तन्मयी तुळशीदास बेहेरे
मुलगी जन्माला आली आहे तर ती पुढे वयात येणार हे आईला माहीत असतंच पण सकाळी जेव्हा क्षिती बाथरूम मधून “ब्लड ब्लड!” असं ओरडली तेव्हा तिला मासिक पाळी आलेली पाहून मला जरा धक्का बसला, अखेर ‘ते’ दिवस लेकीच्या आयुष्यात आलेच म्हणायचे. तसे ते दिवस कधीतरी येणारच होते म्हणा पण ते एवढ्या लवकर? अवघं साडेदहा वर्षांच वय क्षितीचं, बाहुल्या आणि भातुकलीने खेळते ती अजून, ‘आईच्या मांडीवर बसुनी झोके घ्यावे गावी गाणी’ या वयात तिला काय आणि कसं सांगू ही मासिक पाळी काय असते आणि समजणार तरी आहे का तिला?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : ‘या’ शाळकरी मुली अंतराळात पाठवणार उपग्रह !

कितीही म्हटलं तरी, मुलापेक्षा मुलीला जगात वावरताना लहानपणापासूनच जास्त काळजी घ्यायला आपण शिकवतो. बसताना फ्रॉक मांडीवर ओढून घायचा, कोणाच्याही कुशीत जायचं नाही, अनोळखी लोकांपासून दूर राहायचं, कोणाला आपल्या अंगाला हात लावू द्यायचा नाही, हे मी तिला आवर्जून सुचवत आले. माझ्या आईनेही तसच शिकवलं होतं मला पण आता असं काही क्षितीला सांगितलं की ती उलट चार जास्त प्रश्न विचारते, नव्हे… प्रश्न विचारावेत तिने पण उत्तर द्यायला मलाच अवघडायला होतं.

आणखी वाचा : मॅट्रिमोनिअल साइट्सवर शोधत आहात आयुष्याचा जोडीदार? फसवणुकीपासून वाचण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ टिप्स

परवाच ती मित्रमैत्रणींसोबत ‘डॉक्टर डॉक्टर’ खेळत होती तेव्हा किती ओरडले मी तिला आणि लपाछपी खेळताना हरवली होती तेव्हा… ठोकाच चुकला काळजाचा! तिला समजावलं तर म्हणते, “मग काय झालं ग आई?” ‘मग खूप काही होतं बेटा…’ तेव्हा अगदी तोंडावर आलं होतं पण म्हटलं राहू दे वेळ आली की सांगू. आणि बघता बघता तिचं लहानपण एवढ्या लवकर संपलंसुद्धा! ‘मग काय होतं’ हे सांगायची वेळ माझ्यावर आली. शैशवातून पौगंडावस्थेत जाताना शारीरिक आणि मानसिक बदल होणारच फक्त एवढ्या लहान वयात ते तिला कसे सांगायचे हाच प्रश्न आहे खरा. आता निसर्गानेच त्याची गुपितं क्षितीसमोर उघड करायची ठरवल्यावर मी तरी काय करणार होते? आई म्हणून मलाच क्षितीला या बदलांसाठी तयार करावं लागणार!

आणखी वाचा : भारतीय महिला फूटबॉलमधील ‘उद्याचे तारे’ घडण्यासाठी…

क्षिती भेदरलेल्या कोकरासारखी बाजूला येऊन बसली… “आई मला तिथे काही लागलंय का?” मी तिला जवळ घेतलं डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, “नाही बाळा, वयात आलीस तू आता, मुलींना ठराविक वयानंतर दर महिन्याला हे असे पिरियड्स येतात त्यालाच मासिक पाळी म्हणतात.” “म्हणजे हे असं ब्लिडींग एव्हरी मंथ होणार का?” “हो आणि हे खूप नॉर्मल असतं. प्रत्येक मुलीला पिरियड्स येतातच, मलाही पहिल्यांदा आले होते तेव्हा, तू कशी मघाशी घाबरली होतीस तशी मीही घाबरलेच होते. कारण असं आणि एवढं रक्त पाहायची माझीसुद्धा पहिलीच वेळ. ती दुर्गंधी, सतत काही गळल्याची भावना, ओटीपोटात दुखणं, प्रचंड अस्वस्थता ह्या सगळ्यातून मीही गेले होते. मला तेव्हा तुझ्या आजीने तेव्हा सांगितलं होतं की तू एकटी नाहीस मीही गेलेय यातून.” एवढ्या सगळ्यांना झालंय म्हणजे हे नॉर्मल आहे हा दिलासा तिला त्यावेळी वाटला. नंतर मी तिला सॅनिटरी नॅपकिनचं पॅकेट दिलं आणि ते कसं वापरायचं हेही समजावलं.

आणखी वाचा : का रे अबोला?

