अनुजा कर्णिक मोहिले

मागील लेखात आपण पाहिले की निरोगी बालकाचा प्रवास पहिल्या हृदयस्पंदनापूर्वीच सुरू होतो. मात्र, ही कथा गर्भधारणेने सुरू होऊन बाळाच्या जन्माने संपत नाही. ती बालपण, किशोरावस्था आणि प्रौढत्वापर्यंत पुढे जाते आणि कदाचित पुढच्या पिढीपर्यंतही!

आईचे आरोग्य आणि मुलाचे आरोग्य यांच्यातील नाते आपण अनेकदा गर्भावस्था आणि प्रसूतीपुरते मर्यादित मानतो. प्रत्यक्षात आरोग्य हा एखाद्या विशिष्ट वयात अचानक तयार होणारा परिणाम नसून, आयुष्यभर साठत जाणाऱ्या जैविक, पोषणविषयक, मानसिक, सामाजिक आणि पर्यावरणीय अनुभवांचा परिणाम असतो. जागतिक आरोग्य संघटना यालाच ‘Life-course approach’ अर्थात जीवनक्रमाधारित दृष्टिकोन म्हणते. या दृष्टीकोनानुसार आरोग्याची वाटचाल जन्मापूर्वीच सुरू होते आणि पुढील जीवनातील विविध टप्प्यांवर आकार घेत राहते.

गर्भावस्थेतील आईचे आरोग्य हा या प्रवासातील पहिला महत्त्वाचा टप्पा आहे. गर्भाची वाढ, जन्माचे वजन आणि गर्भधारणेचा कालावधी यावर मातृआरोग्याचा प्रभाव पडतो. मात्र बाळ जन्माला आल्यानंतरही आईची भूमिका संपत नाही; उलट, तिचे आणि कुटुंबाचे आरोग्य बाळाच्या पुढील विकासासाठी महत्त्वाचे ठरते.

जन्मानंतरचे पहिले १,००० दिवस हा याच साखळीतील अत्यंत संवेदनशील काळ आहे. या काळात मेंदू, शरीर आणि रोगप्रतिकारक यंत्रणेचा वेगाने विकास होतो. पोषणासोबतच सुरक्षित वातावरण, प्रेमळ आणि प्रतिसाद देणारी काळजी, खेळ, संवाद आणि शिकण्याच्या संधी यांचा विकासावर परिणाम होतो. WHO च्या Nurturing Care Framework मध्ये पोषण, आरोग्य, सुरक्षितता, प्रतिसादात्मक संगोपन आणि सुरुवातीचे शिक्षण या घटकांना एकत्रितपणे पाहिले आहे.

इथे एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आईचे मानसिक आरोग्य. प्रसूतीनंतरची उदासीनता किंवा इतर मानसिक आरोग्याच्या समस्या केवळ आईपुरत्या मर्यादित राहत नाहीत. आईला स्वतःची काळजी घेणे, बाळाच्या गरजांना प्रतिसाद देणे किंवा भावनिक संवाद साधणे कठीण होऊ शकते आणि त्याचा बालकाच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच मातृ मानसिक आरोग्याची काळजी ही बालविकासाच्या सेवांचा अविभाज्य भाग असायला हवी, अशी WHO ची भूमिका आहे.

पण पहिले १,००० दिवस संपले म्हणजे आरोग्याची महत्त्वाची खिडकी बंद होत नाही. बालपणात घरातील आहारपद्धती, शारीरिक हालचाल, झोप, स्क्रीनसमोरील वेळ, शाळेचे वातावरण आणि अति-प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचा वाढता संपर्क यांचा प्रभाव पडतो. कुपोषणाचा अर्थ आता केवळ कमी वजन किंवा खुंटलेली वाढ एवढाच राहिलेला नाही; अल्पपोषण, सूक्ष्मपोषकांची कमतरता आणि अतिरिक्त वजन-स्थूलता हे सर्व त्याच व्यापक चित्राचा भाग आहेत. भारतातही या तिन्ही प्रकारच्या कुपोषणाकडे एकत्रितपणे पाहण्याची गरज वाढत आहे.

यानंतर येते किशोरावस्था-आरोग्याच्या जीवनक्रमातील दुसरी महत्त्वाची संधी. शरीराची झपाट्याने होणारी वाढ, हार्मोनल बदल, पौगंडावस्था, मासिक पाळीची सुरुवात, शरीराविषयीची प्रतिमा, झोप, आहार, शारीरिक हालचाल आणि मानसिक आरोग्य या सगळ्यांचा या काळात संगम होतो. बालपणातील काही पोषणविषयक किंवा जीवनशैलीशी संबंधित अडचणी येथे प्रकर्षाने दिसू शकतात; पण त्याच वेळी योग्य हस्तक्षेप करून आरोग्याचा मार्ग बदलण्याची संधीही असते. UNICEF च्या अलीकडील जीवनक्रमाधारित पोषण दृष्टीकोनात किशोरावस्थेलाही महत्त्वाची ‘second window of opportunity’ मानले आहे.

किशोरवयीन मुलगी पुढे प्रौढ होते. तिचे पोषण, शरीराचे वजन, मानसिक आरोग्य, जीवनशैली आणि प्रजननविषयक निर्णय पुढील टप्प्यात महत्त्वाचे ठरतात. आणि इथेच हा जीवनक्रम पुन्हा सुरुवातीच्या बिंदूशी जोडला जातो.

आजची मुलगी → उद्याची स्त्री → उद्याची आई → पुढची पिढी.

म्हणूनच मातृआरोग्याचा विचार केवळ गर्भधारणा आणि प्रसूतीपुरता करणे अपुरे आहे. भारताच्या RMNCAH+N धोरणातही प्रजनन, मातृ, नवजात, बाल आणि किशोर आरोग्याला एका ‘continuum of care’ (एखाद्या व्यक्तीला किंवा रुग्णाला त्याच्या आजारपणात, उपचारात किंवा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात न थकता, सातत्याने आणि एकापाठोपाठ मिळणारी आरोग्य सेवा) आणि lifecycle approach (जीवनचक्र दृष्टिकोन) मध्ये जोडण्याचा प्रयत्न केला आहे.

या साखळीत प्रत्येक टप्प्यावर हस्तक्षेपाची संधी आहे. आईला निरोगी ठेवणे, बाळाला योग्य सुरुवात देणे, बालपणातील पोषण व संगोपन सुधारणे, किशोरांना सक्षम करणे आणि पुढील प्रौढ पिढीला आरोग्यदायी निवडींसाठी तयार करणेहे वेगवेगळे कार्यक्रम नसून एका अखंड आरोग्यप्रवासाचे टप्पे आहेत.

आणि म्हणूनच, आईचे आरोग्य ही केवळ एका स्त्रीची बाब नाही; ते पुढच्या पिढीच्या आरोग्याचा पाया आहे. एका पिढीत केलेली आरोग्याची गुंतवणूक पुढच्या पिढीत परिणाम दाखवते. गर्भापासून प्रौढत्वापर्यंतची ही साखळी समजून घेतली, तर मातृआरोग्याकडे पाहण्याची आपली दृष्टीही ‘गर्भधारणेपासून’ पुढे जाऊन ‘पिढ्यान्पिढ्यांच्या आरोग्या’कडे वळेल.
(महिला व बालपोषण तज्ज्ञ)
aahaartadnya1605@gmail.com