लग्नाच्या दोन वर्षांनंतरही मूलबाळ होत नव्हतं. उपास-तापास करावे तर त्यावर विश्वास नाही. वैद्यकीय उपचार व्यवस्थित सुरू होते. सर्व अहवाल व्यवस्थित होते. परंतु तरीही गुड न्यूजची बातमी मिळेना. लग्नाच्या दुसऱ्याच वर्षांपासून सर्वांनी दडपण द्यायला सुरुवात केली. दहा-बारा वर्षांनंतरही मुल-बाळ नसलेल्या जोडप्यांची उदाहरणे देऊन लोकांनी ताण वाढवला. एकतरी मूल असावं, असं सगळेजण सांगत होते. पण आम्ही कोणत्या मानसिकतेतून जात होतो, याची कोणालाही कल्पना नव्हती.

असेच बरेच दिवस गेलेत. एकएकाच्या प्रश्नाला उत्तरे देताना कंटाळा येऊ लागला. या लोकांच्या प्रश्नापासून वाचण्याकरता तरी देवाने आता गोड बातमी द्यावी, असं वाटायला लागलं. लोकांचे प्रश्न टाळले तरी त्यांच्या संशयी नजरा पाहवत नव्हत्या. त्यामुळे आता कोणालाच भेटायचं नाही असं ठरवलं. आम्ही दोघेही समाजापासून अलिप्त राहू लागलो. सोशलायजिंग कमी केलं. मित्र-मैत्रिणींमध्ये रमणं कमी केलं. लोकांच्या प्रश्नांपासून स्वतःची सुटका केली अन् आमच्या आयुष्यात तो आनंदाचा क्षण आला. मी गरोदर असल्याचं डॉक्टरांनी निश्चित केल्यावर आमच्या आनंदाला पारावर उरला नाही.

Working Women
सासूने केलं म्हणून सुनांनीही करावं? नोकरदार सुनांची घुसमट समजेल का?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
behavior, offensive, past, someone behavior,
माणसं अशी का वागतात?
Working Women
Why Women Choosing to Stay Single : चूल आणि मूल सोडा, आता महिलांना लग्नच नकोसं झालंय, नव्या सर्वेक्षणातून २०३० ची सामाजिक स्थिती उघड!
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
article analysis about close relationships zws 70
तुम्हालाही आहे जवळीकतेचं वावडं ?
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
parents children self reliant chaturang article
सांदीत सापडलेले : काळजी

आनंदाची बातमी मिळाल्यानंतरही लोकांचे प्रश्न काही संपले नाहीत. “मुलगाच होऊ देत हं”, अशी मागणी व्हायला लागली. माणसं सर्वसुखी आणि समाधानी असूच शकत नाही का असा प्रश्न तेव्हा पडला. मूल होणं किंवा न होऊ देणं हा त्या जोडप्याचा खासगी विषय असतो. त्यातही मुलगी व्हावी की मुलगा व्हावा हे आपल्याही हातात नसतं. तरीही समाज या गोष्टींचं किती दडपण देत असतं. या काळात खरंतर गरोदर स्त्रीला मानसिक आणि शारीरिक आरामाची गरज असते. पण लोकांचे टप्पेटोमणे संपता संपत नाहीत. लोकांच्या या चर्चांकडे दुर्लक्ष करत राहिले. मुलगा असो वा मुलगी, जे काही होईल ते आमचं असेल, असं मी ठामपणे सांगत होते. त्यामुळे अनेकांची तोंडं गप्प होत होती.

अखेर माझी प्रसूती झाली. अगदी नॉर्मल प्रसूती झाली. आमच्या घरी लक्ष्मी जन्माला आली होती. या लक्ष्मीच्या स्वागतासाठी माझं संपूर्ण कुटुंब सज्ज झालं होतं. आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. पण तरीही कुटुंबाबाहेरील लोकांनी “मुलगी झाली का? आई-बाबा आनंदी आहेत ना?” असे कुत्सित प्रश्न विचारायला सुरुवात केली. या लोकांच्या प्रश्नांकडे किती दुर्लक्ष करायचा हा खूप मोठा प्रश्न माझ्यासमोर पडला. समाजाच्या अशा मानसिकतेमुळे संपूर्ण समाज कधीच सुखी आणि समाधानी राहू शकत नाही, हे माझं मत यामुळे अधिक स्पष्ट होत गेलं.

बारश्याला सर्वजण उत्साहाने आले. नाव काय ठेवलं यापेक्षाही मुलगी कशी दिसतेय हे पाहण्यासाठी सर्वांची धडपड सुरू होती. इवलीशी मुलगी ती, तिच्या रुपाविषयी हे लोक काय निष्कर्ष काढणार होते हे मला अजूनही कळलं नाही. “मुलगी जरा काळीच आहे ना… आम्हाला माहीत असतं तर बेसनपीठ आणलं असतं”, असं एकजण आगाऊपणे म्हणाली. माझ्या डोक्यात इतकी तिडीक गेली म्हणून सांगू… इतके दिवस जी माझी शांतता होती, ती अखेर भंग पावली. माझ्याच घरच्या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांना मीच ओरडून म्हणाले. “मला मुलगी झालीय. ती काळी आहे. आणि आम्हाला ती प्रिय आहे. काळी असो वा गोरी… एक जीव जन्माला आलाय. ती कशी जन्माला यावी हे आमच्या हातात नाही, पण तिचं भविष्य आमच्या हाती आहे. तिच्यावर संस्कार करण्याचं आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे तिचा रंग कसा आहे? तिला कोणतं व्यंग आहे? यामुळे आमचं तिच्यावरचं प्रेम कमी होत नाही. त्यामुळे तुमचे कलुषित विचार तुमच्याकडेच ठेवा. मुलगी गोरी वा काळी असल्याने तिचं कर्तृत्व ठरत नाही. तिच्या कर्माने तिचं कर्तृत्व ठरतं. ती उद्या या काळ्या रंगांनेच मोठी होईल, आणि एकदिवस तुम्ही तिला ओळखता हे अभिमानाने सांगू शकाल असं तिचं आम्ही भवितव्य घडवू.. हा माझा शब्द आहे.”

माझ्या या सर्व संभाषणाने सर्वजण अवाक् झाले होते. माझ्या शब्दापुढे कोणीही एक चकार शब्द काढला नाही. यातल्या अनेकांना तरीही माझं म्हणणं पटलं नसेलच. कारण, मुलगी नाकी-डोळी नीट अन् वर्णाने गहुवर्णीय असणं हेच तिच्या मुलगी असण्याचं निकष आहेत. कारण, गेली कित्येक वर्षे मीही हेच ऐकत आलेय!

-अनामिका