दिप्ती शिंदे-दळवी
स्त्रीच्या शरीरात आणि परिणामी मनात होणाऱ्या या सर्व बदलांमुळे आई म्हणून तिचं लक्ष नैसर्गिकरीत्या आपल्या बाळाच्या सुरक्षिततेकडे, पोषणाकडे, संगोपनाकडे आणि सर्वांगीण विकासाकडे एकवटलं जातं.

जून २०२६ मध्ये समाजमाध्यमांवर दोन छायाचित्रांनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. तमिळ वेट्री कळगम (TVK) पक्षाच्या वतीने नव्याने निवडून आलेल्या तमिळनाडू विधानसभेच्या आमदार एमआर पल्लवी या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेच्या सभागृहातून बाहेर पडताना आपल्या तान्ह्या मुलाला कडेवर घेऊन जाताना दिसल्या. आणि तिकडे स्वीडनमध्ये रोमिना पौरमोख्तारी पालक रजेच्या (Parental Leave) लाभांवर प्रकाश टाकण्यासाठी आपल्या मुलाला युरोपियन युनियन (EU) परिषदेच्या बैठकीत हजर राहिल्या. यावेळी रोमिना यांनी एक सुंदर आणि स्पष्ट विधान केलं. त्या म्हणाल्या, “आई होणं म्हणजे एखाद्या महिलेच्या कारकिर्दीचा शेवट असू नये.”

ही छायाचित्रं पहिली, संदर्भ ऐकले आणि संत जनाबाई यांनी लिहिलेल्या एका अभंगातील खाली लिहिलेल्या ओळी आठवल्या! –

पक्षी जाय दिगंतरां ।

बाळकांसी आणी चारा ॥१॥

घार हिंडते आकाशीं ।

झांप घाली पिल्लापासीं ॥२॥

माता गुंतली कामासी ।

चित्त तिचें बाळापाशीं ॥३॥

वामर हिंडे झाडावरी ।

पिलीं बांधुनी उदरीं ॥४॥

खरंच, संत जनाबाईंनी किती समर्पक शब्दांत एका कार्यतत्पर आणि कर्तव्यदक्ष आईच्या स्वभावाचं वर्णन केलं आहे! मग ती आई मनुष्य देहातील असो किंवा पशू अथवा पक्षीदेहातील असो… कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडताना आणि बाहेर कार्यरत असतानाही एका आईला क्षणोक्षणी तिचं बाळच आठवत असतं. तिने आकाशाला कितीही गवसणी घातली तरीही तिचं चित्त हे तिच्या पिलापाशीच असतं, हे कालातीत सत्य आहे.

जिजाबाईंनी शिवबाचं संगोपन करता करता, त्याला घडवता घडवता त्याच्या माध्यमातून अवघ्या मराठी मुलुखाला परकियांच्या सत्तेतून मुक्त करण्यासाठी स्वराज्य उभं केलं; शिवकाळात दुग्धव्यवसाय करताना एका संध्याकाळी गडाच्या बुरुजाचे दरवाजे बंद झाले तेव्हा परतीचे सर्व पर्याय संपुष्टात आले आहेत, हे जाणवताच आपल्या तान्ह्या बाळाच्या तीव्र आठवणीने व्याकुळ झालेली हिरकणी संपूर्ण बुरुज बुरुजापेक्षाही अभेद्य शौर्य आणि धैर्य दाखवून रात्रीच उतरली आणि आपल्या पिलापाशी पोहोचली; १८५७ साली इंग्रजांसोबत लढताना झाशीच्या राणीने आपल्या बाळाला पाठीवर बांधून ठेवले होते आणि आपल्या तलवारीने अवघा शत्रू भंडावून सोडला होता. अशी एक ना दोन किती उदाहरणं आपल्यासमोर आहेत! त्यामुळे मातृत्वप्राप्तीनंतरदेखील बाळाचं संगोपन करता करता आपल्या इतर कर्तव्य आणि जबाबदाऱ्या, मग त्या कोणत्याही स्वरूपातील असोत, त्या पार पाडणं, हे स्त्रीवर्गाला नवीन नाही; हे अनेकवेळा अधोरेखित करता येईल.

