प्रणिती सुशीलकुमार शिंदे
माझा राजकारणातला प्रवेश अजिबातच सुनियोजित नव्हता. त्यामुळे पप्पांकडून (सुशीलकुमार शिंदे) मी ठरवून राजकारणाचे धडे गिरवले असं मुळीच नाही झालं. मुळात मी कायद्याचं शिक्षण घेत असतानाच भारतीय प्रशासकीय सेवेच्या (IAS) परीक्षेची तयारी करत होते. दरम्यान ‘लॉ’च्या तिसऱ्या वर्षी मी सोलापूरमध्ये एक समाजसेवी संस्था सुरू केली. महिला आणि युवकांसाठी मी अक्षरशः गावोगावी फिरत काम करू लागले. त्यातूनच मला मनापासून वाटलं, की आपण राजकारणात यायला हवं. एखाद्या पदासाठी नव्हे, पण सामाजिक कार्य करता यावं म्हणून मी २००९ च्या निवडणुकीआधी वडिलांना सांगितलं, मला ही निवडणूक लढायची आहे. अर्थात राजकारणाची काहीही कल्पना नसताना निवडणूक लढणं आणि ती जिंकणं हे पप्पांमुळे सोपं झालं मला!
आणखी वाचा : मी दीपिका नाही पण… ट्रेन मध्ये दिसलेली ‘ती’, जगातील सर्वात सुंदर महिला!
अशा पद्धतीने मी राजकारणात ओढली गेले. विधानसभेत जेव्हा माझा प्रवेश झाला तेव्हा माझ्या लक्षात आलं, की विधानसभेच्या शेवटच्या बाकापासून पहिल्या बाकापर्यंत पोहोचण्याचा प्रवास किती कठीण असतो ते! माझ्या वडिलांनी तो केलाय आणि ते इथपर्यंत आले. बघा ना! गरिबीमुळे लहान वयात ‘बुढ्ढी के बाल’ विकणं, गुराढोरांशी संबंधित मागासवर्गीय समाजाचे पारंपरिक काम करणं, कोर्टात शिपाई म्हणून काम करणं इथपासून भारतासारख्या प्रचंड मोठ्या लोकशाही देशाच्या गृहमंत्रीपदापर्यंत आणि लोकसभेतल्या नेते पदापर्यंत पोहोचणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी एवढ्या निवडणुका लढणं आणि त्या जिंकणं हे अशा तळागाळातून आलेल्या माणसासाठी किती बरं अवघड असेल! आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पदांबरोबर लोकांची मनं जिंकणं. हेही ते इतकी वर्षं करत आहेत. आजपर्यंत त्यांनी एकही दिवस सुट्टी घेतलेली मला आठवत नाही. सतत लोकांमध्ये राहणं, त्यांच्यासाठी झोकून देऊन काम करणं हेच पाहिलंय मी. यापेक्षा वेगळं मेन्टॉरिंग ते काय असतं? म्हणून म्हणते, पप्पांनी मला समोर बसून ‘तय्यार’ केलं असं नाही झालं, पण त्यांच्या सहवासात असताना वेळोवेळी घडलेले प्रसंग, त्यांचा संघर्ष, त्या वेळची त्यांची शांत वृत्ती आणि कामाची पद्धत हे लहानपणापासून पाहिलं आहे. त्याचा माझ्यावर खूप खोल परिणाम झालाय.
आणखी वाचा : उपयुक्त : ‘बीबी क्रीम’ आणि ‘सीसी क्रीम’: फरक काय?
अर्थात लहानपणी ते माझे फक्त वडील होते, पण जेव्हा आपण स्वतः त्या क्षेत्रात येतो, तेव्हा कळतं, की राजकारणी म्हणून त्यांचा हा प्रवास किती अवघड, किती संघर्षमय आहे ते! ते दीड वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्या पदावरून दूर व्हावं लागलं तरी त्यांनी पुनश्च सत्ता खेचून आणली. पण तरीही ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत, सत्ता असूनसुद्धा! त्यानंतर त्यांची लगेच आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली; पण ते नाराज झाले नाही. मी सत्ता खेचून आणली आणि मलाच मुख्यमंत्रीपद दिलं नाही या विचाराने त्यांच्या जागी दुसरा कोणीही असता तर केवढा डिस्टर्ब झाला असता! पण मी हे जवळून पाहिलंय, की आजवर जे जे मिळालं ते ते त्यांनी आनंदाने घेतलं. उलट राज्यपाल पदावर राहून त्यांनी लोकांसाठी एवढं काम केलं, की आंध्र प्रदेशातली जनता कौतुकाने म्हणते, ते जनतेचे राज्यपाल आहेत. कुठल्या पदाची इच्छा न बाळगता पक्षाविषयी ते नेहमीच कृतज्ञता व्यक्त करतात की, ‘पक्षाने मला एवढं काही दिलंय, एवढं मोठं केलंय.’ त्यांच्याकडून मी हे खरंच शिकलेय, की राजकारण असो वा आपलं आयुष्य, कधी एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही, हवं ते आपल्याला मिळालं नाही, तरी समाधानानं, हसतमुखानं पुढे जायचं.
