रविवार असल्याने तसा निवांत वेळ मिळाला होता. मग जरा आवराआवर करुन ठेवली. पार्लरमध्ये जाऊन मस्त हेअरकट, फेशिअल वगैरे नट्टापट्टा करुन घरी आली. थोड्यावेळाने एका मैत्रिणीचा फोन आला. तिने पटकन मला विचारलं, अग सावी, काय करतेयस? जरा माझ्यासोबत येतेस का? मी हो… ना.. असं करत करत तिला होकार कळवला. पटकन एक वनपीस काढून तयार झाली. आम्ही ठरल्याप्रमाणे नेहमीच्या जागेवर भेटलो. छान शॉपिंग वगैरे केलं आणि मी संध्याकाळी घरी जायला निघाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वांद्र्यावरुन घरी जायचं म्हणून मी लोकल पकडली. संध्याकाळी ७.१५ ची लोकल होती… रविवार असल्याने तशी गर्दी कमी होती, त्यातच अगदी विंडोसीट मिळाली आणि मला हायसं वाटलं. काही वेळाने खार स्टेशनवर दोन बायका त्या ट्रेनमध्ये चढल्या. त्या दोघीही एकमेकींच्या खास जीवलग मैत्रिणी असाव्यात. त्यातील एकीच लग्न झालं होतं, तर दुसरी मात्र अविवाहित होती. त्यांच्या बोलण्यातून मला ते जाणवलं. बरं त्या दोघीही छान विविध विषयांवरच्या गप्पा मारत होत्या. एवढ्यात एक ज्वेलरी विकणारी बाई तिकडे आली आणि तिने ताई घ्या ना… असा आग्रह केला. मी तिचा तो आग्रह न थांबवता एक दोन इअरिंग खरेदी केले. त्यानंतर त्या दोघीही बराच वेळ कुजबूज करत होत्या.
आणखी वाचा : ….अन् तेव्हा ती बाहुलीसारखी नटलेली दिसेल

मी हेडफोन न काढता आवाज कमी करुन त्यांचं बोलण ऐकत होती. त्यातील एकीने दुसरीला प्रश्न विचारला, “काय गं… सहा महिने झाले ना तुमच्या लग्नाला, कसं सुरु आहे सर्व…. लग्न मानवतं की नाही… सासू त्रास वगैरे देत नाही ना…?” असे प्रश्न विचारले. त्यावर ती म्हणाली, ‘बाकी सर्व ठिक आहे गं… पण माझी सासू जरा अतीच आहे. तिला प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी लागते. अगदी एक-दोन मिनिटही लेट झालेला तिला चालत नाही. सकाळी घड्याळ्याच्या ठोक्यावर उठायचं आणि रात्री वेळेत झोपायचं. हे आमच्या घरी ठरलेलं आहे. यापेक्षा माहेर बरं असं वाटतं. तिकडे निदान ही बंधन तरी नव्हती.’

यावर लग्न न झालेली मैत्रीण खुदकन् गालात हसली. ‘तुलाच लग्न करायची घाई होती ना…कर अजून? म्हणून मी लग्न करत नाही. बरंय नको तो त्रास, फुकटची कटकट आणि वैताग कोण सहन करेल…आपण छान ऐशोआरामात जगायचं.’ त्यावर ती म्हणाली, ‘असूदे… आज नाही, पुढच्या दोन-तीन वर्षात तुला पण लग्न करावंच लागणार आहे. तेव्हा काय करशील.?’ ‘छे बुवा.. मी मुंबईच्या बाहेर पार परदेशातला नवरा शोधणार आहे. ज्याच्याकडे सर्व गोष्टी नोकर-चाकर असले पाहिजेत. आपण फक्त हुकूम द्यायचे बस्स…’

आणखी वाचा : कधीतरी आयुष्यात राणीसारखं ऐशोआरामात जगायला मिळायला हवं….! स्त्रियांच्या मनातला बोलका प्रश्न

यावर लग्न झालेली मैत्रीण हसत म्हणाली ‘अगं नको… ते तर फार भयानक असतं.’ परवा आमच्या सासूबाई शेजाऱ्यांकडे गेल्या होत्या. तेव्हा त्यांनी मला एक किस्सा सांगितला. आमच्या शेजारी ज्या माने काकू राहतात ना…. त्यांच्या काकाच्या मुलीच्या मैत्रिणीचा..! तिचे लव्हमॅरेज झाले होते. नवरा छान शिकलेला, दिसायला सुंदर, सर्व काही दृष्ट लागण्यासारखे होते. जेव्हा त्यांचं लग्न ठरलं तेव्हा त्यांच्याकडे परदेशात लंडनमध्ये दोन-चार नोकर होते. पण लॉकडाऊननंतर तिकडची परिस्थितीच बदलली. जेवण करण्यासाठी साधा कूक मिळेना. म्हणून मग त्याने लग्न करण्याचं ठरवलं.

पहिला लॉकडाऊन संपल्यावर रजिस्टर पद्धतीने दोघेही विवाहबंधनात अडकले. ती मुलगी आता परदेशात असते. पण बिचारी तिकडेही जाऊन चूल आणि मूल सांभाळते. परदेशात जाऊन एन्जॉयमेंट म्हणून तिला काही करता आलं नाही. तिकडे गेली तेव्हा लॉकडाऊन सुरु होतं. त्यात नवऱ्याचं वर्क फॉर्म होम असल्याने हिलाच घरातली सर्व काम करावी लागत होती. भरीस भर म्हणून की काय तर तिचे सासू सासरेही तिकडे होते. त्यांचंही सर्व हिलाच करावं लागायचं. बिचारी परदेशात अडकली. पण लव्ह मॅरेज, नवरा आणि सासू सासरे चांगले असल्याने निभावलं तिने.. अन् जळलं आमचं नशीब!

आणखी वाचा : Indian Myths and Facts about Menstruation : मासिक पाळी, सण अन् ‘ती’!

त्यांच्या या गप्पा रंगात आलेल्या असताना लोकलमध्ये अनाऊन्समेंट झाली. पुढील स्टेशन ‘नालासोपारा…’ मी दोन मिनिट स्वत:ला सावरले. अरे देवा, नालासोपारा आलं देखील… वेळ कसा गेला समजलंच नाही. एरव्ही मी ज्या मालिका, चित्रपटात रमून जाते. ती आता मात्र प्रत्यक्ष महिलांच्या बोलण्यात गुंग झाली होती. या दोघींच्या बोलण्यात फार सच्चेपणा होता. बर त्यात कोण चूक, कोण बरोबर हा वाद मला घालायचा नाही. पण दोघींनाही एकमेकींबद्दल फार काळजी होती. लोकलमधून उतरत असताना सहज हेडफोनचा आवाज मोठा केला तर त्यावर अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या झिमा चित्रपटाचा डायलॉग कानावर पडला, “बडबड बडबड, थकतच नाहीत रे, या बायका..!”

हा डायलॉग, त्या दोन बायकांना सहज लागू झाला. बरं त्या बायकांनी अवघ्या ३० एक मिनिटात लोकलमध्ये बसून कोणताही व्हिसा न काढता थेट परदेशवारी केली होती. यावरुन एक सहज जाणवलं की स्त्रिया या फार मनमोकळ्या बोलतात, कधी नवऱ्याबद्दल कधी प्रियकारबद्दल, कधी चक्क दारू पिण्याबद्दल किंवा कधी एका मुलीच्या कपड्यांबद्दल… अगदी कशाबद्दलही! त्यांना रोखणारं कोणी नाही.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local diaries train travellers experience women gossips nrp
First published on: 19-09-2022 at 09:31 IST