पण हे स्त्रीवर्गाला जमतं कसं? मुळात आपल्या शरीरात एक नवीन जीव निर्माण करणं व नऊ महिने पोटात त्याचं पोषण करून त्याला या जगात आणणं, हेच एक अद्वितीय सृजनकार्य आहे. प्रसूतीमुळे स्त्रीच्या शरीराची बरीच झीज झालेली असते; संप्रेरकदृष्ट्या शरीरात अनेक बदल झालेले असतात आणि गर्भधारणा झाल्यापासून ते अगदी प्रसूती होईपर्यंत आणि नंतरच्या काळातही एक आई म्हणून प्रत्येक स्त्रीमध्ये वैचारिक, भावनिक, तात्विक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेकविध बदल सतत होत असतात. गर्भधारणा आणि प्रसूती म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्म, असं जे म्हणतात ते खरं तर या अर्थानेच असावं. एखाद्या सर्पाने कात टाकावी आणि नवीन अस्तित्व धारण करावं तशी स्त्री गर्भधारणा झाल्यावर आणि प्रसूतीनंतर कात टाकते आणि एक आई म्हणून नव्याने जन्म घेते.

स्त्रीच्या शरीरात आणि परिणामी मनात होणाऱ्या या सर्व बदलांमुळे आई म्हणून तिचं लक्ष नैसर्गिकरीत्या आपल्या बाळाच्या सुरक्षिततेकडे, पोषणाकडे, संगोपनाकडे आणि सर्वांगीण विकासाकडे एकवटलं जातं. आधुनिक न्यूरोसायन्सच्या भाषेत याला मॅटर्नल ब्रेन प्लास्टिसिटी (Maternal Brain Plasticity) असं म्हणतात. यामुळे, बाळाच्या रडण्याचा आवाज, चेहऱ्यावरील हावभाव ह्यांद्वारे बाळाच्या गरजा ओळखण्याची क्षमता स्त्रीमध्ये आपोआप निर्माण होते व दिवसागणिक तीव्र होते.

या संपूर्ण प्रक्रियेत ऑक्सिटोसिन (Oxytocin) या संप्रेरकाची भूमिका फार विलक्षण असते, ज्या संप्रेरकाला अनेकदा ‘बंध निर्माण करणारे संप्रेरक’ (Bonding Hormone) असंही म्हटलं जातं. प्रसूतीवेळी, स्तनपान करताना आणि आई व बाळाच्या प्रत्येक स्पर्शाच्या क्षणांदरम्यान ऑक्सिटोसिनचं प्रमाण वाढतं. त्यामुळे आईमध्ये प्रेम, सहानुभूती, विश्वास आणि संरक्षणाची भावना फुलते आणि बहरते व तीच सुरक्षिततेची भावना बाळातसुद्धा निर्माण होते. आईच्या स्पर्शाने बाळ सुखावतं आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद उमटतो. यामुळे अर्थातच आईही मनोमन सुखावते. आपल्या स्पर्शाने बाळ सुखावत आहे; त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटत आहे, हे पाहून आईच्या मेंदूतील डोपामिन (Dopamine) हे संप्रेरक स्रवतं. त्यामुळे बाळाची काळजी घेणं, त्याचा सांभाळ करणं हे आईसाठी मानसिकदृष्ट्या फार समाधानकारक आणि अर्थपूर्ण असतं. त्यामुळे, ह्या सर्व विवेचनावरून हे स्पष्ट आहे की आईने तान्ह्या बाळासोबत जास्तीत जास्त वेळ उपस्थित असणं हे बाळ आणि आई दोघांच्याही दृष्टीने महत्त्वाचं आहे.