या सर्व घटनेमध्ये मला माझे ‘ते’ दिवस आठवले. मला पाळी चौदाव्या वर्षी आली होती. तोपर्यंत नात्यातल्या बायकांना कावळा शिवतो, त्या बाहेरच्या होतात म्हणजे काय होतं हे मला समजायला लागलं होतं. एव्हाना बरोबरीच्या मुली मोठ्या दिसायला लागल्या होत्या. त्यांची शरीरं भरीव आणि मोहक दिसायला लागली होती. त्यांच्यातला अवखळपणा जाऊन त्याची जागा नाजुकपणाने घेतली. मुलांकडे त्या चोरटे कटाक्ष टाकू लागल्या. आई मला सांगायची की, “त्या आता ‘वयात’ आल्या”. पुढे तूही येशील. पण जेव्हा ‘ते’ दिवस आले तेव्हा… हे वयात येणं खूपच वेदनादायी असतं असं वाटलं. का प्रत्येकीने हे असं मोठं व्हायचं? असे अनेक प्रश्न मनात आले. तेव्हा आईने मंगलाताई गोडबोले यांचं ‘वयात येताना’ हे पुस्तक मला आणून दिलं. ते पुस्तक म्हणजे माझी मैत्रीणच झालं. माझ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं त्यातील शास्त्रीय माहितीसह मला त्या पुस्तकात मिळाली होती. माझ्या शारीरिकच नव्हे तर मानसिक स्थित्यंतरांना योग्य आणि सकारात्मक वळण लावण्याचं काम या पुस्तकाने केलं. पण तेव्हा मी चौदा वर्षांची होते. वयाप्रमाणे थोडी समजही आली होती पण क्षितीचं वय अगदीच दहा आहे आणि त्यात वाचनाची आवड नाही, अल्लडपणा भरलेला, फक्त मोबाईलच आकर्षण, हा संवाद घडवायचा कसा आणि हे जीवनशिक्षण तिच्यापर्यंत पोहोचवायचं कसं? या विचारात दिवस गेला.

आणखी वाचा : अक्षता मूर्ती आहेत तरी कोण?

संध्याकाळी खाली सोसायटीमध्ये चालायला गेले तेव्हा बी विंगमधली पूजा मला येऊन भेटली. तिची मुलगी ऋता क्षितीच्याच वर्गात आहे. पूजा म्हणाली, “अगं, काल ऋता युट्युब बघत बसली होती. माझं सहज लक्ष गेलं तर त्यात आयपीलची जाहिरात लागली होती. गेल्याच महिन्यात पाळी आली तिला, मला अजूनही कळत नाही आहे तिला कसं समजावू ते आणि आता हे असं बघून तिने काही पुढचे प्रश्न विचारले मग…?” पूजाने उसासा टाकला. “बघ न, आपल्या वेळी पाळी कशी १४ किंवा १५ वयात यायची ना ग पण आता बघ ना कसं झालंय. नऊ दहा हे काय वय आहे का ग पाळी येण्याचं?”

आणखी वाचा : महिलांना व्हाईट डिस्चार्ज का होतो? जाणून घ्या किती दिवसापर्यंत डिस्चार्ज होणे सामान्य आहे

तिला थोडं एकांतात नेऊन आमची चर्चा मी पुढे नेली, “मी कालच ‘लोकसत्ता’मध्ये वाचलं की कोरोनामुळे मुली दीड वर्ष घरी बसल्या, त्यांचं वजन वाढलं, बॉडी मास इंडेक्स वाढला, बीएमआय प्रमाणे बॉडी एज पण वाढलं, जे आपल्या वयापेक्षा जास्त होतं. मेंदूला फक्त बॉडी एज समजतं म्हणे. हेच वय ग्राह्य धरून मुलींचा मेंदू पिट्युटरी ग्रंथींमार्फत मासिक पाळी येण्याची प्रक्रिया वेळेआधीच सुरु करू लागला आहे. शरीराचं वय झालं म्हणून तसे हार्मोन्स स्रवू लागले आणि आपल्या मुलींना लहान वयात पाळी सुरु झाली, असा त्यामागचा समज आहे. फक्त कोरोनाच याला कारणीभूत नाही तर जंक फूड आणि सोशल मीडियाही याला जबाबदार आहेतच.”

