक्षा जे साध्य झालंय त्यात आनंद मानला पाहिजे हीच सकारात्मकता आहे.

Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
Virat Kohli's video goes viral
IPL 2024: गौतम गंभीरच्या गळाभेटीवर विराटने सोडले मौन; चाहत्यांना म्हणाला, ‘तुमचा मसाला संपला म्हणून तुम्ही…’, पाहा VIDEO
Goshta Asamanyanchi Dadasaheb Bhagat
गोष्ट असामान्यांची Video: इन्फोसिसमध्ये ऑफिस बाॅय ते दोन स्टार्टअप्सचा संस्थापक – दादासाहेब भगत
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”

अगदी लहानपणापासून माझ्यावर अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या नृत्याचं गारूड आहे. जसजसं मला सिनेमा हे माध्यम समजू लागलं तसतसं माझ्या लक्षात आलं, की कलाकारांना पडद्यावर ‘नाचवणारे’ असतात ते कोरिओग्राफर्स! बहुतेक हिंदी /मराठी चित्रपटांमधे दोनेक गाणी अशी असतातच त्यावर नायक- नायिका थिरकतात ते नृत्य दिग्दर्शकांच्या तालावरच.

मला चित्रपटात नायिका म्हणून स्थान मिळालं तेही एका डान्स रिआलिटी शोमुळेच. ‘सिनेस्टार की खोज’ या शोपासून. त्यात मला नृत्याचंदेखील कसब दाखवायचं होतं. हा शो मी जिंकले आणि मग एकामागोमाग एक सारे होतच गेले. ‘नच बलिये -७’ ‘महाराष्ट्राचा सुपर स्टार’, ‘डान्स इंडिया डान्स’, ‘झलक दिखला जा.’ या सगळ्या डान्सवर आधारित रिआलिटी शोंमुळे माझ्यावर विविध पद्धतीच्या नृत्याचे खूप संस्कार झालेत. रिआलिटी शोज विशेषतः डान्स शोजने माझ्यातील नृत्यांगना अगदी कायम अपडेट ठेवलीये. हे शोज् मला खूप ऊर्जा देतात. चार्ज करतात मला. माझ्यासाठी रिआलिटी शोजचं चार महिने हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ असतो.

दिवस- रात्र फक्त डान्सचा सराव आणि विविध प्रकारच्या नृत्यावर जवळपास रोज धडाकेबाज परफॉर्मन्स. अर्थात त्या काळात मानसिक ताण असतोच. आपला परफॉर्मन्स जर ‘अप टू द मार्क’ नसला तर आपण शोबाहेर जाऊ हा स्ट्रेस असतोच. हा ताण आपल्याला सगळ्याच शो, नाटक, चित्रपट, ओटीटीवरील कुठल्याही कार्यक्रमातून बाहेर फेकू शकतो. अटीतटीची प्रखर स्पर्धा आहेच. पण स्पर्धा, प्रेशर यातून मला रिआलिटी शोज करण्याचा नवा उत्साह, आंतरिक ऊर्जा मिळत आली. साल्सा, टँगो, हिप-हॉप, वेस्टर्न, हिप डान्स, इंडियन बॉलिवूड डान्स, कंटेम्पररी, जॅझ, फोक, शास्त्रीय आणि शिवाय लावणी असे सगळेच नृत्य प्रकार या रिआलटी शोजच्या मंचावर ‘विथ एक्सलन्स’ करवून घेतले जातात. त्यामुळेच रियालटी शोजचे जे सगळे ‘डान्स टीचर -डान्स मास्टर्स’ आहेत त्यांनाच मी माझा मेन्टॉर मानत आलेय. विविध नृत्य प्रकारात मला ट्रेनिंग दिलं ते या मंचावरच्या कोरिओग्राफर्सनी. म्हणून माझा कुणी एक मेन्टॉर नाही. अनेक आहेत, अहमद खान, गणेश आचार्य, आशीष पाटील. दीपाली विचारे, प्रतीक ‘एकापेक्षा एक’, ‘नच बलिये’, ‘झलक दिखला जा’ अशा अनेक डान्स शोमध्ये मला अनेक उत्तमोत्तम कोरिओग्राफर्स भेटलेत. रिआलिटी शोजसाठी दर दिवशी वेगळे डान्स केलेत, प्रत्येक डान्ससाठी विविध डान्स कोरिओग्राफर्स मला भेटलेत आणि त्या त्या नृत्यदिग्दर्शकांकडून मी शिकत गेले. नृत्यातील कसब माझे असले तरी डान्स स्टेप्स त्यांच्या होत्या. त्या ३-४ महिन्यांच्या कालावधीत मी खूप फोकस्ड असते. जे जे नवीन शिकायला मिळेल ते ते सारं काही शिकते. याचा मला इतका फायदा झाला की सगळे नृत्य प्रकार मी शिकत गेले आणि अवघडातल्या अवघड स्टेप्सही करत गेले.

