पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ७१ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या नव्या मंत्रिमंडळात सात महिलांचाही समावेश आहे. यापैकी दोघी केंद्रीय मंत्री असून पाच महिला खासदार या राज्यमंत्री आहेत. परंतु, मागच्या मंत्रिमंडळाच्या तुलनेत यंदा महिला मंत्र्यांचीही संख्या कमी झाली आहे.

यंदाची निवडणूक महिला केंद्रीत होती. निवडणूक आयोगाने अनेक मतदान केंद्रेही महिला केंद्रीत केले होते. तसंच, यंदा नोंदणीकृत महिला मतदारांची संख्याही पुरुषांच्या तुलनेत अधिक होती. तर, सर्वाधिक महिला मतदारांनी मतदान केलं. परंतु, दुसरीकडे यंदा फक्त १० टक्केच महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यापैकी फक्त ३० महिला खासदार म्हणजे जवळपास ५ टक्केच महिला खासदार निवडून आल्या आहेत. त्यापैकी फक्त सात महिलांना मंत्रीपद दिलं असून केंद्रीय मंत्रिमंडळात फक्त २ महिला खासदार आहेत. तर, उर्वरित पाच खासदारांना राज्यमंत्रीपद दिलं आहे. या सातही महिला खासदारांनी काल (९ जून) राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी कार्यक्रमात मंत्रीपदाची शपथ घेतली.

निर्मला सीतारमण आणि अन्नपूर्णा देवी यांना केंद्रीय मंत्रीपद

राज्यसभेच्या खासदार सीतारामन यांनी यापूर्वी अर्थ आणि संरक्षण यांसारखी मोठी खाती सांभाळली आहेत, तर कोडरमाच्या दोन वेळा खासदार राहिलेल्या अन्नपूर्णा देवी यांना राज्यमंत्री पदावरून कॅबिनेट मंत्री पदावर बढती देण्यात आली आहे. त्या आधीच्या सरकारमध्ये कनिष्ठ शिक्षण मंत्री होत्या. अनुप्रिया पटेल, रक्षा खडसे, सावित्री ठाकूर, शोभा करंदलाजे आणि निमुबेन बांभनिया यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

अनुप्रिया पटेल

अनुप्रिया पटेल या भाजपाचा मित्रपक्ष अपना दल (सोनेलाल) च्या प्रमुख आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री होत्या. तर, दुसऱ्या टर्मवेळी त्यांनी वाणिज्य आणि उद्योग खात्याच्या कनिष्ठ मंत्री पद सांभाळलं. या निवडणुकीत त्यांच्या पक्षाची एक जागा घसरली. तरीही त्यांना मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे.

रक्षा खडसे

३७ वर्षीय रक्षा खडसे या महाराष्ट्राचे ज्येष्ठ राजकारणी एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. रावेरमधून तीन वेळा खासदार राहिलेल्या रक्षा खडसे यांनी यापूर्वी सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांनाही राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे.

सावित्री ठाकूर

सावित्री ठाकूर यांनाही यंदा राज्यमंत्री पद देण्यात आलं आहे. त्या दोन वेळा खासदार राहिल्या आहेत. २०१४ मध्ये त्या निवडणूक जिंकल्या होत्या. तर, २०१९ साली त्यांना पराभवाचा सामना करावा लागल. यंदा मात्र, २ लाखांहून अधिक मताधिक्क्यांनी त्यांनी ही निवडणूक लढवली. सावित्री ठाकूर यांना पंचायत स्तरावर काम करण्याचा मोठा अनुभव आहे.

शोभा करंदलाजे

कर्नाटकातील भाजपाच्या दोन वेळा खासदार असलेल्या शोभा करंदलाजे यांनी यापूर्वी राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यांना मोदी ३.० मध्ये कायम ठेवण्यात आले आहे. त्यांनी यापूर्वी केंद्र सरकारमध्ये अन्न प्रक्रिया उद्योग आणि कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाची जबाबदारी सांभाळली आहे.

निमुबेन भांबानिया

५७ वर्षीय निमुबेन भांबानिया या भावनगरच्या खासदार आहेत. त्या माजी शिक्षिका असून त्यांनी यापूर्वी भावनगरच्या महापौर म्हणून काम केले आहे. भाजपामध्ये विविध संघटनात्मक भूमिकांमध्येही त्या कार्यरत असतात.

दरम्यान, या मंत्र्यांना कोणती खाती देणार हे अद्याप जाहीर झालेले नाही. त्यामुळे आता खातेवाटपाकडे सर्वांचं लक्ष आहे.