पण खरी गंमत इथेच आहे! स्त्रीवर्गाला लहानपणापासूनच अभ्यासासोबतच घर आणि इतर कामांमध्ये गुंतवल्यामुळे व अभ्यासेतर कामांमध्ये प्रशिक्षण घरातूनच दिलं जात असल्याने स्त्रिया ह्या मुळातच कामांचे प्राधान्यक्रम (Priorities) ठरवून वैचारिक फेरनियोजन (Cognitive Restructuring) व्यवस्थित करू शकतात आणि एकापाठोपाठ एक अशी अनेक कामं लीलया करू शकतात. अर्थात ही क्षमता अनेक पुरुषांमध्येही असते. पण स्त्रियांमध्ये ही क्षमता अधिक असते, हे आपल्यापैकी कोणीही मान्य करेल. पण असं असलं तरीही याचा अर्थ असा होत नाही की प्रसूतीनंतर तिच्यातील ह्या अद्वितीय क्षमतेची आजूबाजूच्या समाजाने परीक्षा घ्यावी.

उपरोल्लेखित याच सर्व बाबींमुळे अनेक देशांमध्ये स्त्रियांसाठी मातृत्व रजा (Maternity Leave) सुरू करण्यात आली. आणि बदलत्या काळानुसार अनेक पुरुषही बालसंगोपनाच्या सृजनकार्यात हिरीरीने भाग घेताना सध्या आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे आजच्या काळात अनेक स्त्रियांना आधीच्या काळातील स्त्रियांच्या तुलनेने मातृत्वप्राप्तीनंतर आपलं करिअर कायमस्वरूपी न थांबवता ते टिकवून ठेवणं सोपं आहे. रोमिना पौरमोख्तारी यांनीही त्यांच्या वक्तव्यात एक गोष्ट नमूद केली की त्यांच्या नवऱ्यानेही पालकत्व रजा (Parental Leave) घेऊन रोमिनाना बालसंगोपनात विलक्षण सहकार्य केलं.

थोडक्यात काय, संबंधित मुद्द्याबाबतीत बदलाचे वारे वाहू लागले आहेत आणि काही वर्षांपासून ते अधिक वेगाने वाहू लागले आहेत, अर्थात सकारात्मकरित्या! बालसंगोपन ही केवळ आईची जबाबदारी नसून ती घरातील प्रत्येकाची आणि विशेषकरून बाळाच्या बाबाचीही असते, हे वारंवार बोललं जात आहे आणि सुदैवाने तसं सध्या प्रत्यक्षात दिसूही लागलं आहे. समाजाने हे समजून घ्यायला हवं की एखाद्या स्त्रीची अनेक जबाबदाऱ्या सांभाळण्याची क्षमता ही केवळ आणि केवळ तिच्या इच्छाशक्तीचा परिणाम नसून तिच्या मेंदूतील पुनर्रचना, संप्रेरकं, तिचं बाळाशी आणि इतरांशी असलेलं भावनिक नातं, अनुभव आणि सामाजिक आधार यांच्या एकत्रित परिणामातून दृढ होत असते. त्यामुळे जर आपण स्त्रियांना, विशेषकरून मातृत्वप्राप्तीनंतर करिअरची दुसरी इनिंग खेळू पाहणाऱ्या स्त्रियांना योग्य ते सहकार्य केलं, त्यांना प्रोत्साहन दिलं तर त्याही आपापल्या कार्यक्षेत्रात उत्तम कामगिरी करू शकतात आणि परिणामी राष्ट्रीय प्रगतीत मोलाची भूमिका बजावू शकतात.

लेखाच्या समारोपाक्षणी इतकंच म्हणेन की आपली सर्वांची साथ असेल तर घार आकाशात हिंडताना ती अगदीच निश्चिंत नाही पण किमान थोडी कमी हुरहूर मनात घेऊन हिंडू शकेल, आकाशाला गवसणी घालू शकेल आणि रात्री आपल्या पिल्लाला तिच्या दिवसभराच्या कर्तृत्वाच्या रम्य कथा सांगू शकेल जेणेकरून ते बाळही उद्या एक समर्थ पालक बनेल.