भाग्यश्री फडके: एका स्त्रीला वयवर्ष ६५-७०च्या आसपास एक दिवस अचानक विव्हळून पोटात दुखायला लागते. तिला ताबडतोब डॉक्टरांकडे नेल्यावर असे लक्षात येते की स्त्रीच्या अंडाशयात मोठ्या (६-८ इंच) गाठी आहेत. त्यामुळे ट्युब्सना वेढा पडलाय आणि तेथील रक्तप्रवाह खंडित झालाय, त्यामुळे प्रचंड वेदना होत आहेत.

डॉक्टर सांगतात, ‘ताबडतोब तिचे दोन्ही अंडाशय आणि गर्भाशय काढून टाकले नाही तर जिवाला धोका निर्माण होऊ शकतो,’ म्हणून ताबडतोब निर्णय घेऊन संपूर्ण गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया किंवा टोटल हिस्टेरेक्टॉमी केली जाते आणि महिलेचा जीव वाचतो. ग्रामीण महिलांमध्ये आजही घरी एकटीच स्त्री असेल तर देवधर्म कार्य करण्यासाठी पाळीच्या गोळ्या घेऊन पाळी पुढे ढकलण्याची अनेक उदाहरणे आहे.

आणि हे अनेक वर्षे करणाऱ्या स्त्रीयाही आहेत. अशाच एका घटनेत एक स्त्री जवळजवळ ४० वर्षं अशा गोळ्या घेत होती. आजच्या धावपळीच्या युगात स्त्रीच्या आयुष्यात अनेक भूमिका आहेत- ती आई आहे, मुलगी आहे, करिअर वुमन आहे आणि घराचा कणा आहे. पण या सगळ्या व्यापात ती एका गोष्टीकडे दुर्लक्ष करते, ती म्हणजे तिचे मासिक पाळीचे आरोग्य. वयात आलेल्या पौगंडावस्थेतील मुलीला साधारणपणे १०-१२व्या वर्षी पाळी येते ते ४५-५५ वयापर्यंत रजोनिवृत्तीपर्यंत मासिक पाळीशी सामना करावा लागतो.

शरीरातील ‘अदृश्य’ रिमोट कंट्रोल : हार्मोन्स

आपल्या शरीरात होणारे बदल, आपला मूड आणि आपली प्रजनन क्षमता हे सर्व काही हार्मोन्सवर अवलंबून असते. विशेषतः इस्ट्रोजेन (Estrogen) आणि प्रोजेस्टेरॉन (Progesterone) हे दोन हार्मोन्स स्त्रीच्या आयुष्यात महत्त्वाचे असतात. सकाळी उठल्यावर अचानक चिडचिड होणे, विनाकारण रडू येणे किंवा खूप थकवा जाणवणे… आपल्याला वाटते की कामाचा ताण आहे. पण बऱ्याचदा हे ‘पीएमएस’ (PMS) म्हणजेच पाळीपूर्व लक्षणांमुळे असते. हे हार्मोन्सचे खेळ आहेत.

स्त्रीच्या शरीरातील मासिक पाळी हा केवळ रक्तस्त्रावाचा मासिक टप्पा नाही; तो एंडोक्राइन (हार्मोनल), प्रजनन, मानसिक आणि मेटाबॉलिक आरोग्याचा आरसा आहे. इस्ट्रोजेन-प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सचे सूक्ष्म संतुलन, मेंदूतील हायपोथॅलॅमस-पिट्युटरी-ओव्हेरियन (HPO) अक्षाचे समन्वय, आणि गर्भाशयातील एंडोमेट्रियमची प्रतिक्रिया… या सर्वांचा परिणाम म्हणजे नियमित पाळी. आधुनिक जीवनशैली, ताण, कमी झोप, वजनातील चढउतार आणि सहज उपलब्ध औषधे यामुळे स्व-औषधोपचार वाढले आहेत. परंतु तात्पुरत्या आरामामागील जैविक परिणाम समजून घेणे आवश्यक आहे.

पाळीतील वेदना : किती सामान्य, किती गंभीर?

जगभरातील अभ्यासांनुसार प्रजननक्षम वयोगटातील ५०–९०% महिलांना पाळीतील वेदना (dysmenorrhea) होतात, आणि अनेकांना मध्यम ते तीव्र स्वरूपाचा त्रास होतो. यामुळे काम/शिक्षणातील उत्पादकता घटते, अनुपस्थिती वाढते आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. वेदनांचे प्रमुख कारण म्हणजे प्रोस्टॅग्लॅंडिन्स या रसायनांचे जास्त प्रमाण- जे गर्भाशय आकुंचन वाढवतात. शहरी महिलांमध्ये जास्त ताण, कमी झोप आणि प्रक्रिया केलेला आहार यांमुळे वेदना व PMS लक्षणे वाढल्याचे दिसून येते. डिजिटल हेल्थ-ॲप्समुळे चक्र-ट्रॅकिंग वाढले असले तरी स्व-औषधोपचाराचे प्रमाणही जास्त दिसते.

पाळी पुढे ढकलण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या गोळ्या… कितपत सुरक्षित?

