मैत्रेयी किशोर केळकर
नवीन वर्ष सुरू झालं की मुलांना जितकी पुस्तकांची ओढ असते तितकीच शिक्षकांनाही असते. यावर्षी नवीन शिक्षण प्रणाली अंतर्गत अभ्यासक्रमावर आधारित दुसरी, चौथी आणि सहावीची पुस्तके बदलली. नवीन धडे, कवितांचा अंतर्भाव केलेली ती देखणी पुस्तके चाळत असताना ‘आजोबांचा तीन पुडांचा डबा’ हा धडा समोर आला. उत्सुकता वाटली म्हणून लगेच वाचला. एक साधीशी कल्पना, तिचा धागा पकडून पर्यावरण रक्षणाचा उत्तम उपाय या कथेत सांगितला होता.

पर्यावरण रक्षणासाठी मोठे मोठे निबंध आणि भाषणं देण्यापेक्षा एखादी साधी कृती, एखादी गोष्ट ते काम प्रभावीपणे करून जाते. नेमकं तेच या धड्यात मांडलं होतं. असे माहितीपूर्ण धडे असतील आणि त्यातून अशी पर्यावरणाची जाण मिळत असेल तर नवीन पिढीवर हे संस्कार लहानपणापासून होतील.

माती विना शेती करताना, शाळेतील इको क्लबमध्ये भरपूर मुलं सहभागी झाली होती. काही आवड म्हणून आली होती, काही चक्क मजा करायला मिळेल, तास बुडवता येतील या उद्देशाने आली होती.

जून मधला तिसऱ्या गुरुवारी आम्ही सगळे एकत्र जमलो. नवीन वर्षात कोणते उपक्रम करायचे, कुठे फिरायला जायचं, कोणत्या संस्थांना, प्रदर्शनांना भेटी द्यायच्या तो सगळा वर्षभराचा कार्यक्रम ठरवून झाला. आता पुढचं काम होतं ते पावसाळी भाज्यांची लागवड करणं. त्यासाठी मातीच्या कुंड्या आणि टोपल्या तयार होत्या. मुलांनी भराभर पालापाचोळा गोळा करायला सुरुवात केली. गोळा झालेल्या पाचोळ्याचं वर्गीकरण करणं सुरू झालं आणि एक पाचवीचा मुलगा पिशवी घेऊन माझ्याकडे आला. पालापाचोळ्यातून वेगळं केलंल प्लास्टिक त्यात होतं. त्यात चहाचे कप, प्लास्टिक गोण्यांचे तुकडे, पिशव्या असा बराच ऐवज होता.

खरं तर झाडाखालचा पाचोळा आम्ही वेचला होता. तिथून एवढं प्लास्टिक जमा होणं अपेक्षित नव्हतं. तरीही हा कचरा शाळेच्या आवारात झाडाखाली जमा झाला होता. म्हणजे जे या शाळेच्या आवारात येतात ते निष्काळजी आणि बेजबाबदारपणे या कृती करतात.

आमचं काम सुरूच होतं एवढ्यात शाळेच्या सुतारकाम विभागातला एक माणूस जवळून गेला. अगदी सराईतपणे त्याने शाळेच्या खिडकीच्या गजांवर पानाची पिंक टाकली. मुलं हे सगळं बघत होती. एवढ्यात परीक्षेच्या पुरवण्यांच्या कागदाची बाडं घेऊन एक रीक्षा आवारात आली. गठ्ठे उतरवले गेले. आता रीक्षा मोकळी झाली. बाहेर ऊन होतं. रीक्षा चालवणाऱ्या गृहस्थांनी पिशवीतून प्लास्टिकची बाटली काढली. तो घटाघटा पाणी प्यायला आणि ती बाटली तिथेच टाकून तिचं बूच त्याने रिक्षेच्या चाकाखाली चिरडलं व तो पुढे निघाला.

माझ्याबरोबरची सगळी मुलं हे पाहत होती. छोटा इशान चटकन पुढे झाला. त्याने ती बाटली उचलली तोवर तेजने रिक्षा हात करून थांबवली. सगळ्या मुलांनी रिक्षाला घेरलं, तोवर खिडकीत पानाची पिंक टाकणाऱ्या काकांनाही मुलं घेऊन आली. युग पुढे झाला आणि नेमक्या शब्दांत त्याने त्या दोघांनाही आपली चूक दाखवून दिली.

शाळेत शिकवले जाणारे धडे, शहरी शेतीसारखे प्रयोग नकळतपणे मुलांना पर्यावरणाचे भान देत होते. मी दुरून हे पाहत होते. दोन वर्षं शहरी शेतीत रमलेली ही मुलं निसर्ग संवर्धन शिकली होती. संवर्धन आणि रक्षण या दोन्ही गोष्टी त्यांच्यात रूजल्या होत्या. नवीन पिढीत सकारात्मक बदल घडत होता. काहीवेळाने मुलं परतली तशी शांतपणे आम्ही आमच्या कामाला सुरुवात केली. खरं तरं या उपक्रमात मुलं झाडं लावायला शिकत होती. त्यासंबंधी माहिती घेत होती, पण त्याही पलीकडे जाऊन ती निसर्गाशी मैत्री करायला शिकली होती. परिसर स्वच्छतेचे धडे आपसूकच गिरवू लागली होती.

प्रत्यक्ष समोर घडणाऱ्या घटनेतून मला त्याचा प्रत्यय येत होता. शिक्षक म्हणून एक तरी चांगला संस्कार मी विद्यार्थ्यांमध्ये रूजवू शकले होते. या अतीव समाधानात माझा तो दिवस फार सुखाचा गेला.

mythreye.kjkelkar@gmail.com