खासदार पूनम महाजन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजकारणी लोकांची मुलं म्हणतात, आम्हाला राजकारणाचं बाळकडू घरांतूनच मिळालेय. हे विधान जरी “क्लिशे”

अगदी घिसपिटं वाटत असलं, तरी लहानपणापासून जे काम आपले आई- वडील करतात ते पाहत आपण मोठे होतो. त्यातूनच घडतो. त्यादृष्टीने अर्थात माझे वडील प्रमोद महाजन हेच माझे राजकारणातले खरे मेन्टॉर!

पण दुर्दैवाने माझे हे मेन्टॉर त्यांच्या मृत्यूपश्चात माझ्या आयुष्यात आले. त्यामुळे मला माझी कारकीर्द स्वतःलाच कष्टाने घडवावी लागली. बाबा हयात होते तेव्हा राजकारणाचा विचार सुद्धा मी केला नव्हता. प्रोफेशनल पायलटची नोकरी आणि मुलंबाळं, संसार हेच माझं जग! पण नाही म्हटलं तरी एवढ्या मोठ्या राजकारणी माणसाच्या मुलीवर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिणाम होणारच ना! त्यांचे उपजत नेतृत्व गुण माझ्यातही होतेच. म्हणजे शाळेत मुलांना गोळा करून विविध कार्यक्रम करायचे वगैरे. पण ते तेवढ्यापुरतच! अर्थात बाबांच्या स्वभावातली करुणा माझ्यात झिरपली होती. त्यामुळे “अॆनिमल अॆक्टिव्हिस्ट” म्हणून खूप काम करत होते मी. पण बाबांनी कधीही थेट काहीही शिकवलं नाही मला. पण त्यांच्या भोवतीच ते वलय! तो ऑरा! आम्ही अक्षरशः डोळे विस्फारून तो अनुभवत असू नेहमीच. ते आमच्या आयुष्यात खूप कमी वेळ असायचे. पण कितीही व्यग्र असले, तरीही लहानपणापासून ते मला सभांना व बैठकांना घेऊन जात असत. त्यांच्या मागे मागे अशी मी खूप फिरलेय. त्यांनाही गंमत वाटायची आणि मलाही! आज मात्र मला वाटतं, त्या निरुद्देश फिरण्यांतूनच मी त्यांच्या नकळत अनेक गोष्टी टिपल्या.
आणखी वाचा : नवरात्रीचे नऊ रंग नेमके कसे ठरवले जातात? जाणून घ्या यामागे दडलेले गुपित

एक प्रसंग सांगते. राम मंदिरासाठी रथयात्रा काढण्याची मूळ संकल्पना बाबांची! त्या रथयात्रेत मी बाबांबरोबर कधी कधी जायची. एकदा पुण्याला त्यांची सभा होती. आमची बरेच दिवसांत भेट नव्हती झाली. म्हणून त्यांनी मला आणि आईला तिथे बोलवलं. स्टेजवर गाद्या गिरद्या होत्या. ते आयोजक म्हणून शेवटच्या रांगेत बसले होते चक्क मला शेजारी घेऊन माझ्याशी खेळत. मी अवघी दहा वर्षांची होते तेव्हा. त्या सभेतलं शेवटचं भाषण अडवाणीजींच होतं. तेव्हाच स्टेज खालून हळूहळू आवाज येऊ लागला.”प्रमोदजी तुम्हीही बोला”. तो आवाज हळूहळू एवढा मोठा झाला की शेवटी बाबा उठलेच. मी त्यांच्या मागेच बसलेली होते. ती अफाट गर्दी. पाठमोरे बाबा. त्यांचे हातवारे. त्यांच्या भाषणाची सुरुवात आणि शेवट. प्रचंड टाळ्या आणि शिट्ट्या! मला तेव्हा ते भाषण बिलकुल कळलं नाही. पण त्या दृश्याचा माझ्या मनावर खोल परिणाम झाला. इतका की पुढे मी मोदीजींची, ओबामांची किंवा अनेक चांगल्या वक्त्यांची भाषणं आवर्जून ऐकू लागले. परिणामी माझी सुरुवातीच्या काळांतली संसदेतली भाषणं आणि आत्ताची नेहमी नावाजली जाणारी अभ्यासपूर्ण भाषणं—- हा मोठा पल्ला मी गाठू शकले. तरीही खरं सांगते, संसदेत भाषण करताना आजही माझा जीव जातो. तोंड सुकतं. घाबरून जाते मी! पण तरीही त्यावर बाबांच्या स्टाईलचा आणि अभ्यासाचा प्रभाव असतो हे नक्की!