काही प्रसंगी (प्रवास, परीक्षा, समारंभ) पाळी पुढे ढकलण्यासाठी प्रोजेस्टिन-आधारित गोळ्या (उदा. norethisterone) दिल्या जातात. कार्यपद्धती : शरीरातील प्रोजेस्टेरॉन-सदृश प्रभाव वाढवून एंडोमेट्रियमच्या पडद्याचे स्तर निघून जाणे काही कालावधी नंतर घडवतात. पाळी काही दिवस पुढे जाते; औषध थांबवल्यावर रक्तस्त्राव होतो.

सुरक्षिततेचे मुद्दे :

डॉक्टरांच्या सल्ल्याने क्वचित/अल्पकालीन वापर तुलनेने सुरक्षित आहे, पण वारंवार वापरल्यास हार्मोनल फ्लक्चुएशन, पॅडवर रक्ताचे ठिपके दिसणे (स्पॉटींग), मूड बदलणे, मळमळ, पुढे जाऊन गाठी निर्माण झाल्याने प्रजनन अवयव काढून टाकावे लागू शकतात अशी लक्षणे दिसतात. काही धोक्याच्या पार्श्वभूमी जसे की धूम्रपान, स्थूलता, रक्तवाहिनीमध्ये गुठळ्या (VTE)चा इतिहास असेल तर हार्मोनल थेरपी काळजीपूर्वक वापरली पाहिजे.

तांत्रिक फरक लक्षात ठेवा : Period-delay pills या गर्भनिरोधक गोळ्या नाहीत; त्यांचा उद्देश तात्पुरता विलंब आहे, दीर्घकालीन चक्र-नियमन नव्हे.
अनियमित पाळी : हार्मोनल गोळ्या की मूळ कारण? अनियमित पाळीची संभाव्य कारणे आहेत हार्मोनल गोळ्या दीर्घकाळ घेतल्याने अंडाशयात गाठी तयार होणे (पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम PCOS/PCOD) (इन्सुलिन रेझिस्टन्ससह), काही थायरॉईड विकार असतील तर रक्तातील प्रोलॅक्टिन या संप्रेरकाच्या असामान्यपणे उच्च पातळी होणे (हायपरप्रोलॅक्टिनेमिया), अचानक वजन वाढ/ घट, तीव्र ताण, झोपेची कमतरता किंवा अतिव्यायाम करणे.

अनियमित पाळीचे मूळ कारण हार्मोनल गोळ्या असू शकते. शिवाय वेगळेदेखील असू शकते. हार्मोनल गोळ्या घेतल्यावर चक्र ‘नियमित’ दिसू शकते; परंतु त्या लक्षण-नियंत्रण करतात. मूळ कारण (उदा. इन्सुलिन रेझिस्टन्स, TSH बिघाड) दुरुस्त न झाल्यास औषध थांबवल्यावर समस्या परत येऊ शकते.

क्लिनिकल दृष्टिकोन :

  • पुढील तपासण्या करणे गरजेचे : TSH, prolactin, fasting insulin/glucose, lipid profile, USG pelvis.
  • PCOSमध्ये : वजन व्यवस्थापन (५–१०% घटही उपयुक्त), नियमित व्यायाम, संतुलित आहार, आवश्यक असल्यास इन्सुलिन-सेंसिटायझेशन.
  • वैयक्तिकृत थेरपी : वय, गर्भधारणेची योजना, जोखीम प्रोफाइल लक्षात घेऊन.


पाळीतील वेदनांसाठी सतत painkiller: गर्भाशयावर परिणाम?

सर्वाधिक वापरले जाणारे औषधे म्हणजे वेदनाशामके (आयब्यूप्रोफेन, मेफेनामिक ॲसिड, डायक्लोफेनाक ).कार्यपद्धती: प्रोस्टॅग्लॅंडिन्स कमी करून वेदना कमी करतात—म्हणून primary dysmenorrhea मध्ये प्रभावी.

काय लक्षात घ्यावे?

पाळीतील वेदनांसाठी अल्पकालीन/निर्देशित डोस सुरक्षित आहेत. परंतु दीर्घकालीन, अनियंत्रित वापरामुळे गॅस्ट्रिक त्रास, किडनीवर ताण, रक्तदाब वाढण्याची शक्यता आहे. Painkiller गर्भाशय कायमचे खराब करतात असा ठोस पुरावा नाही; पण अति-वापरामुळे इतर अवयवांवर धोका वाढतो. तीव्र/असामान्य वेदना असल्यास secondary causes (endometriosis, fibroids, adenomyosis) शोधणे आवश्यक- केवळ painkiller वर अवलंबून राहू नये.

स्व-औषधोपचार : वाढती प्रवृत्ती आणि धोके

फार्मसीत सहज उपलब्ध औषधे, इंटरनेटवरील सल्ले आणि वेळेअभावी डॉक्टरांकडे न जाणे- यामुळे स्व-औषधोपचार वाढले आहेत. अभ्यास सांगतात की पाळीतील वेदनांसाठी औषध घेणाऱ्या महिलांपैकी मोठा भाग डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे घेतो. यामुळे गंभीर आजार उशिरा लक्षात येतात. औषध-संयोग (drug interactions) होऊ शकतात. चुकीचा डोस/कालावधी घेतला जाऊ शकतो.

