जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ सुविधांची नव्हे, तर प्रबळ इच्छाशक्तीची गरज असते हे आसामच्या १९ वर्षीय मोनिका सोनोवाल हिने सिद्ध करून दाखवले. छत्तीसगडमध्ये आयोजित पहिल्या खेलो इंडिया ट्राइबल गेम्स २०२६ (KITG 2026) मध्ये मोनिकाने वेटलिफ्टिंगच्या ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला. हे सुवर्णपदक केवळ एका खेळाडूचा विजय नसून, ते गरिबी, शारीरिक वेदना आणि प्रतिकूल परिस्थितीवर मिळवलेला विजय आहे.

मोनिकाचा प्रवास आसामच्या धेमाजी जिल्ह्यातील बटघोरिया पेनबेनी चौक या अत्यंत दुर्गम आणि छोट्या भागातून सुरू झाला. ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तर तीरावर वसलेल्या या भागात जीवन अत्यंत संथ आणि संघर्षाने भरलेले आहे. येथे राहणाऱ्या कुटुंबांची स्वप्ने सहसा कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबून जातात.

मोनिकाचे वडील पद्मधर सोनोवाल हे गवंडी आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते दिवसरात्र बांधकामाच्या ठिकाणी मजुरी करतात. ज्यावेळी मोनिका राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकलं होतं, त्यावेळी तिचे वडील गुवाहाटीपासून ४२५ किमी दूर एका बांधकाम साईटवर काम करत होते. आपल्या मुलीच्या या ऐतिहासिक कामगिरीची बातमी सांगण्यासाठी मोनिकाने त्यांना फोन केला, पण कामात व्यस्त असल्याने वडिलांशी बोलणे झाले नाही.

मोनिकाच्या वेटलिफ्टिंग प्रवासाला सुरुवात झाली ती ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू यांच्याकडे पाहून. मीराबाईंच्या संघर्षातून प्रेरणा घेत मोनिकाने वेटलिफ्टिंगच्या बारबेलला आपल्या जीवनाचा आधार बनवले. सुरुवातीला तिच्याकडे मर्यादित संसाधने होती, तरीही खेळाप्रती तिची जिद्द कमी झाली नाही.

तिने सुवर्णपदक मिळवले, पण हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. गेल्या तीन महिन्यांपासून मोनिका उजव्या गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. सराव सत्रादरम्यान झालेली ही दुखापत इतकी गंभीर होती की, तिच्या प्रशिक्षकांनी तिला खेलो इंडिया ट्राइबल गेम्समध्ये सहभागी न होण्याचा सल्ला दिला होता. पुढील धोका टाळण्यासाठी तिला विश्रांतीची गरज होती, पण मोनिकाच्या मनात काहीतरी वेगळेच विचार सुरू होते.

तिने वेदना सहन करत रिंगणात उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला. मोनिकाच्या मते, अशा मोठ्या स्पर्धांची संधी वारंवार मिळत नाही. मला ही संधी गमावायची नव्हती. भविष्यात पुन्हा कधी संधी मिळेल ते सांगू शकत नाही. तिची ही मानसिक कणखरता आणि दृढ निश्चयच, खेळाप्रतीचे प्रेमच तिला इतर खेळाडूंपेक्षा वेगळे ठरवते. धीमाजी सिटी कॉलेजमध्ये बीएच्या द्वितीय वर्षात शिकणारी ही विद्यार्थिनी केवळ शारीरिक ताकदीवर नव्हे, तर आपल्या मानसिक बळावर सर्वोच्च शिखरावर पोहोचली.

मोनिकाच्या या प्रवासात तिला सहकार्य मिळाले ते स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे. तिची मेहनत पाहून इटानगर येथील नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये निवड झाली. तिथे तिला दर्जेदार पशिक्षण, पोषक आहार आणि वैद्यकीय सुविधा मिळाल्या. खासकरून तिच्या गुडघ्याच्या दुखापतीवर उपचार करण्यात या केंद्राचा मोठा वाटा राहिला आहे. जर का तिला मार्गदर्शन, सुविधा मिळाल्या नसत्या तर इतक्या मोठ्या स्तरावर कामगिरी करणे अशक्यच होते असे ती स्वत: कबूल करते.

मोनिकाने आजवर आंतरशालेय, आंतरमहाविद्यालय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीयस्तरावर अनेक मेडल्स मिळवले आहेत. आता खेलो इंडिया ट्राइबल गेम्समध्येसुद्धा सुवर्णपदक मिळवल्याने तिचा आत्मविश्वास वाढला आहे. भविष्यात आशियाई क्रीडा स्पर्धा, कॉमनवेल्थ, ऑलिम्पिकसारख्या जागतिक स्तरावरच्या स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक मिळवून देशाचा तिरंगा जागतिक स्तरावर फडकवण्याचे तिचे स्वप्न आहे.

मोनिकाने सुवर्णपदक मिळवून आदिवासी कचारी जमातीतील या मुलीने आपल्या कामगिरीने जगाचा आपल्या समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून टाकला आहे.