सुप्रिया सुळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेन्टॉरिंग ही अत्यंत गुंतागुंतीची आणि ऐच्छिक संकल्पना आहे. आता माझ्यापुरतं बोलायचं तर ‘उत्तम ते सर्वोत्तम’ असा माझ्या आयुष्याचा निरंतर प्रवास सुरू आहे. या प्रवासात माझी शिकण्याची, नवं काही आत्मसात करण्याची भूक कधी शमतच नाही. सतत नवी नवी क्षितिजं मला खुणावत असतात.
माझं भाग्य असं, की आयुष्याच्या या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर मला अनेक मेन्टॉर्स लाभले. असे मेन्टॉर्स ज्यांनी त्यांच्या अनुभवातून मला वेळोवेळी योग्य आणि अयोग्य काय याचं मार्गदर्शन केलं. शेवटी भल्याबुऱ्यातलं नेमकं अंतर शिकवतो तोच खरा मेन्टॉर! मला नेहमी वाटतं, की ज्याला ज्या विषयातलं ज्ञान आपल्यापेक्षा जास्त आहे, त्याला मार्गदर्शकाची जागा देऊन त्याच्याकडून ते ज्ञान संपादन करावं.

आणखी वाचा : अब्दुल सत्तारांना खुलं पत्र: महिलांना शिवीगाळ करण्यात कसला आलाय पुरुषार्थ ?

शाळकरी वयात अर्थात शाळेतले शिक्षक माझे आदर्श होते. नॅचरल असतं म्हणा ते! पुढे मात्र माझ्यावर ‘युनिफॉर्म’ची भुरळ पडली. मग गणवेशातले लष्करी अधिकारी, पोलीस अधिकारी किंवा अगदी अग्निशमन दलातले जवानसुद्धा मला सुपर हिरो वाटत. आपणही त्यांच्यासारखं ‘ग्रेट’ व्हावं असंच मला वाटे. त्या शाळकरी वयात माझी आई मला टेनिस, बॅडमिंटन, स्वीमिंगच्या क्लासला नेत असे. क्रीडा विश्वातल्या माझ्या गुरूंकडून मी हे आवर्जून शिकले, की यशाला शॉर्टकट नसतो. कष्टाला पर्याय नसतो. खरंतर हे सगळं शिकणं, वेगवेगळे गुण आत्मसात करणं हे अतिशय अजाणतेपणाने होत असतं. समाज व्यवस्थेतूनच हे सगळं आपण टिपत जातो, तसतसा आपल्या व्यक्तिमत्त्वावर त्याचा सखोल परिणाम होत जातो.
वय वाढतं, तसं अनुभवांचं विश्व बदलतं आणि मेन्टॉरची गरजसुद्धा बदलते.

आणखी वाचा : यशस्विनी : ‘ती’ सांगतेय, करिअर- विदेशातील शिक्षणाचा समृद्ध करणारा अनुभव (पूर्वार्ध)

कॉलेज विश्वात मी पाय टाकला तेव्हा अर्थातच स्वप्नाळू जगातून मी वास्तवात पाऊल टाकलं. त्याकाळात जी मंडळी आयुष्यात आली, त्यांनी मला नेमकं मार्गदर्शन केलं, की मी कॉलेज कोणतं घ्यावं, भाषेचं माध्यम कोणतं निवडावं, अप्टीट्यूड टेस्ट कधी द्यावी, त्यानुसार कोणता अभ्यासक्रम निवडावा अशा अनेक गोष्टी. अगदी मी कोणती पुस्तकं वाचावी, कोणती वाचू नये, भाषा सुधारण्यासाठी कोणती वर्तमानपत्रं व मासिकं मी वाचावी, कोणते सिनेमे मी पाहावे, हे सांगणारे ‘करिअर गाईड’सुद्धा माझ्या आयुष्यात आले. त्यांनी वेळोवेळी मला योग्य दिशा दाखवली.