मी पाच वर्षांची असताना मला पहिलं पुस्तक कोणी दिलं? बाबांनी! ते ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचं! मला लहानपणी ते कळलं का? बिलकुल नाही. पण आता भारतीय जनता पक्षाची खासदार म्हणून काम करताना त्या विचारधारेची व त्या संस्कारांची बालपणी झालेली ओळख माझ्यासाठी खूपच मोलाची ठरते. बाबांनी दिलेल्या या पहिल्या पुस्तकामुळे मी दर्जेदार पुस्तकांचं वाचन करू लागले. पुपुल जयकरांचं इंदिरा गांधींवरचं पुस्तक, अब्राहम लिंकन यांचं चरित्र! मला मनांतून न आवडणारा चर्चिल! त्याच्या पुस्तकामुळेच त्याने स्वतःच्या देशासाठी केलेलं बहुमोल कार्य मला कळलं.
आणखी वाचा : ४७०० कोटींची मालमत्ता असणाऱ्या नेहा नारखेडे आहेत तरी कोण?

प्रांजळपणे सांगते, मी खूप बुद्धिमान नाही. पण लोकांशी कसं वागायचं, कसं बोलायचं, भाषणात कोणते मुद्दे मांडायचे, स्वतःला स्मार्ट कसं बनवायचं हे सगळं मी लहानपणापासून बाबांना पाहूनच शिकले. एक गंमत सांगते. बाबा रोज त्यांची दिवसाची कामं एका डायरीत लिहून ठेवायचे. कामं झाली की रात्री तो कागद फाडून फेकून द्यायचे. मी ती सवय उचलली. मी आता माझी सगळी कामं फोन मध्ये लिहून ठेवते.
बाबांचा लोकसंग्रह अफाट! त्यांच्या निधनाला सोळा वर्षे झालीत! पण आजही संसदेत वा इतरत्रही लोकं त्यांच्या विषयी आदराने बोलतात. का बरं? नेता थोर तेव्हाच होतो जेव्हा तो चांगला श्रोता असतो. राजकारण आणि निवडणुका हे परस्पर मानवी संबंधांचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. पण मला हे सुरुवातीला कळतच नव्हतं. संयम कमी होता माझ्यामध्ये. मग मी पुढे स्वतःला समजवलं,”पूनम, लोकं प्रेमाने, आदराने आणि आशेने तुझ्याकडे बघतायत. प्रमोदजींची मुलगी म्हणून! तुलाही त्यांच्यासारखं लोकाभिमुख व्हायलाच हवं!”

३ मे २००६ रोजी बाबा गेले. पण त्या आधीचे बारा दिवस ते हॉस्पिटलमध्ये असताना लोकांनी त्यांच्यासाठी केलेल्या प्रार्थना… लोकांचे असंख्य फोन…, असंख्य मेसेजेस तेव्हा मला कळलं की राजकारण आपण समजतो तेवढ वाईट नसतं. लोकांना बाबांसारखी चांगली माणसं राजकारणात हवी असतात.

बाबा गेल्यानंतर मी राजकारणात प्रवेश केला. मला वाटलं होतं, बाबांच्या नावाच्या पुण्याईवर आपला हा प्रवास सोपा होईल! प्रमोद महाजनांची मुलगी आहे मी! थोडा अहं असतोच ना! त्यामुळे तशीच वागत होते. अरे ही सगळी आपलीच तर माणसं आहेत. रोज घरी येणारे काका, मामा! पण तेव्हा मला हे नाही कळलं की आता राजकारण हे “माझं” प्रोफेशन आहे, स्वतंत्र!

त्यामुळे त्या काळांत मी केलेल्या काही चुका आणि त्याचबरोबर हरलेली पहिली निवडणूक! ते अनुभव हे माझे राजकारणातले खरेखुरे “मेन्टॉर” झाले. त्या पहिल्या निवडणुकीत मी कच्ची होते. गाठीशी अनुभव नव्हता. कोणी मार्गदर्शक नव्हता. जनतेशी संवाद, त्यांची मानसिकता, जनतेच्या अपेक्षा, मानवी स्वभाव आणि नातेसंबंधांची जपणूक—– कशा कशाची अक्कल नव्हती. तुम्ही काही” रेडिमेड पॅकेज” नसता ना! शेवटी कितीही संस्कार असले, तरी काही गोष्टी तुम्ही स्वानुभवातूनच शिकता! माझे आडाखे फसले. अंदाज चुकले. मी २००९ च्या निवडणुकीत सपाटून हरले. माझे सहकारी मात्र जिंकले. तो जो माझा पाच वर्षांचा एकाकी काळ होता—–तो अपयशाचा काळ मला खूप काही शिकवून गेला. साधं उदाहरण. मी उद्घट नव्हते. पण स्पष्टवक्ती होते. पण त्यामुळे माझ्या पुरुष सहकाऱ्यांना माझ्या विरोधात माझ्या पाठीमागे बोलणं सोपं व्हायचं. कारण मुळांत स्त्रीने आक्रमक नसावं, तिने मृदूभाषी असावं अशा पुरुषी समाजाच्या अनेक भंपक अपेक्षा असतात. हे मला अनुभवातून कळत गेलं. तरीही खोटं बोलणं, शो ऑफ करणं, स्वतःच्या कामाचं मार्केटिंग करणं मला अजूनही जमत नाही आणि त्याचं मला शल्यही नाही.
आणखी वाचा : बीपी खूप वाढलंय…! मग आहार व जीवनशैलीत करा असे बदल