मी स्वतः निवडणुकीत पराभव नाही पाहिला, पण पप्पांना पराभव पचवताना पाहिलंय. २०१४ च्या निवडणुकीत पहिल्यांदा त्यांचा पराभव झाला, तेव्हाही मी पाहिलं, की ते अत्यंत शांत होते. ‘ठीक आहे. ही लाट विचित्र आहे. जे झालं ते झालं.’ इतक्या शांत शब्दांत त्यांनी परिस्थिती स्वीकारली आणि दुसऱ्या दिवसापासून पुन्हा लोकांसाठी कामं करू लागले. वास्तविक मोठमोठी पदं, प्रतिष्ठा, मानसन्मान सहज डोक्यात जाऊ शकतो; पण ते नेहमीच ‘जमिनीवर’ असतात. त्यांनी गरिबी पाहिलीय. त्याचा ते रोज उल्लेख करतात. आपण कुठून कुठे आलो आहोत, याची कृतज्ञ जाणीव त्यांच्या मनात असते आणि ती त्यांच्या वागण्यातही दिसते. साधी गोष्ट! आपल्या घरी काम करणारी माणसं, आपला स्टाफ, त्यांच्याबद्दल कायम करुणा, प्रेम त्यांच्या मनात असतं. त्यांच्यावर रागावलेलं मी पप्पांना कधीही पाहिलेलं नाही. उलट ते नेहमी म्हणतात, ‘माझीही सुरुवात अशीच झालीय! त्यामुळे त्यांचा संघर्ष, ताण मला चांगला कळतो.’
आणखी वाचा :
त्यांची ही दयाबुद्धी माझ्यातही उतरलीय, अगदी नकळतपणे! खूप वेळा आजारी मुलांना घेऊन त्यांचे आईवडील आमच्याकडे येतात. त्या वेळी मला स्वतःला खूप असहाय्य वाटतं, की आपण त्यांच्यासाठी फार काही करू शकत नाही. अशा वेळी थोडंसं नियमांच्या चौकटीबाहेर जात, आमदार फंडापलीकडे जाऊन मी पैसे गोळा करून त्या मुलाच्या उपचारांसाठी देते. मध्यंतरी आमच्याकडे नाना पटोलेजी आले होते. त्यांचं चॉपर होतं. ते निघणार तेवढ्यात एका लहान मुलीला घेऊन तिचे आई-वडील रडत रडत आले. त्या मुलीच्या हृदयाला छिद्र होतं. तिला श्वास घेणं जड जात होतं. मी पटोलेसाहेबांच्या हेलिकॉप्टरमधून त्या मुलीला तातडीने मुंबईला उपचारासाठी पाठवलं. त्या वेळी त्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर जे आनंदाचे भाव मी पाहिले, खरंच इतकं बरं वाटलं मला. ही आत्मस्तुती नाही, हे आई-वडिलांचे संस्कार आहेत जे मी माझ्याही नकळत टिपलेत.
आणखी वाचा : असे का होते, समजून घ्या! गरोदर असल्याचे कळले आणि… ४८ तासांत बाळही जन्मास आले
मी माझा आमदारकीचा पगार कधीच स्वतःसाठी वापरत नाही. तो रुग्णांसाठी गोळ्या, औषधं, शस्त्रक्रिया यातच खर्च करते. खूप वयस्कर लोक माझ्या ऑफिसपर्यंत दूरदुरून येतात. मी त्यांना प्रेमाने बसवते. दूध, फळ, नाश्ता द्यायला लावते. अशा वेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मला खूप समाधान वाटतं. माझा मूळचा स्वभाव थोडा रागीट आहे, पण मी पप्पांकडून त्यांची समतोल, शांत वृत्ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करते. ते आपलं काम नेहमीच शांतपणे करत असतात. कुठला वादंग नाही. वादविवाद नाही. काही काही नाही. आम्ही पाहातो ना, लोकं कुठून कुठून त्यांना भेटायला येतात. लोकांमधूनच त्यांना जणू काही ऊर्जा मिळते. मी महाराष्ट्रभर फिरते. प्रवासात लोक सांगतात, ‘सुशीलकुमारजी शिंदे आम्हाला खूप आवडतात. आम्ही त्यांना खूप मानतो.’ छान वाटतं ऐकताना.
