पालकांचा विषय निघाल्यावर कट्ट्यावरच्या गप्पा रंगत जाणार हे उघड होतं. त्यातून गप्पांचा विषय ‘पत्रिका’ किंवा कुंडली या पालकांच्या विवाहपूर्व अटीकडे वळला. लग्न करण्याआधी, किंबहुना स्थळ सांगून येईल तेव्हा, पुढे जाण्यासाठी, पत्रिका जुळणं बहुतेक पालकांना किती अपरिहार्य वाटतं याबद्दल बहुतेकांच्या घरी सारखंच चित्र होतं. अगदी विश्वास बसणार नाही इतकं. हा विषय निघाला तेव्हा सगळ्यांना अर्चनाची आठवण झाली. अर्चना सम्याची, समीरची गर्लफ्रेंड होती आणि दोघे कॉलेजची सर्व वर्षं एकमेकांना ‘कमिटेड’ होते. अर्चना फार साधी, गुणी मुलगी होती. अभ्यासात खूप हुशार. सम्याच्या घरी जेव्हा मोठ्या भावाच्या लग्नाचा विषय निघाला तेव्हा तो आई, वडिलांना म्हणाला, “मला ते स्थळं दाखवून, बघून लग्न करायला नाही आवडणार. आई, बाबा. त्यापेक्षा मी लग्नच करणार नाही.” लगेच आई, बाबांनी, “बरं, बरं… तू तुझ्या पसंतीची मुलगी शोध. आमचं काहीच म्हणणं नाही, पण लग्न कर बाबा…”, अशी संमती दर्शवली होती. हे सगळं शेजारीच बसून ऐकणाऱ्या सम्याला त्यामुळे धीर आला होता. अर्चनाबरोबरची त्याची ‘कमिटमेंट’ त्याने अधिक दृढ करत नेली त्यानंतर…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : नातेसंबंध : नात्यातच होतंय लैंगिक शोषण?

मात्र प्रत्यक्षात जेव्हा त्याने अर्चनाविषयी त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी तिच्या बाकी कशाबद्दलही फारशी उत्सुकता न दाखवता, “बाकी ते सगळं ठीक आहे; पण पत्रिका जुळली तरच आम्ही पुढचा विचार करू.”, असं सांगूनच टाकलं.
सम्याला हे पूर्ण अनपेक्षित आणि त्यामुळे धक्कादायक होतं. त्या दिवसापासून घरात वाद सुरू झाले आणि त्याचे प्रतिबिंब त्याच्या आणि अर्चनाच्या नात्यावर पडायला लागलं. तिला टाळणं, कारणाशिवाय चिडचिड करणं, असं सगळं सुरू झालं. ग्रुप कट्ट्यावरही सम्या बोलेनासा झाला. अर्चनानं त्याला अनेकदा विचारलं, की काय बिघडलं आहे? पण तो काहीच सांगेना. शेवटी तिने सम्याचं हे विचित्र वागणं मुग्धाच्या कानावर घातलं. त्या दोघी अगदी बडी बडीज होत्या! मुग्धा सम्याशी बोलली तेव्हा तिला सर्व उलगडा झाला.

आणखी वाचा : किल द बिल’ची ओपोकू आहे तरी कोण ?

“समीर, तू आणि अर्चना प्रेमात पडलात तेव्हा पत्रिका हा विषय तरी होता का रे? आपल्या ग्रुपमधील कुणाचाच पत्रिकेवर विश्वास तरी आहे का? पत्रिका जुळवून केलेली आपल्या महितीमधली किती लग्नं मोडली तुला माहीतच आहे. पम्याच्या बहिणीने जमवलेले लग्न त्यांच्या आई, वडिलांना मान्य नव्हतं तेव्हा तिने तिची आणि तिच्या बॉयफ्रेंडची पत्रिका किती वेगवेगळ्या माणसांना दाखवली होती आणि प्रत्येकाने थोड्या, थोड्या फरकाने वेगवेगळंच काहीतरी सांगितलं होतं, आठवतं ना? आपण तेव्हा त्यावर किती विनोद करायचो. हसायचो. काही गुरुजींनी कसली कर्मकांडं, कसलीशी शांत असं काय काय करायला सांगितलं होतं… सर्वात हद्द म्हणजे एका गुरुजींनी तर मला एवढे पैसे द्या, मी तुमच्या पत्रिका जुळवून देतो असं म्हटलं होतं! आपण सगळे केवढे चिडलो होतो या सगळ्या बाजारावर तेव्हा…आणि आता तुझ्यावर वेळ आल्यावर तुझी ही काय वेगळीच चिडचिड चालली आहे? अर्चनाला कारण समजलं तुझ्या चिडचिड करण्याचं तर तिला काय वाटेल सम्या?”