मी कुणाकडूनही नृत्याचं विधिवत शिक्षण घेतलं नसलं तरी माझ्या वैयक्तिक आयुष्यानंच एक मंत्र मला शिकवलाय, की तुला नृत्य आवडत असेल तर जिथे शिकायला मिळेल तिथून तू टीप कागदासारखं टिपून घे. त्यामुळे मला प्रत्येक कोरिओग्राफरच्या खूप स्टाइल्स शिकायला मिळाल्या.

‘नटरंग’ चित्रपटातील ‘आता वाजले की बारा’ या लावणी नृत्यानं माझ्या नृत्य कौशल्यावर शिक्कामोर्तब केलं. ही लावणी दिग्दर्शित केली होती आशीष पाटील या युवा कोरिओग्राफरनं. या नृत्याला जगभर पसंतीची पावती मिळाली. म्हणून जेव्हा प्रसाद ओकनं मला ‘चंद्रमुखी’ चित्रपटाची ऑफर दिली त्या वेळी माझं प्राधान्य होतं आशीष पाटीललाच. नेमका तो दोन वर्षांचा कालावधी करोना- लॉकडाऊन यात गेला. पण आम्ही दोघांनी हार न मानता अनेक गाजलेल्या लावण्यांवर ऑनलाइन सराव केला. अशी अनेक गाणी आम्ही न थकता- न कंटाळता करत राहिलो. आणि अडीच वर्षांच्या या अथक परिश्रमानंतर जेव्हा ‘चंद्रमुखी’ प्रदर्शित झाला तेव्हा सगळ्यांचं कौतुक झालं. नृत्य-गाणी, अभिनय, दिग्दर्शन सगळ्यांचीच तारीफ झाली. ‘चंद्रमुखी’ चित्रपट हा चंद्रमुखी नर्तकीवर आधारित आहे. लहानपणी मी ज्यावर नृत्य करत असे. तीच शीर्षक भूमिका मी साकारली, हे म्हणजे माझं स्वप्न सत्यात उतरणंच आहे. जीवनातील एक वर्तुळ नृत्यानं पूर्ण केलं आहे. मी उत्तम नर्तक आहे. लावणी क्वीन आहे हे पुन्हा अधोरेखित झालं.

माझं नृत्यावर नितांत प्रेम आहे म्हणूनच नृत्यासाठी कुठल्याही प्रकारचे परिश्रम घेण्याची माझी शारीरिक आणि मानसिक तयारी असते. नृत्य खूप वेगात करायचं असतं. त्यामुळे पायात चप्पल किंवा सँडल्स घालून डान्स करणं फार कठीण, पण यंदाच्या ‘झलक दिखला जा’ मध्ये मला कोरिओग्राफर प्रतीकने हाय हिल्सचे सँडल्स घालून डान्स करण्याचे निश्चित केले आहे, हे सांगितल्यापासून माझा ताण वाढला आहे! पण ज्या डान्समध्ये चॅलेंज नाही त्यात मजा कसली?

अभिनय आणि नृत्य माझे श्वास आहेत. पण त्यासाठी मला घडवलं त्या तमाम नृत्य दिग्दर्शकांना, त्या माझ्या मेन्टॉरना माझ्या वाटचालीचं श्रेय जातं हे निर्विवाद!

शब्दांकन – पूजा सामंत
samant.pooja@gmail.com