“मम्मा, तू कुठे आहेस? लवकर ये.” पिंकी शाळेतून घरी आली तेव्हा घाबरली होती. तिनं घरात येताच दप्तर भिरकावून दिलं आणि ती घरभर आईला शोधत होती. सोनाली दिसल्यावर तिने तिला जाऊन घट्ट मिठी मारली. आज हिला काय झालंय ते सोनालीला समजेना. पिंकीचा श्वास जोरात चालू होता. तिने तिला जवळ घेतलं, पाणी प्यायला दिलं. तिचा आवेग ओसरल्यावर तिला विचारलं, “काय झालं बेटा, कोणी रागावलं का तुला? की कशाची भीती वाटली?”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : शांत झोप हवी आहे ? ताबडतोब बंद करा ‘या’ सवयी

“मम्मा, अगं ते कोर्टातील पप्पा आज शाळेत आले होते, ते मला दिसले आणि मला त्यांच्याजवळ बोलवत होते, तेव्हा मी पळत पळत स्कूल व्हॅनमध्ये जाऊन बसले. ते मला खाली उतरायला सांगत होते, आणि माझ्या आवडीचं चॉकलेटही देत होते, पण मी घेतलंच नाही. मम्मा, मी बरोबर केलं ना? मी त्यांच्याशी बोलले नाही. तू माझ्यावर रागावणार नाहीस ना? ते कोर्टातील पप्पा मला घेऊन जाणार नाहीत ना?”

आणखी वाचा : मैत्रिणी, तोरा, तुलना आणि असूया… नकोच!

पिंकीचं सर्व ऐकून सोनालीला भयंकर संताप आला. संजय पिंकीच्या शाळेत कशासाठी गेला होता? याचाच ती विचार करीत होती. कोर्टच्या आदेशानुसार ती महिन्यातून एकदा पिंकीला कोर्टामध्ये त्याला भेटवण्यासाठी घेऊन जात असते. पिंकी त्याला घाबरते, त्याच्याशी बोलत नाही, खेळत नाही, तिलाच येऊन चिकटते म्हणून आज तिला भेटण्यासाठी तो शाळेत गेला असावा असं तिला वाटलं. पिंकीला शांत करत ती तिला सांगू लागली, “पिंकी, कोर्टवाले पप्पा कोठेही दिसले तरी त्यांच्याशी बोलायचं नाही. त्यांनी दिलेला खाऊ घ्यायचा नाही, त्यांच्यासोबत कुठंही जायचे नाही. ते कधीही कुठं दिसले की मला येऊन सांगायचं. ते खूप दुष्ट आहेत, त्यांनी तुझ्या मम्माला खूप त्रास दिला आहे आणि आता तुलाही देतील.”

आणखी वाचा : मुलीच्या भविष्यासाठी अशी करा आर्थिक गुंतवणूक!

पिंकी आणि सोनालीचं काय बोलणं चालू आहे हे मालतीताई ऐकत होत्या. त्यांनी पिंकीसाठी जेवायचं ताट वाढलं आणि पिंकीला म्हणाल्या,“पिंकू बेटा आजीने तुझ्यासाठी वरण भात आणि छान गोडाचा शिरा केला आहे, तो वाट बघतोय, मी कधी एकदा पिंकीच्या पोटात जातोय, पटकन चल आणि हातपाय धुऊन, त्या डायनिंग टेबलवर बसून फस्त कर बघ सगळं.”

शिऱ्याचं नाव ऐकताच पिंकी पटकन स्वयंपाकघराकडे वळली. सोनालीचं पिंकीशी झालेलं बोलणं त्यांना अजिबातच आवडलं नाही. तिच्याशी बोलायचं त्यांनी ठरवलं.