आणखी वाचा : यशस्विनी : ‘ती’चे रूग्णांना सहाय्यकारी संशोधन (उत्तरार्ध)

इथे मी आवर्जून उल्लेख करेन तो जयसिंहराव पवार यांचा! ते इतिहासकार आहेत. शाहू महाराजांच्या जीवनाचा दांडगा अभ्यास, व्यासंग आहे त्यांचा! प्रेरक ऐतिहासिक साहित्याचं वाचन करण्याचे मार्गदर्शन ते मला नेहमी करतात. अशा अनेक मार्गदर्शकांनी माझं आयुष्य समृद्ध केलय. आजही करत आहेत. पुढे मात्र आयुष्यात एका विशिष्ट स्थानी पोहोचलं, की आपण स्वतःच स्वतःचं परीक्षण करू शकतो आणि आपल्याला नेमकं कशासाठी आणि कोणाकडून मेन्टॉरिंग घ्यावं ते कळू लागतं. हा मात्र आपला पूर्णपणे स्वतंत्र आणि खासगी निर्णय असतो.

आणखी वाचा : वयाच्या तिशीमध्ये नवरा मी गमावला, पण तुम्ही मात्र…

बाय द वे, आय हॅव अ लाइफ कोच! माझ्या ‘लाईफ कोच’ने कौटुंबिक व सार्वजनिक जीवनात नेतृत्वगुण जोपासण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या सहसंवेदनेची जपणूक कशी करावी, सर्वांना समान वागणूक देऊन, समोरच्या व्यक्तीचा आत्मसन्मान कसा जपावा अशा अनेक चांगल्या गोष्टींचा आदर्श वस्तुपाठ माझ्याकडून गिरवून घेतला. लाइफ कोच म्हणजे कुणी एकच विशिष्ट व्यक्ती असते का? तर नाही. अहो, कधी कधी आपली मुलंसुद्धा आपल्याला किती शिकवून जातात! एखाद वेळेस मी पटकन काही बोलून जाते. अनेकदा माझ्या ते लक्षात येतंच असं नाही. अशावेळी माझी मुलगी किंवा मुलगा माझ्या लक्षात माझी चूक आणून देतात. “मम्मा, तुझा स्वर रागीट होता. असं बोलणं बरोबर नाही!” मी म्हणते, “नाही. माझा तसा उद्देश नव्हता.” ठीक आहे. मग मी कोणाशीही बोलताना सावधपणे बोलते. आपल्या सार्वजनिक जीवनातील वर्तनात शुचिता यावी, यासाठी मुलं, पती यांचं असं परखड मार्गदर्शनसुद्धा गरजेचं असतं.

आणखी वाचा : ‘त्यांच्या’ चष्म्यातून आम्ही

अर्थात दरवेळी मेन्टॉर आपल्यापेक्षा वयाने व अनुभवाने मोठाच असतो वा असावा असं काही नाही. आता हेच बघा ना! मला जंगलात जायची खूप आवड आहे. अनुज खळे या निसर्गप्रेमी लेखकाने ‘लोकसत्ता’मध्ये एक अप्रतिम लेख लिहिला होता. त्यानिमित्ताने ताडोबाच्या जंगलात माझी त्यांच्याशी ओळख झाली. आज ते निसर्गभ्रमंती व वन्य जीवनातील माझे मोठे मार्गदर्शक आहेत, मात्र वय आणि अनुभवांचं थोरपण अंगी असलेले गौतमजी बजाज यांचं माझ्या आयुष्यातलं स्थान फार मोठं आहे. तसंही मी विनोबा भावे यांची भक्तच आहे म्हणा ना! मी नेहमी पवनार आश्रमात जाते. तिथे गांधीवादी चळवळीतले अर्ध्वयु गौतमजी बजाज यांच्याशी चर्चा करते. त्यांनी आपलं अवघं आयुष्य विनोबाजी आणि त्यांच्या कार्याला समर्पित केलंय. ते भूदान चळवळीत सक्रिय होते. ते महात्मा गांधीजींनाही भेटलेत. त्यांच्या माध्यमातून आणि विनोबाजींच्या साहित्याच्या अभ्यासातून मी या थोर विभूतींना समजून घेण्याचा प्रयत्न करते. आज ज्या स्वातंत्र्याचा आपण उपभोग घेतोय, ते ज्यांच्या योगदानातून लाभलेय अशा महान व्यक्तींसोबत आयुष्य वेचलेले गौतमजी बजाज हे माझे खऱ्या अर्थाने सामाजिक जीवनाचे मेन्टॉर आहेत.

आणखी वाचा : Open Letter: गौतमी पाटील, तुला हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्राचा बिहार करु नकोस!

