-डॉ. स्मिता प्रकाश जोशी “ केतन, निकिता अरे, येऊ का मी घरात?” “कोण? मावशी, अहो, याना आत या, परवानगी कसली मागता. तुमचंच घर आहे. ” “अगं, आज सुट्टीचा दिवस. तुमची घरातली कामं सुरु असणार, म्हणून यावं की नाही हा विचार करीत होते, पण आमंत्रण करायचं होतं म्हणून आले.” “मावशी, या हो. कामं काय चालूच असतात. केतन घरात नाहीये,पण कसलं आमंत्रण करायला आलात?” “ माझी सून संगीत विषारद झाली. तिचा कौतुक सोहळा मी आयोजित केला आहे, तुम्हा सर्वांना यायचं आहे.” केतन आणि सासूबाई ,पुष्पाताई घरात नाहीत हे केतकीला जरा बरंच वाटलं कारण तिला मोकळेपणाने मावशींशी बोलायचं होतं. “मावशी, बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर मीच तुमच्याकडे येणार होते. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. तुम्ही तुमच्या सुनेचं किती कौतुक करता? तिला प्रोत्साहन देता, पण माझ्या सासूबाई सतत माझा अपमान करतात. मला तर वैताग आलाय त्यांच्या वागण्याचा. त्यांच्यासारखी स्वछता ठेवणं, त्यांच्यासारखा स्वयंपाक करणं, मला नाही जमत, पण म्हणून माझा सतत अपमान करायचा का? घरात झाडू, पोछा स्वच्छता करण्यासाठी त्या बाई लावत नाही, मी केलेली कामं त्यांना आवडत नाही. त्या पुन्हा पुन्हा घर झाडून घेणं, भांडी घासत बसणं यातच व्यग्र असतात. दर रविवारी घरातील भिंती सुद्धा धुवून काढतात आणि केतनची अपेक्षा असते की, मी त्यांना मदत करावी. मला त्यांचं वागणं अन्याय्य वाटतं, मी नोकरी करून दर रोज वा दर आठवड्याला या सर्व गोष्टी करू शकणार आहे का? तुम्हीच सांगा, त्यांचं हे वागणं योग्य आहे का?” केतकी मावशींना गाऱ्हाणी सांगत होती. पुष्पाताईंची अतिस्वच्छता केतकीला त्रासदायक ठरत होती. इतके दिवस ती चिडचिड करत होती, पण आता तिला त्यांचा राग येऊ लागला आहे. लग्नाआधी ती त्यांच्या घरी आली तेव्हा अतिशय स्वच्छ आणि टापटीप घर बघून तिला खूपच आनंद झाला होता. स्वच्छताप्रिय सासूबाई तिला नक्कीच आवडल्या होत्या, त्यांच्याबद्दल तिला खूप आदर होता. त्यांच्याकडून खूप काही शिकता येईल असं तिला वाटतं होतं, पण लग्न झाल्यानंतर जेव्हा एकत्र राहण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्या स्वच्छतेबाबतच्या विक्षिप्त संकल्पना तिला समजल्या. स्वयंपाक करताना त्या किमान २५ वेळा तरी हात धुवायच्या. दिवसातून तीन वेळा आंघोळ करायच्या. स्वयंपाकाच्या ओटयावर थोडंसं काहीतरी सांडलं तरी पूर्ण ओटा धुवून काढायच्या. तिला हे सगळं विचित्रच वाटत होतं. आईला पूर्वीपासून स्वच्छतेची आवड आहे असं केतनचं म्हणणं होतं, त्यामुळं आईची याबाबतची कोणतीही तक्रार तो ऐकून घेण्यास तयार नव्हता. या गोष्टीवरून केतन आणि केतकी यांचे सतत वाद होऊ लागले होते. कमला मावशी म्हणजे पुष्पाताईंची मावसबहीण. त्या सरकारी नोकरीत होत्या आणि सामाजिक कार्यातही कार्यरत होत्या, त्या या समस्येवर नक्कीच काहीतरी मार्ग काढतील याची केतकीला खात्री होती, म्हणूनच ती सविस्तरपणे सर्व मावशींना सांगत होती. “मावशी, मी आता केतनच्या आईसोबत राहू शकणार नाही आणि केतन आईला सोडून राहणार नाही त्यामुळे