आणखी वाचा : मराठी अभिनेत्रींनी बोल्ड सीन दिले म्हणून त्यांचे कुटुंबीय दोषी कसे?
बाबांच्या या ‘गुडविल’चा मला खूप फायदा होतो. कधी कधी मला वाटतं, त्यांच्याकडून किती गोष्टी शिकण्यासारख्या आहेत! त्यांची साहित्याची जाण, वाचनाची प्रचंड आवड त्यासाठी ते एवढ्या व्यग्र आयुष्यातून वेळ काढतातच. अलीकडेच त्यांनी रावसाहेब कसबे यांनी लिहिलेलं महात्मा गांधीजींवरील ‘पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा’ हे भलं मोठं पुस्तक एका आठवड्यात वाचून संपवलं. मी खरंच अचंबित होते त्यांचा व्यासंग पाहून! मला वाटतं, मला कधी जमेल असं?
आणखी वाचा : विवाहपूर्व मार्गदर्शन : असुरक्षित सेक्सचे धोकेच अधिक
पप्पांसारखं माझ्या मतदारसंघातल्या माणसांसाठी मीसुद्धा झोकून देऊन काम करण्याचा प्रयत्न करते; अगदी मनापासून! कारण मी माझ्या मतदारसंघातल्या लोकांकडूनही खूप काही शिकते. तेही एक प्रकारे मेन्टॉरच आहेत ते माझे. माझा मतदारसंघ कष्टकरी कामगार वर्गाचा आहे. एवढ्या विविध जाती-जमातींचे लोक माझ्या मतदारसंघात आहेत. उलट मी ज्या जातीची आहे ते जातीबांधव तिथे खूप कमी आहेत; पण मला ‘कास्टकार्ड’ मुळी कधी खेळावं लागलंच नाही. तसं माझ्या मनातसुद्धा कधी आलं नाही. मी ओपन सीटवर तीन वेळा निवडणूक लढले आणि जिंकले. कामाची ताकद मला माझ्या मतदारसंघाने दाखवली. ती कशी दाखवली ठाऊक आहे? तिसऱ्या निवडणुकीत मोठी लाट होती. सगळीकडे उलटे वारे वाहत होते. सगळ्यांना चिंता होती. म्हटलं, मी जनतेची नाडी नक्की ओळखेन. तुम्ही काळजी करू नका. मी अक्षरशः घरोघरी फिरले. जातीची समीकरणं शेवटी असतातच ना! त्यांत माझ्या विरोधात एवढी पुरुष मंडळी होती. राजकारणात स्त्रियांचं स्थान काय असतं सगळ्यांना ठाऊकच आहे. असं असूनही मी तिसऱ्या वेळी विधानसभेत निवडून आले. अनेकदा तर माझ्या मतदारसंघातल्या बायका मतावरून घरी नवऱ्याशी भांडण करत; पण मला मत देत. मला सांगत, …..मत मात्र आम्ही तुम्हालाच देणार.
आणखी वाचा : नातेसंबंध : शिक्षक नव्हे… टकल्या नि सडकी?
माझी ही साधीसुधी माणसं मला खूप शहाणपण शिकवून जातात. पप्पांप्रमाणे मलाही त्यांच्यापासूनच कामाची प्रेरणा मिळते. मी त्यांच्यात मिसळते तेव्हा मनाने मी वेगळ्या झोनमध्ये जाते. ते नेमक्या शब्दांत नाही सांगता येणार! मला नेहमी वाटतं, माझ्या लोकांना अडीअडचणीच्या वेळी माझा उपयोग होत नसेल, तर मी तीन वेळा आमदार होऊन काय उपयोग? पप्पांना माझी ही कमिटमेंटची भावना खूप आवडते.
मला प्रामाणिकपणे वाटतं, कर्ताकरविता ‘तो’ वर बसलाय! आपण फक्त जनतेच्या सेवेचं एक माध्यम आहोत. माध्यम म्हणून जेवढं करता येण्यासारखं आहे, तेवढं आपण प्रामाणिकपणे करायचं! बस्स!
madhuri.m.tamhane@gmail.com