आता तुम्ही म्हणाल, शरदजी पवार आणि प्रतिभाताई पवार यांच्या एकुलत्या एक कन्येचं मेन्टॉरिंग घरातच झालं असेल! हो. खरंय ते! पण हे मेन्टॉरिंग अतिशय अजाणता झालंय. आईने माझं व्यक्तिमत्त्व फुलवण्यासाठी खूप कष्ट घेतलेत. पण म्हणून त्याचा जाहीर उल्लेख करणं, तिलाही आवडणार नाही आणि मलाही! आपण इतके काही परके नाही आहोत आई-वडिलांसाठी, बहीण भावांसाठी, कुटुंबीयांसाठी की त्यांच्याविषयी औपचारिक काही बोलावं. त्यांचं मार्गदर्शन गृहीतच धरलेलं असतं ना!

आणखी वाचा : राधिका आपटे- बळ आणि प्रेम देणारे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणीही!

पण आमच्या घरातली एक गंमत सांगते तुम्हाला. मी माझ्या आई-वडिलांना नेहमी चिडवते, की नशीब, माझ्यात मुळातच पुरेपूर आत्मविश्वास आहे, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. कारण ते नेहमी माझ्यावर टीकाच करतात. ‘आज पार्लमेंटमध्ये तुझं भाषण चांगलं झालं’ किंवा ‘तू हे फार चांगलं काम केलंस’ असं कधीही मी त्यांच्या तोंडून ऐकलं नाहीए. उलट ते जर असं बोलले तर कदाचित मलाच आश्चर्य वाटेल! हां. पण कधीतरी तोंडातून एखादा वावगा शब्द गेला, तर मात्र लगेच ती चूक दाखवणार. सुधारणार आणि म्हणणार, या शब्दाऐवजी अमुक शब्द वापरला असतास तर जास्त योग्य झालं असतं ना! याउलट, त्यांचं असं वागणं दाखवून दिलं ना, तर मात्र बिलकूल मान्य करत नाही, ते सगळं मजेतच घेतात आणि त्यावर आम्ही खूप हसतोही. मी सुद्धा त्यांचं हे वागणं अत्यंत खिलाडूपणे घेते. इतकं आमचं नातं पारदर्शक आणि मनोहर आहे.

आणखी वाचा : पुरुषांना मोकळ्या विचारांची मैत्रीण चालते, पण मग बायको का नाही?

आजवर माझ्या वडिलांनी मला फार कमी वेळा सल्ले दिलेत. अभ्यासापासून करिअरपर्यंत कोणत्याही गोष्टीची माझ्यावर सक्ती केली नाही. जेवढे मार्क्स पडले. चला! आनंद आहे. मी कधी म्हटलं, की तुम्ही कधीच अभ्यासासाठी मला ‘पुश’ का नाही केलंत हो? तर ते हसतात आणि म्हणतात, “अगं जेवढी तुझी बुद्धिमत्ता आहे तेवढे मार्क्स तुला मिळणारच ना!” तर एरवी असे निवांत असणारे माझे वडील! त्यांनी मला आयुष्यात एक परमोच्च मोलाचा सल्ला दिलाय. मी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून गेले, तेव्हा पार्लमेंटच्या पायऱ्या चढताना वडिलांनी एक गोष्ट सांगितली. “हे बघ पार्लमेंटच्या या मुख्य इमारतीच्या पायऱ्या चढताना प्रत्येक वेळी एक गोष्ट लक्षात ठेव, की ही संधी तुला बारामती लोकसभा मतदारसंघाने दिलीय. त्यामुळे जितकी वर्षं तू तुझ्या मतदारसंघातल्या लोकांविषयी विश्वास, सन्मान आणि कृतज्ञता मनात बाळगशील तोपर्यंतच तू या पायऱ्या चढू शकशील!” खरं सांगते, प्रत्येक वेळी त्या पायऱ्या चढताना त्यांचे हे शब्द माझ्या मनात उमटत असतात! आईवडिलांचे असे अनेक शब्द माझ्या आयुष्यात दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरले आहेत.

madhuri.m.tamhane@gmail. com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mentorship supriya sule in life journy i have many metors sharad and pratibha pawar vp
First published on: 10-11-2022 at 07:42 IST