आणखी वाचा : मेंदू तल्लख ठेवणारे हे व्यायाम करून तर पाहा

पूजाचं समाधान झालेलं दिसलं. पण खरी कसोटी पुढेच होती. सगळ्या बाजूने होणारा माहितीचा भडीमार आणि त्यात वाट चुकलेली, अकाली आलेली पौगंडावस्था याचा मेळ कसा घालावा. आज ऋता आयपीलची जाहिरात पाहतेय उद्या क्षिती बघेल. पौगंडावस्थेचा हा टप्पा कसा सुखरूप पार पडेल? ह्याचा विचार आम्ही दोघी करू लागलो. तेव्हा पूजाने तिच्या वयात येण्याच्या त्या दिवसात मीना नाईक यांचे ‘वाटेवरती काचा ग’ हे लहान मुलींच्या लैंगिक शोषणाविषयीचे नाटक पहिले होते. ती म्हणाली, “आपणही असाच पपेट शो केला तर?”
“हो ग, खरं तर युट्युबवर, जॉन हॉपकिन्ससारख्या वेबसाईटवर आणि बऱ्याच कितीतरी ऑथेंटिक मेडिकल साईट्स आहेत. आपल्या मुली थोड्या मोठ्या असत्या तर ते ज्ञान त्यांचे त्यांनीच मिळवले असते. पण आता बाहुल्यांशी खेळायच्या वयात मासिक पाळीचं ओझं त्यांना वागवायला लागणार आहे. मग या बाहुल्यांचाच वापर करून हा विषय त्यांना साध्या सोप्या पद्धतीने समजावता आला तर?” मला पूजाचं म्हणणं पटलं.

आणखी वाचा : काय आहे स्मृती मानधनाचा डाएट प्लान?

आम्ही कामाला लागलो. पूजाकडे राजस्थानवरून आणलेल्या कठपुतळ्या होत्या आणि ती नाटकात कामही करायची. तिने प्रयोगाची जबाबदारी घेतली. वाचन हा माझा विषय असल्याने मी रिसर्च करायचं आणि संहिता लिहायचं ठरवलं. दिवाळीनंतरची शनिवार संध्याकाळ. काहीतरी सरप्राईझ मिळणार हे मुलींना कुठूनतरी कळलं होतं. ते सरप्राइझ काय असेल याची अख्खी दिवाळी चर्चा होती. फटाके वाजवताना, रांगोळी काढताना, किल्ले बनवताना तोच विषय. कधी एकदा शनिवार संध्याकाळ होतेय असं झालं होतं त्यांना. अंधार पडू लागला आणि सोसायटीच्या गच्चीवर राजस्थानी संगीत वाजू लागलं. मुली गच्चीच्या दिशेने पळाल्या. छोट्याशा रंगमंचाचा पडदा उघडला. मुन्नू आणि तिच्या शाळेतल्या बाईंचा तो संवाद होता. मुन्नूला शाळेत असताना मासिक पाळी आलेली असते. त्यावर तिचे प्रश्न आणि तिच्या बाईंची उत्तरे असे ते चर्चानाट्य होते. बाई सांगत असतात “दर महिन्याला एक स्त्रीबीज बीजांडातून पक्व होऊन बाहेर पडते. त्याच्या वाढीसाठी एक आच्छादनही तयार होत असते. योग्य काळात स्त्रीच्या गर्भाशयातील स्त्रीबीज आणि पुरुषाच्या वीर्यामधील पुरुषबीज यांचा संयोग होऊन गर्भ तयार होत असतो. जेव्हा हा संयोग होत नाही तेव्हा स्त्रीबीजासहित आच्छादन शरीराबाहेर फेकले जाते. यालाच मासिक पाळी म्हणतात.” त्यापुढे मासिक पाळीत स्वतःची काळजी कशी घ्यावी, स्वतःची स्वच्छता कशी राखावी, स्वतः च्या सुरक्षिततेसाठी स्वतःच कसं जागरूक असावं, मुलांबद्दल वाटणारे आकर्षण, त्याला सुसंस्कृत वळण कसं द्यायचं, प्रेम आणि मैत्री यातील फरक, मासिक पाळीमुले येणारी गर्भारपणाच्या जबाबदारी, अपघातातून आलेले गर्भारपण, ते टाळण्यासाठी घ्यायची खबरदारी या सगळ्याबद्दल बाईंनी छोट्या छोट्या उदाहरणातून सांगितले. त्यानंतर मुलींच्या शंका समाधानाचे सत्रही आम्ही ठेवले. मुलींच्या प्रश्नांना उत्तरं देताना मेडिकल साईट्स कशा हाताळायच्या याचीही माहिती आम्ही देत होतो. कार्यक्रमाच्या शेवटी हाय टी विध फराळ करून दिवस आणि दिवाळी साजरी केली.

आणखी वाचा : फोर मोअर शॉट्स – तिसऱ्या पर्वात महिलांची लैंगिकता, सेक्स आणि बरंच काही…

विश्वाचं रहस्य आपल्यासमोर उलगडलं जातंय आणि आता आपणही त्याचा एक भाग झालोय म्हणून आपल्याला आता जबाबदारीने वागायला हवं याची जाणीव मुलींना झाली. कठपुतळ्यांच्या खेळातून आयुष्यभर पुरेल एवढे शहाणपण त्या घेऊन गेल्या. त्यांच्या आयाही मनावरून मोठ्ठ ओझं उतरल्याच्या आनंदात होत्या. आम्हाला मात्र कळ्यांची फुलं होण्याच्या ‘जागरूक’ प्रवासात आपलाही सहभाग आहे याचं समाधान मिळालं.
tanmayibehere@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Menstrual cycle periods at the age of 10 and 12 why they come early and how to handle it vp
First published on: 30-10-2022 at 07:42 IST