मासिक पाळीच्या 'त्या' गोळ्या घेणं योग्य की अयोग्य? | menstrual Period Pills side effects women health nrp 97 | Loksatta

मासिक पाळीच्या ‘त्या’ गोळ्या घेणं योग्य की अयोग्य?

दर महिन्यात पाच दिवस येणारी मासिक पाळी अन् त्यादरम्यान होणारा तो त्रास.

मासिक पाळीच्या ‘त्या’ गोळ्या घेणं योग्य की अयोग्य?

मासिक पाळी हा शब्द उच्चारला तरी महिलांच्या कपाळावर आठ्या निर्माण होतात. ती का येते, कशासाठी, मग ती महिलांनाच का येते, त्यावेळी एवढा त्रास का होतो असे लाखो प्रश्न महिलांना पडलेले असतात. पण याचे उत्तर मात्र एकच… दर महिन्यात पाच दिवस येणारी मासिक पाळी अन् त्यादरम्यान होणारा तो त्रास. आपल्यातील अनेक महिला ही पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्यांचा वापर करतात. त्या योग्य असतात की नाही याबद्दल फारस बोललं जात नाही. फार सहज आपण एखाद्या मैत्रीणीला अगं ती अमूक अमूक गोळी घे असं सांगून मोकळं होतो. पण तिचा वापर जितका प्रमाणात आणि योग्यतेने कराल तेवढीच ती उपयुक्त असते अन्यथा त्याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.

काल ऑफिसमध्ये माझ्या एका मैत्रिणीच्या पोटात भयंकर दुखायला लागलं. सुरुवातीला आम्हाला वाटलं ती थोड्यावेळाने होईल बरी… पण काही केल्या तिची पोटदुखी काही कमी होईना. यानंतर मात्र आम्ही आमच्या ऑफिसच्या शेजारीच असलेल्या एका रुग्णालयात तिला घेऊन गेलो. तिच्या नशिबाने त्यावेळी तिथे स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध होते. त्यांनी तिला तपासले आणि इंजेक्शन दिले. त्यामुळे तिचं पोट दुखणं जरा कमी झाले. तिला शुद्धही आली होती. तिची विचारपूस करत आम्ही काही मैत्रिणी जे. जे रुग्णालयातील डॉक्टरांच्या केबिनमध्ये शिरलो.
आणखी वाचा : Indian Myths and Facts about Menstruation : मासिक पाळी, सण अन् ‘ती’!

त्यावेळी आमच्यातील एका मैत्रिणीने डॉक्टर अशोक आनंद यांना विचारले, डॉक्टर सुमनला काही झालंय का? म्हणजे अचानक तिच्या एकदम पोटात वगैरे दुखायला लागलं… एरव्ही तिला कधी साधी सर्दीही झालेली आम्ही पाहिली नाही आणि आता अचानक इतकी पोटदुखी… नेमकी कशामुळे? त्यावर डॉक्टरांनी आम्हाला सर्वांना खुर्चीत बसायला सांगितलं आणि त्या म्हणाल्या, तुम्ही आजकालच्या मुली मासिक पाळीला अजिबात गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे हे असं काही तरी होतं.

सुमनला गेल्या अनेक दिवसांपासून मासिक पाळीचा त्रास होत होता. काही दिवसांपूर्वी एकदा एका मैत्रिणीचा साखरपुडा होता त्यावेळी तिने मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेतल्या. त्यानंतर मग तिला गावी पूजेला जायचं असल्याने पुन्हा पाळीची अडचण नको म्हणून तिने गोळ्या घेतल्या. हल्लीच गणपतीदरम्यान घरात गणपती असतो त्यामुळे मग तिला घरातल्यांनीच पाळी पुढे जावी यासाठी गोळ्या घ्यायला लावल्या आणि या सर्वांचे परिणाम तिच्या शरीरावर झाले आहेत.
आणखी वाचा : “बडबड बडबड, थकतच नाहीत रे, या बायका.. !”

गोळ्या योग्य की अयोग्य?

मासिक पाळीदरम्यान वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांचे स्त्रियांच्या शरीरावर परिणाम होतात. स्त्रियांच्या शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टोरॉन असे दोन हार्मोन्स असतात. त्यावर पाळीचं चक्र आधारित असतं. पाळी उशिरा यावी म्हणून या हार्मोन्सच्याच गोळ्या घ्याव्या लागतात. या गोळ्या हार्मोन्सच्या नियमित सुरु असणाऱ्या चक्रावर परिणाम करतात.

नैसर्गिकरित्या चालेलं पाळीचं चक्र पुढे -मागे केल्याने अनेक वाईट परिणामही होऊ शकतात. एखाद्या महिलेने या हार्मोन्सचं सातत्याने अतिसेवन केलं तर ब्रेन स्ट्रोक, पॅरालिसिस, फिट येणं असा घटना पाहायला मिळतात. पाळी लांबवण्यासाठी बायका दहा ते पंधरा दिवस या गोळ्या घेत राहतात. त्याचा डोस जास्त झाल्याने याचे परिणाम फार घातक असतात.

स्त्रिया बहुतांश वेळी डॉक्टराला या गोळ्या घेण्यापूर्वी विचारत नाहीत. या गोळ्या मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध असतात. त्यामुळे त्या त्यांना वाटेल तेव्हा त्या गोळ्या घेतात. पण या गोळ्या घेणाऱ्या पेशंटची हिस्ट्री महत्त्वाची असते. एखाद्या स्त्रीला मायग्रेनचा त्रास असेल किंवा तिला आधी स्ट्रोक येऊन गेला असेल, हाय किंवा लो ब्लडप्रेशर असेल, तिचं वजन जास्त असेल तर या गोळ्यांचा त्या बाईला जास्त त्रास होऊ शकतो, अशा एक ना अनेक गोष्टी डॉक्टरांनी आम्हाला समजावल्या. त्यावेळी त्या आम्हाला असंही म्हणाल्या, तुम्ही आजकालच्या मुली…तुमच्याकडे मोबाईल, कॉम्प्युटरवर सर्व माहिती उपलब्ध असते. ही देखील आहे. मग तरीही तुम्ही कशा या गोष्टींना खतपाणी घालता? कोणास ठाऊक? त्यांच्या या बोलण्याने आम्हा मैत्रिणींच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला.

आणखी वाचा : ….अन् तेव्हा ती बाहुलीसारखी नटलेली दिसेल

स्त्रियांच्या आरोग्याशी खेळ

त्या केबिनमधून बाहेर आल्यावर आम्ही एकमेकींकडे फक्त प्रश्नार्थक नजरेने पाहत होतो. तिकडे बाहेर असलेल्या खुर्च्यांवर शांतपणे बसलो. त्यावेळी आमच्यातली एक मैत्रीण उठून पटकन म्हणाली, जाऊ दे बाई मी यापुढे त्या गोळ्या बिळ्या घेणं बंदच करणार आहे. कशाला नको तो त्रास करुन घ्यायचा जीवाला…. मी अजिबात यापुढे त्या घेणार नाही.

मासिक पाळी आली तर येऊ दे…. देवं असं म्हणतं नाही की पाळीत पूजा करु नका, देवळात जाऊ नका. हे नियम, ही बंधन आपल्याच समाजाने घातलेली आहे. त्याचा कधीतरी विरोध करणे खरंच गरजेचे आहे. या चुकीच्या समजुतींमुळे स्त्रियांच्या आरोग्याशी मांडलेला खेळ तरी पूर्णपणे बंद व्हायला हवा!

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-09-2022 at 11:43 IST
Next Story
मनाचा तोल सांभाळण्यासाठी उपयुक्त आसन