आणखी वाचा : इन्सुलिनची शंभरी : रोमांचक शोधाची कहाणी

“हो, मला माहीत आहे ते. म्हणूनच माझं धाडस होत नाहीये तिला सांगण्याचं आणि मग मी तिला भेटणंच टाळतो.”
‘त्याने काय होणार आहे?”
“काहीच नाही. अर्चनाला टाळू शकतो. आई, बाबांना टाळताही येत नाही.”
“पण तू सांगितलं आहेस का त्यांना.”
खडा टाकून पहिला. पण सर्व सांगण्याचं धाडस आधी होईना. जेव्हा ते झालं तेव्हा ते म्हणाले, पत्रिका द्यायला तर सांग तिला… पुढचं आम्ही बघतो. आता अर्चना हे ऐकून तरी घेईल का?”
“ अर्थातच नाही! आणि तिने का तिच्या या बाबतीतल्या ठाम विचारांपासून स्वतःला मागे घ्यायचं?”
“ बरोबरच आहे…म्हणूनच तर मी हा विषय तिच्याजवळ काढण्याचं धाडसच करत नाहीये ना..”

आणखी वाचा : मधुमेह : लक्षणे, चाचण्या व उपचार

पण मुग्धाने खूप उचकल्यावर अखेर त्याने अर्चनाला हे पत्रिका प्रकरण सांगितलं.
“चार वर्षांच्या आपल्या कोर्टशिपनंतर आत्ता तू पत्रिकेचा विषय काढतो आहेस, समीर? पत्रिकेबद्दलचे माझे शास्त्रीय विचार माहीत आहेत ना तुला? आणि त्या बाबतीत मी किती ठाम आहे हेही माहीत आहे ना तुला? माझी पत्रिका बनवलेलीसुद्धा नाहीये.” अर्चना बरसलीच.
सम्याने काढता पाय घेतला. इकडे आड तिकडे विहीर. तरी त्याने धीर एकवटून आईला म्हटले,“तिची पत्रिका नाहीच आहे.”
“मग त्यात काय मोठं? जन्मदिवस, जन्मवेळ, जन्म ठिकाण एवढं मिळव. आपले गुरुजी बनवतील पत्रिका.” आईचं तडक उत्तर आलं.
सम्याने कपाळावर हात मारून घेतला. कुठल्या काळात वावरत आहेत. कसले हट्ट धरतात. नुसतं म्हणण्यापुरतं, की तुम्ही निवडा तुमचे जोडीदार. प्रत्यक्ष निवडल्यावर हे नाटक…

आणखी वाचा : सानिया मिर्झा घटस्फोट घेतेय ऐकलं.. मला का नाही जमलं?

आता अर्चनाची जन्मवेळ कोण सांगणार? त्याने हुशारी करण्याचा प्रयत्न केला. पण तीही हुशार होती. तिच्या लगेच लक्षात आलं.
“असली चापलुसी करण्यापेक्षा आपल्या निर्णयामागे ठामपणे उभा राहा, समीर.” ती त्वेषाने म्हणाली. मुग्धाने तिला सपोर्ट केले.
मुग्धा म्हणाली, “तुम्ही इतके अनुरूप आहात एकमेकांना… आम्हीही चार वर्षं बघतो आहोत तुमचं नातं.” अर्चनाच्या पत्रिकेतील गुणांपेक्षा तिचे स्वभावातील गुण बघ, समीर… ते पटवून दे की तुझ्या आई, बाबांना. पण समीरच्या आई, बाबांनी आपलाच आग्रह रेटून नेला आणि समीर काही आपल्या नात्यासाठी ठाम भूमिका घेऊ शकला नाही. शेवटी वाट बघून आणि निराश होऊन अर्चना पुढच्या शिक्षणासाठी परदेशी निघून गेली. सगळ्यांसाठी हा दुखरा विषय मागे ठेवून…
समीर नंतर कुणातही मन गुंतवू शकला नाही…
काय मिळवले समीरच्या आई-बाबांनी पत्रिकेसाठीचा हट्ट धरून?
(क्रमशः)
vankulk57@yahoo.co.in

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marriage counselling does horoscope kundali matters in marriage vp
First published on: 16-11-2022 at 08:41 IST