युपीएससी परीक्षा ही भारतातील प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक समजली जाते. हल्लीची तरुण पिढी ही परीक्षा क्रॅक करून ऑफिसर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगतात. यासाठी लाखो तरुण-तरुणी नशीब आजमावत असतात. ते दिवसाचे अठरा-अठरा तास अभ्यास करत असतात. तरीही यांपैकी मोजकेच जण ही परीक्षा उत्तीर्ण होतात. अर्थातच आयएएस बनणारे समाजासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतात. या परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस बनणाऱ्यांमध्ये आता मुलींची संख्याही लक्षणीय आहे. आज आपण अशाच एका मुलीची कहाणी पाहणार आहोत जिचे स्वत:चे डॉक्टर बनण्याचे स्वप्न असतानादेखील तिने एमडीएसचे शिक्षण अर्धवट सोडून वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा विडा उचलला आणि ते स्वप्न सत्यातदेखील उतरवलं. वडिलांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या या मुलीचं नाव आहे मुद्रा गैरोला. त्यांचं बालपण जडणघडण उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील कर्णप्रयाग मधील. मुद्रा ही लहानपणापासूनच अभ्यासात अव्वल राहिली आहे. १० वी बोर्ड परीक्षेत ९६ टक्के तर १२ वी बोर्ड परीक्षेत ९७ टक्के मिळवले होते. त्यावेळी तिचा सत्कार तिचे प्रेरणास्थान असलेल्या आणि देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी राहिलेल्या किरण बेदी यांच्या हस्ते करण्यात आला होता. पुढे तिने मुंबईमध्ये बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीसाठी (BDS) प्रवेश घेतला. यामध्येही तिने आपल्या हुशारीने मेहनतीने गोल्ड मेडल मिळवले. पुढे तिने मास्टर ऑफ डेंटल सर्जरीसाठी प्रवेश घेतला. तिच्या वडिलांचे स्वप्न होते की, आपल्या मुलीने आयएएस अधिकारी बनावे. पण त्यांनी त्यासाठी तिच्यामागे कधीच तगादा लावला नाही. एक दिवस तिनेच वडिलांचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी एमडीएसचे शिक्षण अर्धवट सोडले व युपीएससीच्या तयारीला लागली. वडिलांचे अर्धवट राहिलेले स्वप्न म्हणजे मुद्रा यांचे वडिल अरुण गैरोला यांना स्वत:ला आयएएस अधिकारी बनायचं होतं. त्यांनी १९७३ साली युपीएससीची परीक्षा दिली होती, पण त्यांना यश आले नाही. म्हणून त्यांचं स्वप्न होतं की आपल्या घरातून एकतरी आयएएस अधिकारी झाला पाहिजे. वडिलांचं हेच अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुद्राने आपले मेडिकलचे शिक्षण अर्धवट सोडून युपीएससीच्या तयारीत स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले. आणखी वाचा-Yashashree Shinde : प्रिय यशश्री, …तर तू वाचली असतीस गं! त्यानंतर मुद्राने २०१८ मध्ये पहिल्यांदा युपीएससी परीक्षा दिली. त्यात ती पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन ग्रुप इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचली. पण निवड झाली नाही. तिने पुन्हा २०१९, २०२० मध्ये युपीएससी परीक्षा दिली तेव्हाही पदरी अपयशच आले. तरीही तिने हार न मानता पुन्हा २०२१ मध्ये परीक्षा दिली. अखेर तिच्या मेहनतीला यश आले. आणि १६५ वी रँक मिळवत ती आयपीएस अधिकारी झाली. आयपीएस अधिकारी झाली तरी वडिलांचे स्वप्न होते की आयएएस अधिकारी बनायचे त्यामुळे तिने पुढे प्रयत्न चालू ठेवून पुन्हा एकदा युपीएससीची परीक्षा दिली व २०२२ मध्ये ५३ वी रँक मिळवून आयएएस अधिकारी बनली व वडिलांचे अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण केले. आपलं स्वप्नं लेकीने पूर्ण केल्याने अरुण गैरोला यांना आकाश ठेंगणं झालं आहे. यासाठी वडिलांना ५० वर्षे वाट पाहावी लागली. आजपर्यंत आपण ऐकत आलो आहोत की वडिलांचे स्वप्नं मुलाने साकार केले.