आधुनिक जीवनशैली आणि पाळी

२०२६ च्या या काळात आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी पूर्णपणे बदलल्या आहेत. प्रक्रिया केलेले अन्न आणि व्यायामाचा अभाव यामुळे ‘हार्मोनल इम्बॅलन्स’ ही घरोघरी जाणवणारी समस्या झाली आहे. स्क्रीन टाइम आणि झोपेवर परिणाम दिसून येतात. रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघितल्याने ‘मेलाटोनिन’ हार्मोनवर परिणाम होतो, ज्याचा थेट संबंध तुमच्या पाळीच्या चक्राशी असतो. स्ट्रेस हार्मोन्स-जेव्हा आपण खूप तणावात असतो, तेव्हा शरीरात ‘कोर्टिसोल’ वाढते, जे पाळी लांबणीवर टाकण्यास कारणीभूत ठरते.

महिलांनी काय करावे?

पाळीचा ट्रॅकर वापरा : तुमच्या मोबाईलमध्ये एखादे ‘Period Tracker’ ॲप डाऊनलोड करा. किती कालावधीसाठी, किती रक्तस्त्राव, किती वेदना, वेदनेची तीव्रता, पाळी येण्या आधीची लक्षणे (PMS) नोंदवा. यामुळे तुम्हाला तुमच्या चक्राचा पॅटर्न समजेल. तुमची जीवनशैली औषधाइतकीच महत्त्वाची आहे. दररोज ७–८ तास झोप गरजेची आहे. आठवड्यात ≥१५० मिनिटे मध्यम व्यायाम आवश्यक आहे. समतोल आहार: आहारात पालेभाज्या, फळे आणि पाण्याचे प्रमाण भरपूर ठेवा. प्रोटीन-समृद्ध, फायबरयुक्त आहार घेणे फायदेशीर ठरते, प्रक्रिया-आधारित साखर कमी, ताण-व्यवस्थापन (श्वसन, योग, डिजिटल डिटॉक्स) करणे अतिशय गरजेचे आहे. तुमची शरीरयष्टी आणि दुसऱ्या महिलेची शरीरयष्टी वेगळी असू शकते.

धोक्याची लक्षणे:

सलग ३ महिने पाळी येत नसेल तर अत्यंत तीव्र वेदना जाणवल्या त्यात अचानक वाढ, खूप जास्त रक्तस्त्राव/मोठ्या गाठी अंगावरून जात असतील तर, संभोगात वेदना होत असतील तर त्वरित स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. Period-delay केवळ अपवादात्मक प्रसंगी घेण्याची औषधे आहेत. अति रक्तस्त्राव होत असल्यास रक्तातील लोहाची (Iron) तपासणी करावी. अंगावर काढणे किंवा दुर्लक्ष करणे टाळावे. मूड स्विंग्स होत असल्यास योगासने आणि पुरेसा आहार घ्यावा. जास्त प्रमाणात कॅफेन (चहा/कॉफी) घेणे टाळावे.

वेदना शामके यांचा योग्य डोस-कालावधी महत्त्वाचा आहे. हार्मोनल थेरपीपूर्वी जोखीम किती आहे हे स्त्रीरोगतज्ञांकडून तपासून घ्यावे.पाळी हा स्त्रीच्या आरोग्याचा बायो-मार्कर आहे. तात्पुरता आराम देणारी गोळी सोपी वाटते; परंतु मूळ कारणाधारित दृष्टिकोन दीर्घकालीन आरोग्य देते. औषधनिर्माणशास्त्र आणि आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने रुग्णशिक्षण, जोखीम-मूल्यांकन, वैयक्तिकृत थेरपी आणि जीवनशैली सुधारणा हीच शाश्वत दिशा आहे.

स्त्रीचे स्वास्थ्य हे कुटुंब आणि समाजाच्या आरोग्याचे केंद्रबिंदू आहे; म्हणून माहितीपूर्ण निर्णय घेणे हीच खरी सक्षमता आहे. आपले शरीर हे एक मंदिर आहे आणि हार्मोन्स हे त्यातील ऊर्जेचे स्रोत आहेत. ‘गुगल’वर सर्च करून किंवा मैत्रिणीने सांगितले म्हणून स्वतःवर प्रयोग करणे थांबवा. आपली पाळी आणि आपले हार्मोन्स हे केवळ पुनरुत्पादनासाठी नसून आपल्या संपूर्ण मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. लक्षात ठेवा, वेळेवर घेतलेला डॉक्टरांचा सल्ला हा भविष्यातील मोठ्या आजारांना रोखू शकतो. हीच या महिला दिनापासून स्वतःला दिलेली स्वास्थ्याची भेट ठरेल.
(लेखिका औषधनिर्माणशास्त्र आणि आरोग्य व्यवस्थापन शास्त्राच्या द्विपदवीधर आहेत.)