सकाळच्या भर उन्हात… थोडं विचित्र वाटलं ना ! पण कालपर्यंत परिस्थितीच अशी झाली होती. सकाळीसुद्धा प्रचंड गरम होतं होतं. एरवी ट्रेनमधून जाताना, रिक्षेतून जाताना शांतपणे वारा अंगावर घेत बाहेरचा परिसर बघणं हा माझा आवडता उद्योग. या उन्हाळ्यात काही वेगळंच वाटतं होतं. बाहेरचा परिसर न्याहाळताना सभोवती एक कल्लोळ उठल्यासारखा झाला होता. मानवी आवाज परिचयाचे होते. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तरीही गोंगाट जाणवत होता.
ते आवाज होते झाडांचे. छोटी झुडपं, मोठे वृक्ष आपल्या सळसळीतून बरंच काही सांगत होते.
रस्त्याकडेला चाललेल्या कामांमुळे उखडून टाकलेली बोगन वेलीची रोपं उसासत होती. कुठे भेरली माडांचे शुष्क, तपकीरी बुंधे हाकारत होते. एरवी मंद सळसळणारी पिंपळ पानं शांत होती, पण मलूल!
ताम्र वृक्ष फुलाफुली बहरला होता, पण त्याच्या फुलण्यात तो नेहमीचा दिमाख नव्हता. नाही म्हणायला गुलमोहराची फुलं अग्नीज्वाळेसारखी लखलखत होती. गारवेली कुंपणाला लगडून आपलं अस्तित्व टिकवून ठेवत, पावसाची आतुरतेने वाट पाहत होत्या. सगळं बघताना कसंसच वाटत होतं. प्रत्येक वनस्पती जणू साद घालत होती. कधी रे येशील तू…
दुभाजकांच्या सिमेंटच्या आवरणांमधून खोलवर जाणाऱ्या वडाची मुळं पार उघडी पडली होती. सातवणीचे, बदामाचे वृक्ष एका बाजूला कलले होते. पहिल्या पावसात हे नक्की पडणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नव्हती.
पक्षी झाडांच्या पानआड आडोसा शोधून जमेल तितकी विश्रांती घेत होते. पाणथळ तर कुठे उरलीच नव्हती. जमिनीच्या पापु्द्र्यांआडून डोकावणारे कीटकही ओलाव्याच्या शोधात परागांदा झाले होते. जून महिना म्हणजे खरं तर महत्त्वाचा महिना. पाऊस येण्याची चाहूल घेत रान सुरणांचे शेंडे वर यायला लागले, मुंबईतून शेवळं डोकावायला लागली, रानवेली आधार शोधायला लागल्या की समजावं पाऊस उंबरठ्यावर येऊन ठेपलाय, पण यावर्षी या खुणाही लोपल्या होत्या.
मृग लागला, पण ते लाल चुटूक मृगाचे किडे, त्या लांब पंखांच्या उडत्या मुंग्या, पावसाआधी घरभर वावरणारे, दिव्यांवर झेपावणारे वेडे कीटक, फुलपाखरांच्या कुळातले, पण फुलपाखरू नसलेले पतंग, इवल्या पंखांच्या पाकोळ्या. ही सगळी कुठे गायब झाल्यासारखी झाली होती.
पावसाचे रोजचे अंदाज वर्तवले जात होते, पण घडत मात्र काहीच नव्हतं. मळभ येत होतं, क्षणात विरून जाण्यासाठी. पेरण्या वाया गेल्या होत्या. आभाळातल्या पाण्याऐवजी डोळ्यातलं पाणी बरसेल की काय अशी स्थिती होती. पाण्याच्या साठ्यांचे अंदाज वर्तवले जात होते. पाणीकपात तर आधीपासूनच सुरू होती.
तापमान वाढीची चर्चा आता परिमाणात बदलली होती. उद्याचं संकट आज, आत्ता उंबरठ्यावर उभं होतं. आणि….
कोणत्याही खाणाखुणा न दाखवता, ढगांचे ढोलताशे, वाजंत्री सोबतीला न घेता, विजेच्या लखलखटाशिवाय तो आला. नुसता आला नाही मनसोक्त बरसला. अवघ्यांना निववत तो राजा सारखा कोसळला. आजची सकाळ वेगळी होती. झाड सचैल स्नान करून सुस्तावली होती. जमीन पाणी पिऊन तृप्त होती. पक्षी हलकेच चिवचिवत रिमझिमत्या धारा अंगावर घेत उडत होते. मुळं उचकटून केललेले वृक्षसुद्धा जमेल तितकं पाणी शोषून घेते होते. झाडाचं पानंनपान स्वच्छ झालं होतं. जमिनीत सुप्तावस्थेत पहुडलेल्या असंख्य बिया खडबडून जाग्या झाल्या होत्या. अंकुरांच्या तयारीला लागल्या होत्या. माणसं छत्र्या असूनही पाऊस अंगावर घेत होती… कारण… तो आलाचं होता मोठ्या आळवणी नंतर. आता त्याला जाऊ द्यायचं नव्हतं. त्याला सांभाळायचं होतं. यावर्षी कागदावर नाही तर खरोखरचं वृक्षारोपण होणार होतं. अनेक योजनांनी, लेखांनी, घोषणांनी न सांधणारं काम त्याने एक छोटीशी झलक देऊन साधलं होतं अगदी चुटकी सरशी.
प्रत्येक जण मनातून थोडा धास्तावला होता. आता जर ठोस पावलं उचलली नाहीत तर विनाशाची तीन पावलं अख्खी पृथ्वी गिळंकृत करतील एवढं नक्की.
निसर्गाचं शिकवणं हे असंच तर असतं, नाही का ?
mythreye.kjkelkar@gmail.com