कदाचित आम्ही दोघेच एकमेकांपासून विभक्त होऊ.” हे शब्द ऐकल्यावर मात्र कमला मावशी थोड्या गंभीर झाल्या आणि म्हणाल्या,“ केतकी,अगं थेट या निर्णयाला येऊ नकोस. कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी असेल तर तिच्या आजारपणाला कंटाळून असं विभक्त होण्याचा विचार करणं योग्य आहे का? पुष्पाताईला केवळ स्वच्छतेची आवड नाही, तर तिला स्वच्छतेचा आजार आहे. ती ‘ओसीडी’ची (Obsessive Complusive Disorder) रुग्ण आहे,पण ती कोणतेही औषध-उपचार करून घेत नाही. तिचा आजार आता वाढत चालला आहे, तिला उपचारासाठी तयार करण्याची जबाबदारी आपली आहे. मागे केतनने प्रयत्न केला होता,पण त्याला ते शक्य झालं नाही. याचं मूळ तिच्या भूतकाळात आहे. तिचं लग्न झाल्यानंतर तिला खूपच सहन करावं लागलं. तिच्या सासूबाई अतिशय मागासलेल्या विचारांच्या होत्या, त्यामुळं ती मानसिक दबावाखाली राहिलेली आहे. केतनच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर ती अतिशय खचून गेली आणि तिच्यावरचे मानसिक दडपण वाढत गेलं. तिचा ओसीडी हा एक मानसिक आजार आहे आणि तिच्या मानसिक अवस्थेमुळे तो वाढत चालला आहे. सासू सासरे असताना तिचं घरात कधीच काही चाललं नाही, त्यामुळं तुमचं लग्न झाल्यानंतर हक्क गाजवायला सून मिळाली म्हणून ती कधी कधी तुझ्यावर चिडत असेल, तुला टाकून बोलतही असेल. कारण तसं प्रेम तिला मिळालंच नाही. त्यामुळे एका वेगळ्या दृष्टीने तिच्याकडे बघितलंस, तर तुला तिचा राग येणार नाही. एक स्त्री म्हणून तूच तिला समजून घेऊ शकतेस आणि तिला उपचारासाठी तयार करू शकतेस. त्याच्यावर तिला ताबा मिळवता आला तर तिच्या स्वभावातही बदल होईल. चिडचिड कमी करेल. केतनलाही तुझ्या सोबतीची आणि सहकार्याची गरज आहे. कुटुंबामध्ये असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर, काहीतरी मार्ग निश्चित निघतो. बघ, मी सांगते आहे त्याचा विचार कर.” पुष्पाताईंच्या पूर्व आयुष्याबद्दल कमला मावशींनी बऱ्याच गोष्टी केतकीला सांगितल्या. “पण केतनने हे विश्वासात घेऊन मला सांगायला काय हरकत होती मावशी?” “कदाचित, तू समजून घेशील की नाही याची त्याला शंका आली असावी. पण आता मी सांगितलय ना. तू स्वत: त्याच्याशी बोल. त्याला विश्वास दे.” कमला मावशीचं बोलणं ऐकल्यानंतर,केतकी विचारमग्न झाली. आपण उगाचच सासूबाईंवर रागवत होतो, चिडचिड करीत होतो, असं तिला वाटून गेलं. त्यांना समजून घ्यायला हवं. आयुष्यात त्या अनेक दुःखद प्रसंगांना सामोऱ्या गेल्या आहेत, प्रेम,कौतुक यांपासून त्या वंचित राहिल्या आहेत, स्वतःचं मन रमवण्यासाठी, कोणाकडून तरी कौतुक ऐकण्यासाठी त्या घर सतत टापटिप ठेवत असाव्यात. आता त्यांच्या उरलेल्या आयुष्यात आपणच आनंदाचे रंग भरायला हवेत, या विचारांनी तिलाच उत्साही वाटलं. ती मावशींना म्हणाली, “ धन्यवाद मावशी,मला आज तुम्ही सासूबाईंकडे बघण्याची नवीन दृष्टी दिलीत. आज तुमची भेट झाली नसती,तर कदाचित मी आयुष्यभरासाठी दुखी झाले असते.” कमला मावशी आणि केतकीच्या गप्पांना आता एक वेगळंच वळण मिळालं… (लेखिका कुटुंब न्यायालयात समुपदेशक आहेत.)(smitajoshi606@gmail.com)