“सोनाली, तू पिंकीला हे सगळं का शिकवत आहेस? भांडणं तुमच्या नवरा बायकोचं आहे, त्यामध्ये तिला का घेताय तुम्ही? कोणत्याही मुलाच्या मनात ‘आई’ आणि ‘वडील’ ही प्रतिमा वाईट करू नये.” आई, अगं, त्यानं पिंकीच्या कस्टडीचा दावा दाखल केलाय आणि आज तो तिच्या शाळेत गेला होता, त्यानं शाळेतून परस्पर तिला नेलं तर?” सोनालीने तिची भीती व्यक्त केली. “अगं, कोर्टाच्या आदेशानुसार तो पिंकीची फी भरण्यासाठी शाळेमध्ये गेला होता त्यानं मला तसं कळवलं होतं, तू पिंकीला असं वागायला शिकवल्यामुळं बाप वाईट असतो हेच तिच्या मनात राहील. हळूहळू पुरुष वाईट असतात असे तिला वाटायला लागेल, तिच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर त्याचा परिणाम होईल. तिच्यावर असेच संस्कार झाले तर ती त्याच नजरेतून जग पाहत राहील, तुझी मुलगी अशीच घाबरट राहिली, संकुचित विचारांची राहिली तर तुला चालेल का?”

आणखी वाचा : अपत्यं जन्माला घालावीत की नाही?

“नाही आई, माझी मुलगी आयुष्यात यशस्वी व्हावी, स्मार्ट व्हावी असं मला वाटतं. मलाही कळतंय मी पिंकीला असं शिकवायला नको, पण भीती वाटते गं. माझी पिंकी माझ्यापासून लांब गेली तर तो तिच्याशी खूप प्रेमानं वागला आणि पिंकीलाही त्याचा लळा लागला तर? तिच्या दूर जाण्याची कल्पनाही मी सहन करू शकत नाही.”
“केवळ स्वतःकडे मुलीचा ताबा राहावा म्हणून तू हे पिंकीला शिकवतेस? स्वतःच्या स्वार्थासाठी तू मुलीचा वापर करते आहेस. सोनाली, अगं मुलांना आई वडील दोघांचंही प्रेम, सहवास हवा असतो. कोणीही एकच मिळालं तर मुलं अपूर्ण राहतं. ती कोणाकडेही राहू देत, पण तिला दोघांचं प्रेम मिळू देत हा विचार तू का करत नाहीस? मुलं कोण्या एकाची संपत्ती नाही. आई वडील दोघेही मिळणं हा मुलांचा अधिकार आहे. तो तिच्याकडून हिरावून घेऊ नकोस. तुमच्या दोघांचा राग ओसरल्यावर कदाचित तुम्ही दोघेही पुन्हा एकत्र याल, तेव्हा ती तिच्या वडिलांशी कशी वागेल? आणि अगदी एकत्र आला नाहीत आणि घटस्फोट घ्यायचा ठरवलं तरी घटस्फोट तुमच्या दोघांचा होणार आहे पिंकीचा नाही. तिच्यासाठी आयुष्यभर तुम्ही दोघे आई वडीलच राहणार आहात हे लक्षात ठेव.”

“हो गं आई, मला हे सगळं कळतंय, पण वळत नाही. मला सर्व असुरक्षित वाटायला लागतं.” कळतंय ना तुला सगळं, मग आपलं मन वळवायला शिक. तुझ्या मनातील राग सोडून दे. एकदा तरी संजयशी मोकळेपणाने बोल. गैरसमज आणि अहंकार सोडून एकमेकांशी बोललात तर काहीतरी मार्ग निघेल. कायद्यानं मार्ग काढण्यापेक्षा तुमच्या मुलीच्या हिताचा मार्ग तुम्ही दोघांनीच शोधून काढा.” सोनालीला आईचं म्हणणं पटलं. संजयशी एकदा तरी बोलावं असं तिनं ठरवलं.
smitajoshi606@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marriage counselling children needs both parents mother and father vp
First published on: 28-01-2023 at 11:08 IST