पण अपयशाच्या या अनुभवातूनच मला यशाचा मंत्र मिळाला.२०१४ सालची निवडणूक! मला मतदार संघ मिळत नव्हता आणि पक्षाला उत्तर मध्य मुंबई मतदारसंघासाठी चेहरा मिळत नव्हता. प्रमोदजी ईशान्य मुंबई मतदार संघातून निवडून आले होते. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून त्यांनी कधीच निवडणूक लढवली नव्हती. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ हा खरंतर काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ. असं असूनही मी त्या मतदारसंघातून लढण्याची तयारी दर्शवली आणि पक्षातील प्रमुख व्यक्तींना मी ठामपणे म्हटलं,”हार मेरी जीत आपकी!”एक मस्ती असते ना! तरीही काहींनी फोन करून मला सांगितलं,”बेटा तुम अपना पॉलिटिकल करियर दॉंवपे लगा रही हो. छोड दो! अगली बार लढो!”मी म्हटलं,”नहीं. मै यही से लढूंगी और जितूंगी भी!”एक तर मुळात मी धोका पत्करणारी,धाडसी व्यक्ती आहे.

त्यामुळेच मोदीजी आणि अमित शहा यांनी एक स्त्री असूनही माझ्यावर युवा मोर्चाची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून फार मोठी जबाबदारी टाकली होती. युवा मोर्चाचे अध्यक्षपद मिळणे, हे तुमच्या राजकीय भवितव्याचे फार मोठे संकेत असतात. मी अनेक राजकीय व बिगर राजकीय मान्यवरांचा माझ्या टीम मध्ये समावेश केला. अनेक तरुणांना मी नेतृत्वाचे धडे शिकवले. भरपूर नवे पायंडे पाडले. राजकारण हा एक पूर्णवेळाचा व्यवसाय आहे हे मी माझ्या कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवलं. ऑफिस पासून मतदारसंघापर्यंत सर्वत्र चोख व्यवस्था आणली. माझ्या मतदारसंघात बारा हजार स्त्रियांचा बचत गट महासंघ सुरू केला. अनेक तरुणांना प्रोत्साहित करून समाजसेवी संस्था सुरू केल्या.

आणखी वाचा : महिलांचे पित्त विकार आणि आहार

“ऑपरेशन ब्लॅक डॉट”यासारख्या चळवळीतून युवकांमधील मतदानाविषयीची उदासीनता दूर करण्याचा प्रयत्न केला. मोदीजींच्या “स्वच्छ भारत” अभियाना अंतर्गत “स्वच्छमेव जयते”ही टॅग लाईन देऊन स्वच्छता मोहीम धडाक्यात राबवली. अनेक शौचालयं बांधली. मला लोक”टॉयलेट एमपी” म्हणतात. भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळावी यासाठी अनेक भव्य जागतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं. त्या काळात संपूर्ण देशभर प्रवास केला.’ देश तसा वेश!’ नागालँड ,आसामला गेले तर तिथल्या स्त्रियांसारखा पेहराव करून त्यांच्यात मिसळले. दक्षिण भारतात भाजपचा प्रसार वेगाने व्हावा यासाठी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवलं. माझं हिंदी बंबईया होतं.”क्यू बे! तु क्या कर रहेला है” टाइप! मी माझी हिंदी भाषा प्रयत्नपूर्वक अस्खलित केली. सीएम वॉर रूममध्ये मी एकटी स्त्री खासदार होते. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या युथ लीडरशिप प्रोग्राम मध्ये माझी निवड करण्यात आली. फिक्कीच्या खासदारांच्या समूहात मी इंडो जपान आणि इंडो इस्रायलची चेअरमन आहे.

हे सगळं सहजगत्या घडलं नाही. बाबांच्या पश्चात मी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या प्रयत्नपूर्वक पार पाडत गेले. खासदारकीच्या दोन टर्म्सचा अनुभव गाठीशी असला तरी मी अजूनही शिकत आहे. अपयशातून सतत आत्मपरीक्षण करून जुन्या चुका टाळण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे.

बाबांची—-प्रमोद महाजनांची मुलगी म्हणून जे सामाजिक कार्याचे संस्कार माझ्या मनात मुरले, त्यांची अंमलबजावणी आता माझ्या राजकीय जीवनांत मी करत आहे. त्याचप्रमाणे अपयशाच्या दारुण अनुभवाने जी शिकवण मला दिली त्यातूनच २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुका मी मोठ्या मताधिक्याने जिंकले. प्रमोद महाजन या पित्याची लेक पूनम आणि राजकारणी प्रमोद महाजन यांची वारस खासदार पूनम महाजन असा बाबांचा दुहेरी वारसा मी आज जपतेय.

शब्दांकन -माधुरी ताम्हणे

madhuri.m.tamhane@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mentorship bjp leader poonam mahajan talk about father pramod mahajan and political career nrp
First published on: 29-09-2022 at 10:13 IST